Benefits Of Eating Raw Green Banana: अत्यावश्यक जीवनसत्वांचा साठा असलेले सुपरफूड म्हणजेच केळे हे अगदी स्वस्त दरात मुबलक पोषण पुरवणारे फळ आहे. वजन वाढवण्यापासून ते पचन सुरळीत करण्यापर्यंत अनेक कामांमध्ये केळ्याची मदत होऊ शकते. प्रसादाच्या शिऱ्यापासून ते कुरकुरीत वेफर्सपर्यंत अनेक रूपात केळ्यांचे सेवन केले जाते. वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये पिकलेली केळी सर्रास वापरली जात असली तरी हिरवी कच्ची केळीही तितकीच स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ठरतात. आज आपणही या कच्च्या केळ्यांचा कसा वापर करावा व त्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेणार आहोत. इतकंच नाही तर या कच्च्या केळ्यांचं सेवन नक्की कुणी करायला हवं हे ही पाहूया.

कनिका मल्होत्रा, क्लिनिकल आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह नियंत्रण प्रशिक्षक यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “कच्ची केळी सामान्यतः बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात कारण विक्रेते सहसा पिकण्याआधीच केळी झाडावरून तोडून आणतात. हिरव्या केळ्यांमधील पोषकसत्व ही पिकलेल्या केळ्यांपेक्षा वेगळी असतात कारण त्यात जास्त प्रतिरोधक स्टार्च आणि कमी साखर असते. फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी सारखे महत्त्वाचे घटक सुद्धा या कच्च्या केळ्यांमध्ये अधिक प्रमाणात असतात.यातील फायबर हे पोट भरलेले ठेवते ज्यामुळे वारंवार खाण्याचे प्रमाण कमी होते तसेच शरीरात विनाकारण ढकलल्या जाणाऱ्या कॅलरीज सुद्धा नियंत्रणात राहतात.”

हिरव्या केळ्यांमध्ये आढळणारा प्रतिरोधक स्टार्च हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे जो एक प्रीबायोटिक म्हणून काम करतो जे आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस मदत करते. तसेच हिरवी केळी शॉर्ट-चेन फॅटी ऍसिडचे उत्पादन वाढवतात ज्यामुळे आतड्याचे आरोग्य सुधारते.

हिरव्या केळ्याच्या सेवनाचा कोणाला फायदा होऊ शकतो?

हिरव्या केळ्यांचा समावेश असलेल्या आहाराचा प्रत्येकाला फायदा होऊ शकतो. मात्र असे काही विशिष्ट लोक आहेत ज्यांना या हिरव्या केळ्यांचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो.

खेळाडू: हिरवी केळी खेळाडूंसाठी फायदेशीर ठरू शकतात कारण त्यात पोटॅशियम अधिक असते. यामुळे इलेक्ट्रोलाइट संतुलन आणि स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. हिरव्या केळ्यांमधला ‘प्रतिरोधक स्टार्च’ उर्जा स्त्रोत प्रदान करतो, ज्यामुळे व्यायामादरम्यान उर्जा पातळी टिकवून राहते. सहसा व्यायामाच्या आधी हिरव्या केळ्यांचे सेवन फायद्याचे ठरू शकते.

मधुमेह किंवा पूर्व-मधुमेह असलेल्या व्यक्ती: पिकलेल्या केळ्यांच्या तुलनेत हिरव्या केळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, याचा अर्थ ते रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढवत नाहीत. यामुळे कच्ची केळी ही मधुमेह किंवा पूर्व-मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी एक योग्य स्नॅक्स पर्याय बनतो.

वजन कमी करण्यासाठी: हिरव्या केळीमध्ये भरपूर फायबर असते, जे कॅलरीजचे सेवन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्याचे लक्ष्य असलेल्या व्यक्तींसाठी हे फायदेशीर ठरू शकते कारण फायबर भूक आणि लालसा नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.

पाचक विकारांनी ग्रस्त असल्यास: हिरव्या केळ्यातील प्रतिरोधक स्टार्च प्रीबायोटिक म्हणून कार्य करते, यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारख्या पाचक समस्या असलेल्या व्यक्तींसाठी आहारात हिरव्या केळीचा समावेश केल्याने आराम मिळू शकतो व आणि पाचन विकारांशी संबंधित लक्षणे दूर होऊ शकतात.

हे ही वाचा<< रात्री किंवा संध्याकाळी उशिरा खाल्ल्याने वजन वाढतं का? लवकर जेवल्याने समजा रात्री पुन्हा भूक लागलीच तर काय खावं?

आता राहिला प्रश्न कच्ची केळी खावी कशी? तर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही खालील पदार्थ ट्राय करून पाहू शकता.

कच्च्या केळीची भाजी: हळद, जिरे आणि धणे यांसारख्या मसाल्यांमध्ये कच्च्या केळीची भाजी करता येते. अगदी कमी वेळात झटपट होणारा हा पदार्थ रोजच्या भाजीला उत्तम पर्याय ठरतो. कच्च्या केळीच्या भाजीत पीठ पेरल्यास चव आणखी खुलून येते.

कटलेट किंवा वडा: जे लोक बटाटा टाळतात त्यांच्यासाठी कच्च्या केळीचे वडे हे अगदी तंतोतंत चवीचा व आरोग्यदायी पर्याय ठरू शकतात. बटाटवड्याच्या रेसिपीत फक्त बटाट्याच्या ऐवजी ही कच्ची केळी वापरून आपण तळून घेऊ शकता. किंवा चपट्या टिक्की बनवून शॅलो फ्राय करू शकता.

कच्च्या केळ्याच्या चिप्स: हिरव्या केळीचे काप तळून कुरकुरीत आणि चवदार चिप्स बनवता येतात जे अनेक भारतीय घरांमध्ये लोकप्रिय स्नॅक आहेत.