Karela Uses Benefits Side Effects: आपल्या आहारातल्या फळभाज्या, शेंगभाज्या हे नुसते तोंडी लावणे नसते. या भाज्या आपल्या पोषणासाठी महत्त्वपूर्ण हात भार लावतातच शिवाय त्या बहुगुणी आहेत. विविध विकारांमध्ये त्या गुण देणाऱ्या असतात.   

गुणकारी कारले औषध म्हणून कसे वापराल?

आपल्या रोजच्या आहारात धान्ये, कडधान्ये यांचे जसे महत्त्व आहे तसेच महत्त्व फळभाज्यांना आहे. त्यांना नुसते ‘तोंडीलावणे’ असे न म्हणता मुख्य अन्नाबरोबर साहाय्यक अन्न म्हणून वाजवी सहभाग द्यायला हवा. गहू, भाताबरोबर फळभाज्या, शेंगभाज्या असल्या तर मानवी शरीराचे सम्यक् पोषण होते. फळभाज्यांमुळे आपल्या मोठ्या आतड्यात फायबरयुक्त पुरेसा मळ तयार होतो. आता या भाज्यांविषयी महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ!

कर्टोली

कर्टोली, कर्कोटी, कंकेली या नावाने झुडपाच्या आश्रयाने पावसाळ्यात वेल वाढतात. त्या वेलांवर सुरेख, हिरव्या रंगाची काटेरी फळे येतात. चवीला तिखट पण रुची आणणारी फळे चातुर्मासात धार्मिक महत्त्व म्हणून आवर्जून खाल्ली जातात. ही फळे अग्निमांद्य दूर करतात. स्वादिष्ट व पथ्यकर भाजी होते. पोटमुखी, वायुगोळा, कृमी, जंत, त्वचेचे विकार, दमा, खोकला, वारंवार लघवी होणे या विकारात कर्टोली हे फळ विशेष उपकारक आहे. मलप्रवृत्ती सुखकर होते.

करांदा

करांदा किंवा काटे कणंगचे कांदे शिजवून खावे. ते पौष्टिक नाहीत पण मूळव्याध, रक्त पडणे, पोट बिघडणे, अरुची, मंदाग्नी यावर उपयुक्त आहेत.

कारले

वीस-पंचवीस वर्षांच्या मागे कारले खाणारी महाराष्ट्रात फार थोडी माणसे भेटत. उत्तरेत, विशेषत: दिल्ली, राजस्थान, कानपूर या ठिकाणी पंजाबी डिशमध्ये मात्र आवर्जून ‘कारेला’ भाजी लोक आवडीने खाताना दिसायचे. गेल्या पंचवीस वर्षात आपल्यात खूप ‘सुधारणा’ झाली असे लोक म्हणतात. समृद्धी, पैसा, आराम आला. त्याबरोबर त्याचे रोगही आले. सर्व रोगांचा या जगातील राजा म्हणजे मधुमेह, त्याचा प्रचार, प्रसार जसा वाढतोय तसतसे कारले या भाजीचा महिमा, मागणी, किंमत, वापर वाढत चाललाय.

कारल्याचे बहुपयोगीत्व

कारले फळ, पाने, फळाची पावडर, रस अशा विविध स्वरूपात वापरले जाते. कारले खूप कडू असते. तशा अनेक भाज्या कडू आहेत. पण ‘संतर्पणोत्थ’ व्याधी म्हणजे जास्त खाऊ शकू अशी दुसरी भाजी नाही. कडू रसाचे पदार्थ, स्वत:ची चव खराब असली तरी अरुची, कृमी, विषविकार, खूप तहान लागणे इत्यादी कफ विकारात उत्तम काम देतात. कारले बहुमूत्र प्रवृत्ती, थकवा, ग्लानी, कृमी, जंत, मोठे जंत, कृमीमुळे होणारी सर्दी, खोकला, खाज, त्वचारोग, डोळे जड होणे, जीभ पांढरी होणे, जखमा चिघळणे, जखमांतून पू वाहणे, यकृत-प्लीहा वृद्धी, विषमज्वर, पांडू, अजीर्ण, शोथ, पित्तप्रकोप, आमवात इत्यादी विविध तीनही दोषांच्या तक्रारीत काम करते. मधुमेह, मधुमेही जखमा, स्थौल्य व स्तनांचे विकार यावरती कारले विशेष प्रभावी कार्य करते. औषध म्हणून चांगल्या कारल्याची निवड असावी. सरळ आकाराची, फार जून नाही अशी कारली उपयोगी आहेत. लहान बालकांच्या मधुमेहात शक्यतो कारले हे फळ वापरू नये.

