Regular Health check up: सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतेक लोकांना कोणत्या ना कोणत्या शारीरिक समस्येने वेढलेलं आहे. अशावेळी आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडासा निष्काळजीपणा देखील मोठ्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीने नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दर ३ महिन्यांनी काही ठराविक आरोग्य चाचण्या या केल्याच पाहिजेत. जेणेकरून कोणताही गंभीर आजार लवकर ओळखता येऊ शकतो. त्याप्रमाणे उपचारही लवकर करता येऊ शकतात. तेव्हा या कुठल्या महत्त्वाच्या चाचण्या आहेत ते जाणून घेऊ…
रक्तदाब चाचणी
रक्तदाब ही सध्या एक सामान्य समस्या ठरत आहे. असं असताना उच्च किंवा कमी रक्तदाब तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. म्हणून ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.
रक्तातील साखरेची चाचणी (ब्लड शुगर)
मधुमेह हा एक सामान्य मात्र अतिशय धोकादायक आजार आहे, जो तुमच्या शरीराला हळूहळू एका सायलेंट किलरसारखा नष्ट करतो. म्हणूनच ते लवकर शोधणे आणि नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तातील साखरेची चाचणी दोन प्रकारे केली जाते. उपवास आणि जेवणानंतर. ही चाचणी प्रामुख्याने मधुमेहाचा कुटुंबातील इतिहास असलेल्यांसाठी महत्त्वाची आहे.
कोलेस्ट्रॉल चाचणी
कोलेस्ट्रॉल चाचणी किंवा लिपिड प्रोफाइल चाचणी वेळोवेळी केली पाहिजे. ही चाचणी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी निश्चित करते. खराब कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच ही चाचणीदेखील अत्यंत महत्त्वाची आहे. ही चाचणी एचडीएल, एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सबद्दल माहिती देते. नियमितपणे ही चाचणी केल्याने हृदयरोग टाळता येऊ शकतो.
सीबीसी चाचणी (कम्प्लिट ब्लड काउंट)
सीबीसी ही एक मुलभूत आरोग्य चाचणी आहे. मात्र, ती तुमच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती सांगते. ही चाचणी लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्तपेशी, हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट संख्या मोजू शकते. यामुळे अनेक गंभीर आजारांची सुरूवातीची लक्षणे शोधण्यासही मदत होऊ शकते.