बरेच लोक डोळे सुंदर दिसावेत म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. लग्न, पार्टी, कोणत्याही कार्यक्रमात इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी हल्ली तरुणाई या कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करते. तसेच ज्यांना चष्मा आहे असे लोकही काही वेळा कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. परंतु या कॉन्टॅक्ट लेन्स वेगवेळ्या केमिकल्सपासून बनवल्या जात असल्याने तुम्हाला अनेक मोठे आजार होण्याचा धोका वाढतोय, हे बहुतेकांना माहीत नसते. तुमचा विश्वास बसणार नाही पण शास्त्रज्ञांना १८ लोकप्रिय कॉन्टॅक्ट लेन्समध्ये कार्बनिक फ्लोरीन सर्वात उच्च पातळी आढळली आहे. जे परफ्लूरोआल्किल आणि पॉलीफ्लोरोआकाइल पदार्थांच्या पीएफएएसचा एक मार्कर आहे. हे केमिकल्स शरीरात कॅन्सरच्या पेशी सक्रिय करण्याचे काम करतात. याबाबत एक संशोधन झाले असून त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

कॉन्टॅक्ट लेन्समुळे होऊ शकतो कॅन्सर?

‘द गार्डियन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अमेरिकेतील अनेक सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्स या मोठ्या प्रमाणात विषारी आणि कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपासून बनलेल्या असतात. संशोधकांनी १८ प्रसिद्ध अशा कॉन्टॅक्ट लेन्सची चाचणी केली. या वेळी प्रत्येक कॉन्टॅक्ट लेन्समध्ये पॉलीफ्लोरोआकाइल पदार्थाच्या (पीएफए) एका मार्करमध्ये कार्बनिक फ्लोरीनची उच्च पातळी आढळली आहे. यावरून जर खूप वेळ तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केल्यास शरीरातील कॅन्सरच्या पेशी सक्रिय होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्ही कॅन्सरचे शिकार होऊ शकता असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

यातील पीएफएएस हा १४००० केमिकल्सचा एक ग्रुप आहे जो सामान्यतः विविध गोष्टींमध्ये वॉटर रेजिस्टन्स किंवा हीट रेजिस्टन्स बनवण्यासाठी वापरला जातो. यामुळे उष्णता आणि पाण्याचा त्या गोष्टीवर काहीही फरक पडत नाही. जसे की कपडे, फर्निचर, पॅकेजिंग आणि वायरिंगसह अनेक घरगुती वस्तू चिकटवण्यासाठी वापरला जातो. हे एक मजबूत केमिकल असते जे नैसर्गिकरित्या तुटत नाही.

होऊ शकतात ‘हे’ इतर आजार

पीएफएएस हे मानवनिर्मित केमिकल आहे जे वातावरणात दीर्घकाळ टिकून राहते. हे फ्लोरिन आणि कार्बनचे मिश्रण करून तयार केले जाते. पीएफएएस कॅन्सर, गर्भधारणेतील गुंतागुंत, यकृताचे रोग, मूत्रपिंडाचे रोग आणि ऑटोइम्यून विकार यांसारख्या अनेक समस्यांशी देखील जोडलेले आहे. मात्र कॉन्टॅक्ट लेन्सशी संबंधित या संशोधनात आणखी संशोधन होण्याची गरज आहे, पण तुम्ही वापरताना काळजी घ्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काँटॅक्ट लेन्सची निवड करा.