मधुमेहावर गुणकारी

कारल्याच्या पानांचा रस विषमज्वर व यकृत प्लीहावृद्धीमध्ये परिणामकारक उपाय देतो. विषमज्वर किंवा टायफाईड हा खराब पाणी व त्यातील जंतूंमुळे उद्भवणारा विकार आहे. अन्नवह महास्रोतसांत हे जंतू पुन:पुन्हा ज्वर उत्पन्न करतात. ताप नॉर्मल येऊ देत नाहीत. त्याकरिता कारल्याच्या पानांचा रस प्यावा. यकृत प्लीहा वाढलेली नसताना अग्नीचे बल कमी पडते. रक्तातील श्वेत कण वाढतात. अशा वेळी कारल्याचा पानांचा रस यकृत व प्लीहेच्या उत्तेजनाचे काम करतो. त्यामुळे नवीन जोमाने रक्त बनू लागते. बालकांचा कफ ही एक समस्या असते. त्यांना ओकारी सहजपणे झाली तर बरे वाटते. त्याकरिता कारल्याच्या पानांचा चमचा दोन चमचे रस उत्तम काम देतो. लहान बालकांचा दमा, यकृत-प्लीहा शोथ, हातापायाच्या काड्या या विकारात पानांचा रस फार प्रभावी उपाय आहे. बालकांचे पोट साफ होते. मुले वाढीला लागतात. मधुमेहात तळपायांची आग होते. त्याकरिता कारले पानांचा रस प्यावा. रातांधळे विकारात डोळ्यावर बाहेरून कारल्याच्या पानांचा रस व मिरपूड असा लेप लावावा.

मधुमेहाकरिता कारले रस, पावडर, भाजी यांचा सर्रास प्रचार चालू आहे. इथे थोड्या तारतम्याची गरज आहे. ताज्या कारल्याचा रस फार प्रभावी आहे. तरुण बलवान, भरपूर रक्तशर्करा वाढलेल्या मधुमेही रुग्णाला पहिले चार-आठ दिवस कारल्याचा पाव अर्धा कप रसाने बरे वाटते. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी रक्तशर्करा तपासावी. ती खूप कमी असेल तर कारले रसाचे प्रमाण कमी करावे. कारल्याचा रस घेऊन ज्यांना गरगरू लागते, त्यांनी रस घेणे लगेच थांबवावे. अर्धा चमचा साखर किंवा खडीसाखरेचा खडा खावा. वृद्ध रुग्णांनी, आठ वर्षांच्या वरच्या मधुमेंहींनी कारल्याच्या फळाचे सावलीत वाळवून केलेल्या चूर्णाचा वापर करावा. त्याचे प्रमाण कमी-जास्त करता येते. लघवीला वास येणे जोपर्यंत आहे, लघवी गढूळ आहे तोपर्यंत कारले चूर्ण नियमित घ्यावे. लघवीचा वर्ण निवळला की प्रमाण कमी करावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्तातील साखरेचे नियंत्रण झाल्यावर कारल्याचे लोणचे, कमी गूळ घालून केलेले पंचामृत, कारल्याचा कडूपणा कमी करून तयार केलेली भजी असा वापर चालू ठेवावा. पित्तविकार, सांधेदुखी, मधुमेहात वजन घटणे या तक्रारी असणाऱ्यांनी कारले खाऊ नये. पंजाबी ढंगाची भरपूर तेल, डालडा असलेली भाजी काहीच गुण देणार नाही.