Fatty liver symptoms : लिव्हर हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. चुकीच्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्वांपैकी लिव्हरवर सर्वाधिक परिणाम होतो. लिव्हरच्या बाबतीत जळजळ, सिरोसिस व फॅटी लिव्हर यांसारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. लिव्हर हा शरीराचा एक अवयव आहे जो रोगप्रतिकार शक्ती, पचन, चयापचय आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी जबाबदार असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दरवर्षी लिव्हरशी संबंधित आजारांमुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. भारतात लिव्हरचे आजार हे मृत्यूचे १० वे प्रमुख कारण आहे. लिव्हरच्या पेशींमध्ये चरबी जमा झाल्यामुळे होणाऱ्या यकृताच्या आजारांची एक मोठी यादी आहे. त्यापैकी एक म्हणजे फॅटी लिव्हर, जो प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला प्रभावित करतो.

सध्याच्या वाईट जीवनशैलीमुळे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. व्यग्र जीवनशैलीमुळे आजकाल लोक आरोग्यदायी खाण्याऐवजी जंक फूड जास्त खाऊ लागले आहेत. त्यामुळे जाणूनबुजून किंवा नकळत लोक अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. लठ्ठपणा, मधुमेह आणि चयापचय सिंड्रोमशी संबंधित असल्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराने सध्या लक्ष वेधले आहे. म्हणूनच त्याची साधी लक्षणे ओळखणे आणि त्यावर वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे. कारण- जर हा आजार आणखी वाढला, तर लिव्हर खराब होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञ न्यूबर्ग प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी फॅटी लिव्हरची लक्षणे आणि इतर माहिती दिली आहेत ती जाणून घेऊयात.

डॉ. अजय शाह यांच्या मते, सुरुवातीच्या काळात त्याची लक्षणे खूपच कमी दिसून येतात. पण जसजसा हा आजार वाढत जातो, तसतशी त्याची काही लक्षणे दिसू लागतात.

फॅटी लिव्हरची लक्षणे (Fatty Liver Sign)

पायांना सूज येणे

पाय, घोटे किंवा पायांमध्ये सूज येणे याला एडेमा म्हणतात. हा त्रास द्रवपदार्थ साचल्यामुळे होऊ शकतो. हे यकृताच्या नुकसानीचे एक सामान्य लक्षण असू शकते.

जास्त झोप येणे किंवा थकवा येणे

या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. जीवनशैलीतील घटक आणि वैद्यकीय परिस्थितींसह विविध कारणांमुळे थकवा येऊ शकतो; परंतु पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही जर तुम्ही थकलेले असाल, तर हे यकृताच्या नुकसानीचे लक्षण असू शकते. ऊर्जा चयापचयात यकृत महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत यकृत खराब झाल्यास ते ऊर्जेची पातळी कमी करते, ज्यामुळे थकवा येण्यासोबतच झोपही जास्त येते.

पोटाच्या समस्या

जर तुम्हाला वारंवार पोटाच्या समस्या येत असतील, तर ते फॅटी लिव्हरचे लक्षणदेखील असू शकते.

मानेभोवती काळेपणा

फॅटी लिव्हरमध्ये शरीरात इन्सुलिन तयार होऊ लागते. त्यामुळे मानेभोवती काळेपणा येऊ लागतो. हे फॅटी लिव्हरचे लक्षणदेखील असू शकते.

कावीळ

अनेक लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो. मग त्यांची त्वचा आणि डोळे पिवळे होतात.

कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे

वजन कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. जर तुमचे वजन कोणत्याही कारणाशिवाय वेगाने कमी होत असेल, तर ते फॅटी लिव्हरचे लक्षणदेखील असू शकते.

फॅटी लिव्हर टेस्ट

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसली, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याशिवाय तुम्ही वेळोवेळी यकृताशी संबंधित चाचण्या करून घ्याव्यात.