आषाढ अमावस्या ही अनेकांकडे गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. श्रावण हा सणांचा महिना सुरु होत असल्याने अनेकजण श्रावणामध्ये मांसांहार करत नाहीत. म्हणून आषाढाच्या शेवटच्या दिवशी अनेकजण मांसांहारी जेवणावर ताव मारुन गटारी साजरी करतात. उद्या आषाढामधील शेवटचा दिवस असल्याने अनेकांचे मांसांहाराचे प्लॅन तयार आहेत. याचनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गटारीनिमित्त करता येतील अशा काही चिकनच्या खास पाककृती. या पाककृती अतिशय सोप्या पण अत्यंत चविष्ट आहेत. त्यामुळे यंदाच्या गटारीला तुम्हाला हा वेगळा प्रयोग करुन बघता येईल…

हरियाली चिकन

साहित्य :

अर्धा किलो चिकन, १ कप दही, २ कांदे, १ टोमॅटो, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ कप बारीक चिरलेला पुदिना, अर्धा कप चिरलेला पालक, ४-५ हिरव्या मिरच्या, २ चमचे आले-लसूण वाटलेले, १ चमचा हळद, २ चमचे चिकन मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा अख्खा गरम मसाला (१ मोठी वेलची, १ दालचिनी, ४ लवंग, २-३ तमालपत्रे) मीठ, तेल.

कृती :

चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवावे. मिक्सरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, पालक, पुदिना वाटून त्यात दही मिसळून एकजीव वाटून घ्यावे. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला आणि बारीक चिरलेला कांदा लालसर रंगावर परतून घ्या. त्यानंतर त्यात चिकन घालून परतावे. आता हे चिकन नीट शिजवून घ्यावे. ताटावर पाणी घालून ते ताट या पातेल्यावर ठेवून चिकन शिजवावे. यानंतर त्यात सर्व मसाले आणि तयार केलेले हिरवे वाटण घालावे. पुन्हा झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यावे.

चिकन पेरी पेरी

साहित्य :

चिकन लेग पीस, २ लाल सिमला मिरच्या, २ लाल साध्या मिरच्या, १ चमचा काश्मिरी लाल मिरची पूड, १ चमचा पॅप्रिका पूड, ७-८ लसूण पाकळ्या, २ चमचे व्हिनेगार, ४ चमचे ऑलिव्ह तेल, १ पांढरा कांदा, मीठ.

कृती :

कांदा, मिरच्या चिरून घ्याव्यात. लसूण ठेचून घ्यावी आणि सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. ही तयार झालेली चटणी चिकन लेग पीसना लावून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी. यानंतर ग्रील पॅनवर हे लेग पीस दोन्ही बाजूनी भाजून घ्यावे. कांद्यासोबत सव्‍‌र्ह करावे.

चिकन तेरियाकी

साहित्य :

२ बोनलेस चिकन ब्रेस्ट, ३ चमचे मध, ४ चमचे सोया सॉस, अर्धा कप संत्र्याचा रस, २ चमचे तीळाचं तेल, १ इंच आले, १ चमचा बटर, १ चमचा भाजलेले तीळ, कांद्याच्या २ हिरव्या पाती, २ चमचे मैदा.

कृती :

एका पातेल्यात चिकन घ्या. ते व्यवस्थित स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घ्या. आता मैदा सोडून बाकीचे जिन्नस चिकनमध्ये मिसळा. आले किसून घ्या. कांदापात चिरून घ्या. चिकनला हे सर्व मिश्रण माखून मुरण्यासाठी ते फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा. नंतर ग्रील पॅन गरम करून घ्या. आता हे मुरवलेले चिकन मैद्यात घोळून दोन्ही बाजूंनी छान ग्रील करून घ्या. पातेल्यात उरलेले सॉसचे मिश्रण या चिकनवर घालून ते त्यातच शिजवून घ्या. वेगळे पाणी घालू नका. शेवटी खाताना त्यावर कांदापात घालून खा.

स्टफ्ड चिकन पेपर्स

साहित्य :

अर्धा किलो चिकन खिमा, ४ मोठय़ा लाल सिमला मिरच्या, २ चमचे तेल, १ चमचाभर वाटलेली लसूण, पाव चमचा चिली फ्लेक्स, २ चमचे चिरलेला पुदिना, १ कप किसलेले मोझेरेला चीझ, १ चमचा गरम मसाला, मीठ.

