पंढरपूर : लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (दि २) सुरू होणार आहे. याशिवाय विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली.

करोना संसर्गामुळे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर १७ मार्च २०२० रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी पाडव्याला सुरू झाले. दुसऱ्या लाटेत १२ एप्रिल रोजी मंदिर पुन्हा बंद झाले. त्यानंतर नुकतेच कार्तिकी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. मात्र करोनामुळे सरकारने अनेक नियम लागू केले होते. तसेच श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू होते. मात्र पदस्पर्श दर्शन अद्याप बंद आहे. सध्या करोनाचा संसर्ग कमी झाल्याने श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन सुरू करा अशी मागणी भाविकांची होती.

या मागणी संदर्भात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक  बालाजी पुदलवाड  यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक पार पडली. या वेळी पवार यांनी मंदिर समितीच्या प्रस्तावाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र पदस्पर्श दर्शन सुरू करतानाच करोनाचे नियम पाळावे लागतील. मुखपट्टी, योग्य अंतर आदी नियमाचे पालन करा अशा सूचना केल्याची माहिती औसेकर यांनी दिली आहे. यानुसार गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन तसेच विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू होणार आहे. सावळय़ा विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची आस पूर्ण होणार यामुळे विठ्ठल भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.