Golden Hour Heart Attack: आजकाल हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा केवळ वृद्धांना होणारा आजार राहिलेला नाही. गेल्या काही वर्षांत २०-३० वयोगटातील तरुणांमध्येही अचानक हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण धोकादायक पद्धतीने वाढले आहे. तणावपूर्ण जीवनशैली, तासनतास डेस्कवर बसून केलेलं काम, व्यायामाचा अभाव, अति स्क्रीनटाईम, जंक फूड आणि धावपळीचं जगणं यामुळे तरुणांचं हृदय कमकुवत होत चाललं आहे. कार्डिओलॉजिस्ट वारंवार इशारा देत आहेत की जर योग्य वेळी तपासण्या, स्क्रीनिंग आणि जनजागृती केली नाही तर ही समस्या आणखी भयावह होईल.
पण, या सगळ्या धोक्यांच्या यादीतून एक गोष्ट मात्र जीव वाचवणारी आहे, ती म्हणजे ‘गोल्डन अवर.’ हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्या ६० मिनिटांना डॉक्टर “गोल्डन अवर” असं म्हणतात. या काळात वेळेवर उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
डॉक्टरांचे निष्कर्ष
मेडिकल डेटा सांगतो की, हृदयविकाराच्या झटक्यात सापडलेल्या रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोक रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्युमुखी पडतात. कारण काय? उशिरा उपचार. प्रत्येक तास उशीर म्हणजे हृदयाच्या स्नायूंमध्ये होणारी हानी वाढतच जाते. कार्डिओलॉजिस्ट सांगतात, पहिल्या एका तासात रक्तप्रवाह पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला तर हृदयाच्या स्नायूंना होणारे कायमचे नुकसान टाळता येतं.
गोल्डन अवरमध्ये उपचार कसे होतात?
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत डॉक्टर सतत हृदयाची धडधड तपासतात. ‘व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया’ किंवा अचानक ब्लॉकेजसारख्या धोकादायक स्थिती त्वरित नियंत्रणात आणण्यासाठी पेसमेकर किंवा डिफिब्रिलेटरची गरज लागते, जी फक्त आयसीसीयूमध्येच मिळते.
जर ‘कॅथ लॅब’ उपलब्ध असेल तर अँजिओप्लास्टी व स्टेंटिंग ही सर्वात प्रभावी पद्धत मानली जाते. यात ब्लॉकेज झालेल्या धमनीत बलून घालून रक्तप्रवाह सुरळीत केला जातो आणि धातूचा स्टेंट बसवला जातो. जर तात्काळ लॅब नसेल तर डॉक्टर प्रथम ‘थ्रोम्बोलायटिक’ म्हणजे क्लॉट विरघळवणारी औषधं देतात आणि नंतर ६-२४ तासांत अँजिओप्लास्टी केली जाते. ४८ तासांनंतर यशस्वी उपचाराची शक्यता झपाट्याने कमी होते.
लक्षणं कधीही दुर्लक्षित करू नका
छातीत दडपणं, जडपणा किंवा वेदना, डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना, श्वास घ्यायला त्रास, अचानक घाम फुटणं, भोवळ, उलट्या होण्याची भावना ही सगळी हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची संकेतं आहेत. डॉक्टर सांगतात, या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर अर्धा ताससुद्धा प्राणघातक ठरू शकतो.
थोडक्यात, गोल्डन अवर म्हणजे जीवदान! हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच रुग्णालयात पोहोचणं, तातडीने उपचार घेणं हेच खरं औषध आहे. वेळ वाया घालवलात तर हृदय कायमचं कमजोर होईल, उपचाराचं यश कमी होईल आणि मृत्यूचा धोका वाढेल.