Migraines home remedies: ताण, बदललेली जीवनशैली या गोष्टींचा विचार करता आजच्या व्यस्त जीवनात डोकेदुखी ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, डोकेदुखी कायम राहिल्यास ते मायग्रेनदेखील असू शकते. डोक्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, जो मोठा आवाज किंवा प्रकाशाने वाढू शकतो. याव्यतिरिक्त अस्वस्थता, चक्कर येणे, उलट्या आणि मळमळ यांसारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात. मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक पेन किलरचा सहारा घेतात. मात्र, या औषधांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत मायग्रेनच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. अमृता हॉस्पिटल, फरिदाबाद येथील न्यूरोलॉजीचे सल्लागार डॉ. दीपक यादव यांनी यासंदर्भात दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

लिंबू आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. परंतु, काही वेळा लिंबाचे अतिसेवन आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. पण, खरंच कच्चे लिंबू खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो का? डॉ. दीपक यादव म्हणतात की, लिंबू मायग्रेनवर उपाय असल्याचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी तुम्ही इतर पर्याय वापरून पाहू शकता.

“कच्चे लिंबू हा उपाय नसला तरी गरम कॉम्प्रेस कापड किंवा गरम पाण्यात पाय भिजवल्याने मदत होऊ शकते,” असे डॉ. यादव यांनी स्पष्ट केले. “कपाळावर, कानाच्या कोपऱ्यावर किंवा मानेच्या मागच्या बाजूला उबदार कापड लावल्याने ताणलेल्या स्नायूंना आराम मिळू शकतो आणि रक्ताभिसरण सुधारू शकते. यामुळे डोकेदुखीची तीव्रता कमी होऊ शकते आणि मळमळ किंवा प्रकाशाची संवेदनशीलता यांसारखी काही संबंधित लक्षणे कमी होऊ शकतात”, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ते पुढे म्हणतात, “गरम केलेले कापड किंवा पॅड वापरल्याने मान आणि पाठीच्या वरच्या स्नायूंना सतत उष्णता मिळू शकते”, ज्यामुळे मायग्रेनचा ताण कमी होण्यास मदत होते. जर उबदार कापड उपलब्ध नसेल, तर गरम पाण्याने अंघोळ करा, कारण त्याच्या उबदारपणाचा परिणाम होऊ शकतो, असे डॉ. यादव यांनी सुचवले. उष्णता स्नायूंना आराम देऊ शकते आणि डोके आणि मानेच्या भागात ताण कमी करू शकते, जे मायग्रेनदरम्यान तणावाचे सामान्य क्षेत्र आहेत.

तीव्र मायग्रेन बहुतेकदा वेदनादायक असतात. यावेळी मोठा आवाज, वाढलेला स्क्रीन टाइम, तीव्र सुगंध, तापमानात बदल किंवा प्रकाशाच्या संपर्कात येणे यांसारख्या विविध कारणांमुळे हा त्रास जास्त वाढू शकतो.

पुदिना

मायग्रेनपासून आराम देण्यासाठी पुदिना प्रभावी ठरू शकतो. वास्तविक त्यात मेन्थॉल आढळते, जे डोके थंड करते आणि डोकेदुखी कमी करण्यास मदत करते. मायग्रेन झाल्यास कपाळावर पुदिन्याचे तेल लावून हलक्या हाताने मसाज करा, यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.

आले

आल्यामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही आल्याचा चहा घेऊ शकता. यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मिळू शकतो. याव्यतिरिक्त मळमळ आणि उलट्यांपासूनदेखील आराम मिळू शकतो.

गाईचे तूप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरीर व मस्तकातील अतिरिक्त पित्त संतुलित करण्यासाठी गाईचे तूप उत्तम उपाय मानला जातो. या तुपाचा वापर तुम्ही जेवणात करू शकता. पोळीवर किंवा भातावर तूप घेऊन तुम्ही त्याचे सेवन करू शकता.