Good Habits for Heart Health :दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. नियमित व्यायाम आणि पोषक आहाराच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. ताणतणाव बैठी जीवनशैलीमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार वाढताना दिसत आहे. आज आपण निरोगी हृदयासाठी सकाळच्या काही चांगल्या सवयींविषयी जाणून घेणार आहोत. हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, हृदय निरोगी ठेवण्यासाठी सकाळच्या काही सवयी जाणून घ्या
१. हायड्रेशन
दिवसाची सुरूवात पाणी पिऊन करा आणि शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही, याची काळजी घ्या. ही एक साधी व सोपी सवय आहे ज्याकडे अनेकजण दूर्लभ करतात. पण पाण्यामुळे रक्त तयार होते जे संपूर्ण शरीरात पोषक तत्त्वे आणि ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. म्हणून दिवसाची सुरूवात करताना सकाळी भरपूर पाणी प्या कारण यामुळे शरीराच्या आवश्यक कार्यांना प्रोत्साहन मिळते.
२. आहार
चांगला पौष्टिक आहार घ्या ज्यामध्ये प्रोटिन्स भरपूर असतात आणि त्यात कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात. आहार हा दिनचर्येचा आणि एकूण आरोग्यासाठी विशेषत: हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स खाणे टाळा जे हृदयासाठी घातक आहे ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. दररोज ठराविक प्रमाणात जेवण करा आणि चांगली जीवनशैली स्वीकारा. शिस्तबद्ध पद्धतीने जेवणाची सवय आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
३. ध्यान करा
ध्यान करणे मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ध्यान केल्याने ताण तणाव नियंत्रित करण्यात आणि रक्तदाब कमी करण्यात मदत होते. या दोन्ही गोष्टी हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. सकाळी ध्यान करताना डोळे बंद करा आणि आरामात बसा. श्वासोच्छवासानुसार, एकच सकारात्मक शब्द किंवा वाक्यांशाच्या पुनरावृत्तीवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही ५ मिनिटे सुद्धा ध्यान करू शकता. काही लोकांना ध्यान करणे कंटाळवाणे वाटू शकते पण आज आपल्याकडे इतके अॅप्स आणि पॉडकास्ट उपलब्ध आहेत ज्यामुळे आपण ध्यान अधिक मनोरंजकपणे करू शकतो.
४. भरपूर सूर्यप्रकाश घ्या
अनेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते आणि हृदयाशी संबंधित वाढत्या आजारांमध्ये व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. सकाळी काही मिनिटे उन्हात राहणे किंवा सूर्यप्रकाश घेणे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे तुमचा मूड सुधारतो तसेच तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी तयार करण्यास सुद्धा मदत करते. दररोज सकाळी बागेत एखादा फेरफटका मारणे फायदेशीर ठरू शकते.
५. शरीराची हालचाल
आजच्या बैठी जीवनशैलीमुळे आपण शारीरिक हालचाल खूप कमी करतो पण दररोज नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर पहिले काही तास शारीरिक हालचाली करा. योगा असो किंवा चालणे, धावणे किंवा वजन उचलणे इत्यादी हालचाली करा. या शारीरिक हालचाली तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित आरोग्य सुदृढ करण्यास मदत करते.
६. मोबाईल वापरणे टाळा
अनेक जण झोपेतून उठल्यानंतर लगेच फोन वापरतात पण झोपेतून उठल्यानंतर सकाळी आणि झोपण्यापूर्वी रात्री किमान ३० मिनिटे मोबाईल वापरणे टाळा. त्यामुळे रात्री झोपेवर लक्ष केंद्रित करण्यास आणि सकाळी दिवसाची सुरुवात अधिक उत्साहाने करण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, हे छोटे बदल तुम्हाला आणि तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हळूहळू फायदेशीर ठरतील. हळू हळू सुरुवात करा पण आजपासून सुरुवात करा.