इंटरनेट ब्राउझिंगसाठी कमालीचं लोकप्रिय असलेल्या ‘गुगल क्रोम’ला आता Brave ब्राउझरद्वारे तगडी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर 200 कोटींपेक्षा जास्त लोकांकडून इंटरनेट ब्राऊझिंगसाठी google chrome चा वापर केला जातो. पण आता गुगल क्रोम’शी स्पर्धा करण्यासाठी ‘ब्रॅव्ह ब्राउझर’ लॉंच करण्यात आला आहे.
या ब्राउझरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे ब्राउझर आपोआप थर्ड पार्टी जाहिराती आणि कुकीज ब्लॉक करतं. याशिवाय जाहिरात पाहण्याचा आणि युजर्सनी ब्राउझरवरील जाहिरातींवर क्लिक केल्यास त्यांना पैसेही मिळतात. जाहिरातीच्या माध्यमातून ऑनलाइन जाहिरातीची संपूर्ण पद्धत बदलत असल्याचे कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे. यावरील जाहिराती पाहणाऱ्यांना रेव्हेन्यूचा 70 टक्के हिस्सा मिळतो. तर शिल्लक 30 टक्के हे ब्राउझरच्या डेव्हलपर्संना मिळतात. या ब्राउझरमध्ये स्पीड, सुरक्षित ब्राउझिंग आणि जलद नेव्हिगेशनची सुविधा आहे.
सर्वप्रथम 2018 मध्ये आयओएस युजर्ससाठी ब्रेव्ह ब्राउझर लाँच करण्यात आलं होतं. पण, आता अँड्रॉइड, विंडोज, लिनक्स आणि macOS या सर्व प्लॅटफॉर्मवर ब्रेव्ह ब्राउझरचा वापर करता येणार आहे. हे ब्राउझर युझर्सचा डेटा स्टोर करत नाही, तसंच प्रायव्हसी सेटिंग कस्टमाइज करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. toptenreviews.com या संकेतस्थळाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वोत्तम ब्राउझरच्या बाबतीत मोझिला फायरफॉक्स नंतर ब्रेव्ह ब्राउझरचा क्रमांक लागतो. त्यांनंतर अॅपलचं ब्राउझर सफारी आणि चौथ्या क्रमांकावर गुगल क्रोम आहे. ब्रेव्ह एक ओपन सोर्स क्रोमियमवर आधारित ब्राउझर आहे. या ब्राउझरमध्ये स्पीड, सुरक्षित ब्राउझिंग आणि जलद नेविगेशन असल्याने गुगल क्रोमलाही मागे टाकले आहे.