नवी दिल्ली : अल्प किंवा मध्यम स्वरूपाच्या व्यायामामुळे नैराश्य विकार (डिप्रेशन) दूर ठेवता येतो, असा निष्कर्ष नव्या अभ्यासाद्वारे काढण्यात आला. त्यामुळे केवळ शारीरिक सुडौलपणा राखण्यासाठी नव्हे, तर सर्वागीण आरोग्य राखण्यासाठी व्यायामाची मदत होते, असे म्हणता येईल. अनेक संशोधने, अभ्यास आणि तज्ज्ञांच्या निष्कर्षांनुसार सातत्याने केलेली शारीरिक हालचाल अगदी सौम्य व्यायामाने निरोगी जीवनाचा पाया घट्ट होऊ शकतो. त्यामुळे आपले शरीर सुडौल तर राहतेच पण आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारते. हाडे कणखर होतात.

त्वचा आणि केसांच्या आरोग्यरक्षणासाठीही व्यायामाची मदत तर होतेच मात्र, चिंता आणि नैराश्य विकार दूर राहण्यासही या व्यायामाची मदत होते. थोडक्यात आपले मानसिक आरोग्य चांगले राहते, असे नव्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात. ‘जामा फिझियाट्री’ या संशोधन अहवालात एक लाख ९० हजार व्यक्तींच्या अभ्यासानुसार नैराश्य विकार हटविण्यासाठी व्यायाम निश्चित उपयोगी ठरतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, चिंताग्रस्तता, नैराश्य आल्यावर काहीही करावेसे वाटत नसताना व्यायामासाठी स्वत:ला प्रवृत्त करणे कठीण असते. मात्र,  जर आपली मानसिक अवस्था सुधारत असेल, तर नियमित व्यायाम निश्चित केलाच पाहिजे. या अभ्यासात दिसले, की व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत जे प्रौढ आठवडय़ाला रोज सरासरी सव्वा तास चालण्यासारखा व्यायाम करतात त्यांच्या नैराश्य येण्याची शक्यता १८ टक्क्यांनी घटते. जर प्रतिसप्ताह सरासरी अडीच तास व्यायाम केल्यास व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत व्यायाम करणाऱ्यांत नैराश्य विकाराची शक्यता २५ टक्क्यांनी घटते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंटाळा, आळस व मानसिक थकव्यावर मात करण्यासाठी व्यायामाची चांगलीच मदत होते. त्यामुळे आपल्या शरीरात ‘एंडोमॉर्फिन’सह इतर मानसिक बदल घडवणारी द्रव्ये स्रवतात व आपली मानसिक स्थिती सुधारते. आत्मविश्वास, आत्मसन्मान, स्वत:विषयीची सकारात्मक प्रतिमा निर्मितीस मदत होते. सौम्य नैराश्य हटवण्यासाठी नियमित व्यायाम एका मर्यादेपर्यंत उपचार म्हणून उपयोगी ठरतो. व्यायामासह वर्तनविषयक तंत्रे, सजगता आणि योगासने नैराश्यावरील उपचारांना साहाय्यभूत ठरून, हा विकार दूर करण्यास मदत करतात.