Ishaan Khatter : अभिनेता ईशान खट्टरने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या ‘धडक’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेदार किस्सा सांगितला, ज्यामध्ये त्याला एका सीनसाठी प्लेटभर हिरव्या मिरच्या खाव्या लागल्या होत्या. “मिरची खाणे हे माझे ‘धडक’ चित्रपटासाठीचे प्रेम समजावे. चित्रपटात एका खाण्याच्या स्पर्धेत मी मिरच्या खाल्ल्या; पण मी खऱ्या मिरच्या खाल्ल्या. मला मिरच्यांबरोबर गूळ आणि तूपही देण्यात आले होते”, असे त्या सीनचा किस्सा सांगताना ईशान खट्टर म्हणाला.
ईशान पुढे सांगतो की, ‘धडक’ चित्रपटाच्या टीममधील सदस्य मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करीत होते, त्यामुळे आम्ही तो सहा तास खाण्याचा सीन शूट करू शकलो आणि मला फारसा जास्त त्रास झाला नाही. खरंच तूप आणि गूळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तूप आणि गुळामुळे मिरच्यांचा तिखटपणा दूर होतो का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.
पण तूप आणि गूळ कसे फायदेशीर?
मिरच्यांमध्ये कॅप्सेसिन (Capsaicin) नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे मिरचीला तिखट चव येते. “कॅप्सेसिन हे तेलात शोषले जाते; पण पाण्यात शोषले जात नाही. त्यामुळे मिरची खाल्यानंतर पाणी प्यायल्याने फायदा होत नाही; पण फॅट्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते.
तूप हा एक आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ आहे, जो तुम्ही मसालेदार पदार्थांबरोबर खाऊ शकता. कारण- त्यातील फॅट्स कॅप्सेसिनला शोषून घेतात. त्यामुळे मिरची खाल्यानंतर तिखटपणा जाणवत नाही आणि त्रास कमी होतो. फॅट्स तुमच्या तोंडात आणि घशात एक आवरण तयार करतात, ज्यामुळे आपण तिखटपणा सहन करू शकतो”, असे आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा सांगतात.
दुसरीकडे गूळ आणि साखर खाल्याने मिरचीमधील कॅप्सेसिन शोषले जात नाही. पण त्यांच्यातील गोडव्यामुळे तत्काळ आराम मिळतो. “तुमचे जेवण अधिक उत्तम होते. कारण- गुळाची गोड चव जळजळ थांबवते आणि तुमचे लक्ष इतरत्र वळवते. नैसर्गिक गोडवा असल्याने, गूळ साखरेइतकाच प्रभावी आहे,” असे मल्होत्रा सांगतात.
जेव्हा तुम्ही तूप हे साखर किंवा गुळाबरोबर एकत्र करून खाता तेव्हा तुम्हाला चांगला फायदा दिसून येतो. साखर किंवा गुळाचा गोडवा मिरचीचा तिखटपणा कमी करतो आणि तुपातील फॅट्स मिरचीतील उष्णता ओढून घेतात.
“या सोप्या पद्धतीमुळे पारंपरिक भारतीय रेसिपींमध्ये संतुलित, पोटभर जेवणासाठी थोडेसे तूप आणि गोड पदार्थांचा समावेश केला जातो”, असे मल्होत्रा सांगतात.