कृती :

सगळ्यात आधी चिकन खिमा व्यवस्थित धुऊन घ्यावा. हळद, मीठ, वाटलेली लसूण, गरम मसाला याचे मिश्रण चिकनला लावून ते मुरण्यासाठी ठेवावे. दुसरीकडे लाल मिरची घेऊन त्यातला वरील भाग चिरून आतील बिया काढून ती पोकळ करून घ्यावी. मसाल्यात मुरवलेला खिमा या मिरच्यांमध्ये भरावा. आता कढईत तेल गरम करून त्यावर खिमा भरलेल्या सिमला मिरच्या परताव्यात. थोडे पाणी घालून वाफवून घ्यावे आणि गॅसवरून खाली उतरावे. शेवटी त्यावर किसलेले चीझ, चिली फ्लेक्स आणि पुदिना घालून सव्‍‌र्ह करावे.

चिमिचूरि चिकन

साहित्य :

अर्धा किलो बोनलेस चिकन, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप बारीक चिरलेली कांदापात, १ बारीक चिरलेला कांदा, लसूणपाकळ्या, ४ हिरव्या मिरच्या, २ चमचे ड्राय ओरिगानो, २ चमचे आले-लसूण वाटून, २ चमचे मिरची पूड, २ चमचे धनेजिरे पूड, २ चमचे लिंबूरस, १ चमचा मिरपूड, अर्धा कप ऑलिव्ह तेल, मीठ.

कृती :

वाटलेले आले लसूण, धनेजिरे पूड, लाल मिरची पूड, मिरपूड, मीठ हे सर्व साहित्य एकत्रितरित्या बोनलेस चिकनला लावून घ्यावे. आता हे माखलेले चिकन १० मिनिटे ठेवावे. त्यानंतर एका भांडय़ात ऑलिव्ह तेल घेऊन त्यात कोथिंबीर, कांदापात, हिरवी मिरची, ड्राय ओरेगानो, मिरपूड, लसूण पाकळ्या घालून व्यवस्थित मिश्रण तयार करावे. आता हे मिश्रण चिकनला लावून ते २०मिनीटे मुरण्यासाठी ठेवावे. असे छानपैकी मुरलेले चिकन तव्यावर ऑलिव्ह तेलात छान परतून, भाजून घ्यावे आणि गरमागरम खायला घ्यावे.

कोकोनट करी चिकन

साहित्य :

२ कप बोनलेस चिकन तुकडे, १ चमचा करी पावडर, १ मोठा कांदा, अर्धा चमचा लसूण पेस्ट, १ कपभर नारळाचं दूध, १ मोठा टोमॅटो, अर्धा चमचा टोमॅटो सॉस, अर्धा चमचा मिरपूड, तेल, मीठ.

कृती :

चिकनचे चौकोनी तुकडे करावे. त्याला मीठ, मिरपूड लावून ठेवावे. एका भांडय़ात तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा परतून घ्यावा. त्यात करी पावडर घालावी आणि चिकनचे तुकडे घालावे. व्यवस्थित परतून ७-८ मिनिटे शिजवावे. चिकन शिजल्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ आणावी. यानंतर नारळाचे दूध, टोमॅटो सॉस घालून पुन्हा वाफ आणावी. १०-१५ मिनिटे झाकण ठेवून शिजवावे. भातासोबत गरमागरम खावे.

मोरोक्कन लेमन चिकन

साहित्य

१ किलो चिकन (त्याचे बरोब्बर ६ तुकडे करून घ्या. लेगचे दोन आणि ब्रेस्टचे २), ४ मोठे चमचे तेल (ऑलिव्ह ऑइल असल्यास उत्तम) ल्ल २ कांदे, कोथिंबीर, थोडीशी पार्सली,  ५-६ लिंबे, ५-६ लसूण पाकळ्या, अडीच इंच आले, १ चमचा काळीमिरी  ल्ल १ चमचा हळद, मीठ चवीपुरते, अर्धा ग्रॅम केशर

