पोलिसांच्या नियमांमुळे डोंबिवलीतील काही ढोलताशा पथकांची माघार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नववर्ष स्वागतयात्रेतील ढोलपथकांच्या दणदणाटावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी यावर्षी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. पोलिसांच्या या नियमावलीचे श्री गणेश मंदिर संस्थान स्वागतयात्रा आयोजकांनीही स्वागत केले असून नियमावलीचे पालन करण्यास ढोल पथकांना सूचित केले आह; मात्र ही ती मान्य नसल्याने डोंबिवलीतील काही ढोल पथकांनी मुख्य स्वागतयात्रेत ढोल न वाजविण्याचा निर्णय घेत यातून माघार घेतली आहे.

ढोलताशांच्या दणदणाटामुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी यंदा कठोर पावले उचलली आहेत.  ढोल ताशांचा आवाज हा ६५ डेसिबलच्या वर गेल्यास त्या पथकांवर, तसेच आयोजन संस्थेवर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना पोलिसांनी शहरातील स्वागतयात्रा आयोजन समितीला केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आयोजन समिती आणि ढोल-ताशा पथकांसोबत चर्चा करून त्यांना या नियमाविषयी माहिती देण्यात आली आहे.

आवाजावर नियंत्रित ठेवण्यासाठी पथकात १५ ढोल आणि सहा ताशांचा समावेश असावा, असा नियम घालून देण्यात आला आहे; मात्र एका पथकात ५० हून अधिक सदस्य सहभागी असतात. या सर्वाना समान संधी मिळायला हवी, असे सांगत निकष मानायला पथकांनी नकार दिला आहे.

दरम्यान,  ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येणाऱ्या कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर या शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या स्वागतयात्रेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ढोलताशा पथकांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी, मंगळवारी सर्वच शहरात ठिकठिकाणी पोलीसांचे पथक कार्यरत असणार आहेत. पोलिसांच्या या र्निबधावर अनेक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वागतयात्रांचा कालावधी खूप कमी असतो. त्यामुळे डॉल्बी वा इतर दणादणाटी वाद्यांप्रमाणे ढोलताशांचा गजर ध्वनिप्रदूषण घडवून आणत नाही. त्यामुळे सरकारने या सांस्कृतिक सोहळ्याचा साकल्याने विचार करायला हवा होता, असे एका कार्यकर्त्यांने व्यक्त  केले.

बंदी डोंबिवलीतच का?

शहरात ध्वनिप्रदूषणाविषयी पोलिसांनी नियमावली आखल्याने काही पथकांनी ग्रामीण भागात जाऊन ढोल ताशा वादन करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र पोलिसांच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या पथकावर कारवाई होईल त्यांनी कोठेही जाऊन वादन केले तरी नियम हा शहरी व ग्रामीण भाग दोन्हींना लागू असल्याचे पोलिसांनी सांगताच त्यांचा हिरमोड झाला आहे. पुणे, नाशिक येथे मोठय़ा प्रमाणात ढोल पथके स्वागतयात्रेत सहभागी होतात. तेथे कोणताही नियम नसताना ठाणे, कल्याण, डोंबिवली येथे नियम का घातले गेले, असा सवाल ढोलपथकांनी केला आहे.

ढोलताशा पथकांवरील नियमावली जाचक आहे. सदस्य संख्या वाढवून द्यावी याविषयी पोलिसांसोबत चर्चा करण्यात आली; मात्र त्यांनी नकार दिल्याने स्वागतयात्रेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपारिक वाद्य वादनांवर बंदी घातली जात असतानाच, इतर सणांना वा कार्यक्रमांना पाश्चिमात्य वादनांचा होणाऱ्या दणदणाटावरही पोलिसांनी तेवढीच कठोर कारवाई करावी.

-निशांत चव्हाण, आरंभ ढोलपथक

गणेश मंदिर संस्थानकडे सात ढोल पथकांनी नोंद केली आहे. नियमावलीचे पालन हे ढोल पथकांना करावेच लागेल, पोलिसांचे तसे आदेशच आहेत. तसेच पर्यावरणभिमुख उपक्रम राबविण्यासाठी आपणच सुरुवात केली पाहिजे.

-मेजर विनय देगांवकर, संयोजन समिती प्रमुख

 

ठाण्यातील पथकांच्या ‘आवाजा’कडे पोलिसांचे ‘कान’

ठाणे : यंदा गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रेत आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या ढोलताशा पथकांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात लागू केलेल्या नवीन नियमांचे पालन करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे स्वागतयात्रेत आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या ढोलताशा पथकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येणाऱ्या कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर या शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या स्वागतयात्रेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ढोलताशा पथकांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याने यंदा पाडव्याच्या दिवशी सर्वच शहरांत ठिकठिकाणी पोलिसांचे पथक कार्यरत असणार आहेत.

प्रभातफेरीत सहभागी होणाऱ्या चित्ररथांना अडथळा होत असल्याने ढोलताशा पथकांना प्रभातफेरीत सहभागी न घेण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa 2017 thane police made separate guideline for gudi padwa swagat yatra
First published on: 28-03-2017 at 02:23 IST