रोजच्या पिण्याच्या पाण्यालाच औषध बनवण्याचा जो विचार आयुर्वेदाने केला आहे, तसा तो इतर कोणत्याही वैद्यकाने केलेला नाही. त्या त्या ऋतूमध्ये वातावरणात होणार्‍या बदलांचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये यासाठी दिनचर्या, अन्न याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा अनुकूल बदल  करायला हवा, हे आयुर्वेदाचे आगळेवगळे वैशिष्ट्य आहे.

त्यानुसार हिवाळ्यात औषधी पाणी तयार करण्यासाठी सुंठ + जिरे + नागरमोथा + धने +बडीशेप यांचा उपयोग करणे योग्य होईल. ही चार औषधे सम प्रमाणात कुटून त्यांचे मिश्रण करुन त्यामधील दोन मोठे चमचे मिश्रण एक लीटर पाण्यात घालून भांड्यावर झाकण ठेवून, उकळवून एक चतुर्थांश होईपर्यंत उकळवावे उकळवून गाळून घ्यावे, की औषधी पाणी तयार होईल. पिताना मात्र कोमट प्यावे, गार झाले तरी किंचित कोमट करुन घ्यावे.

हेही वाचा >>> Health Special : लहान मुलांना दात येतात तेव्हा काय खायला द्यावं?

यामध्ये सुंठ तिखट असल्याने कफशामक आहे, तर विपाक मधुर (पचनानंतरचा परिणाम गोड) असल्याने पित्तशामक सुद्धा आहे. सुंठीचा उष्ण गुण पाण्याचा  व शरीरातला थंडावा कमी करतो. जिरे कडू-तिखट चवीचे असल्याने कफशामक व पित्तशामक आहे.  नागरमोथा चवीला कडू-तिखट असल्याने आणि विपाकाने सुद्धा तिखट असल्याने कफशामक व पित्तशामक सुद्धा आहे. धने पाण्याला अति प्रमाणात उष्ण बनू देत नाही. धने मूत्रल असल्याने लघवी साफ होते आणि हिवाळ्यात जितके अधिक मूत्रविसर्जन होईल तितका शरीरातला थंडावा कमी होतो. बडीशेप सुद्धा पाचक आहे, पोटामध्ये गुबारा (गॅस) धरु देत नाही. ही पाचही औषधे पाण्याला रुचकर आणि सुगंधी बनवतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पाच औषधांमुळे पाणी पाचक गुणांचे बनते व हिवाळ्यात अतिमात्रेमध्ये सेवन केलेल्या अन्नाला पचवण्यास साहाय्यक होते.

हेही वाचा >>> वायू प्रदुषणामुळे तुमच्याही डोळ्यांना त्रास होतोय? मग अशाप्रकारे घ्या काळजी, तज्ज्ञ सांगतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिवाळ्यात अति प्रमाणात खाल्ल्या जाणार्‍या गोडाधोडाच्या विरोधात आवश्यक असणारा कडू-तिखट परिणाम देण्यासाठी हे औषधी पाणी उपयुक्त सिद्ध होते. सुंठ,जिरे व नागरमोथा ही तीन औषधे सर्दी,कफ, खोकला यावरची चांगली औषधे आहेत, तर सुंठ,जिरे,नागरमोथा व धने ही तापावरची उत्तम औषधे आहेत. साहजिकच हिवाळ्यात संभवणार्‍या या आरोग्य-तक्रारींना प्रतिबंधक म्हणून आणि त्रास झालाच तर औषध म्हणून सुद्धा या पाण्याचा निश्चित फ़ायदा होतो. आजार झाल्यावर त्यांचा उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत म्हणून आयुर्वेदाने सांगितलेले असे साधे सोपे उपाय समाजाने अंगीकारले पाहिजेत.