कृती
कांदे उभे चिरून घ्या. कोथिंबीर, पार्सली चिरून घ्या. लसूण बारीक चिरा. आले किसून घ्या. काळीमिरीही थोडीशी चेचून घ्या. आता चिकन सोडून बाकीच्या या सगळ्या गोष्टी एकत्र करा. हे मिश्रण चिकनला लावा. हे माखलेले चिकन २-३ तास ठेवून द्या. एका पसरट भांडय़ात हे माखलेले चिकन ठेवून अगदी मंद आचेवर ते साधारण तासभर शिजवावे. चिकन शिजल्यावर त्याला छान रस सुटतो. तो पौष्टिक असतो. आता हे शिजलेले चिकन एका ताटलीत काढून घ्या. सूपसोबत किंवा भातासोबत किंवा कुसकुससोबत वाढा.

थाई रेड चिकन करी

साहित्य :

१ किलो चिकन पीसेस रेड करी पेस्टसाठी- २०० ग्राम मद्रास कांदे, ५० ग्राम गालांगल (आल्याप्रमाणे एक प्रकार), ५० ग्राम लसूण, १०० ग्राम लाल सुक्या मिरच्या (काश्मिरी), १०-१२ ताज्या लाल मिरच्या, २५ ग्राम लेमनग्रास, ३-४ मकरूटची पानं, १ मकरूट (लिंबाप्रमाणे दिसणारे एक प्रकारचे फळ), २ चमचे फिश सॉस, १०-१२ सोडे (सुकी कोलंबी), २ वाटय़ा नारळाचं दूध, मीठ, १ चमचा साखर, ४-५ बेसिलची पानं, ३-४ मोठे चमचे तेल.

कृती

सगळ्यात आधी आपल्याला थाई रेड करी किंवा पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी  मद्रास कांदे, लेमनग्रास, सोडे, गालांगल, लाल मिरच्या, लसूण, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. यानंतर कढईत हे वाटण परतून घ्यावे. त्यात चिकन घालून ते शिजवून घ्यावे. आता त्यामध्य मकरूट किसून घालावे. बेसिल आणि मकरूटची पाने घालावी. फिश सॉस घालून थोडे पाणी घालून ही करी शिजवून घ्यावी. यामध्ये मीठ, साखरही चवीपुरते घालावे. उकळत्या करीमध्ये नारळाचे दूध घालून आच बंद करावी. गरमागरम भाताबरोबर ही करी फस्त करावी ग्रीन थाई करीसाठी लाल मिरच्यांऐवजी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर वापरावी. फिश सॉसऐवजी कोणतेही सुके मासे व्हिनेगरमध्ये २-३ दिवस भिजत ठेवून द्यावे आणि मग ते व्हिनेगर फिश सॉसऐवजी वापरावे. यामध्ये २ चमचे सोया सॉसही घालता येईल. जर शाकाहारी करी करायची असेल तर चिकन, माशांऐवजी भाज्या वापरता येतील.

चिकन डोनट

साहित्य :

पाव किलो चिकन, २ कांदे, ३ अंडी, कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, चमचाभर तिखट, चमचाभर वाटलेलं आलं-लसूण, १ चमचा हळद, १ चमचा धने-जिरे पूड, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा कॉर्नफ्लोअर, २ चमचे मैदा, ४ चमचे ब्रेडचा चुरा, तेल, मीठ.

कृती :

बोनलेस चिकन स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर त्यात एक अंडे आणि बाकीचे सर्व मसाल्याचे पदार्थ घालून वाटून घ्यावे. हे वाटण चांगले एकजीव व्हायला हवे. हे वाटलेले चिकन एका मोठय़ा भांडय़ात काढून घेऊन फ्रिजमध्ये तासभर ठेवावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तासाभरानंतर कढईत तेल गरम करावे. फ्रिजमधले सारण बाहेर काढून त्याचे डोनट बनवावे. आता २ अंडी फोडून घ्यावी. ती फेटून बाजूला ठेवावी. शेजारीच ब्रेडचा चुराही ठेवावा. चिकनचे हे डोनट फेटलेल्या अंडय़ात बुडवून मग ब्रेडच्या चुऱ्यात घोळून तळावे. मस्तपैकी सॉस किंवा चटणीसोबत हे चिकन डोनट फस्त करावे.
(सर्व पाककृती > दीपा पाटील, नीलेश लिमये यांच्याकडून साभार)