X-ray in Tuberculosis Test: द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, लक्षणांवर आधारित वापरले जाणारे छातीचे एक्स-रे संक्रमित रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये लक्षणे नसलेला टीबी संसर्ग शोधण्यासाठी पुरेसा नाही. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन विद्यापीठातील संशोधकांनी तिथल्या तीन समुदायांमध्ये फुप्फुसाच्या क्षयरोग (पल्मोनरी टीबी) रूग्णांच्या ९७९ जवळच्या नातेवाईकांच्या थुंकीतील सूक्ष्मजीवांची वैज्ञानिक चाचणी केली. यावरून संशोधकांनी काही निष्कर्ष काढले आहेत.
संशोधन कसे केले गेले?
संशोधकांच्या टीमने कुटुंबातील ५.२ टक्के सदस्यांमध्ये फुप्फुसीय क्षयरोगाची खात्री केली आणि त्यापैकी ८२.४ टक्के रूग्ण लक्षणे नसलेले होते. चिंताजनक बाब म्हणजे छातीचे रेडिओग्राफ ४० टक्के प्रकरणांमध्ये चुकले.
तज्ज्ञ काय म्हणतात?
टीबीची खात्री झालेल्या ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कोणतीही लक्षणे आढळत नाहीत, छातीच्या रेडिओग्राफ तपासणीत यापैकी ४० टक्क्यांहून अधिक प्रकरणे चुकतात, अशी माहिती विद्यापीठातील दक्षिण आफ्रिकन क्षयरोग लस उपक्रमाचे प्रमुख लेखक डॉ. सायमन सी मेंडेलसोन यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, २०२३ मध्ये जगभरात टीबीने ग्रस्त असलेल्या अंदाजे १.०८ दशलक्ष लोकांपैकी अंदाजे २५ टक्के लोकांचे निदान किंवा उपचार होणार नाहीत. या लोकांना शोधून त्यांच्यावर उपचार करणे महत्त्वाचे असले तरी त्यापैकी बहुतेकांना लक्षणे नसणे हे आव्हान आहे.
सार्वजनिक प्रसार सर्वेक्षणांमध्ये आढळलेल्या सर्व क्षयरोगाच्या प्रकरणांपैकी अर्ध्याहून अधिक रूग्णांना लक्षणे नसलेले म्हणून वर्गीकृत केले जाते, म्हणजे ज्यांना खोकला, ताप, रात्री घाम येणे आणि वजन कमी होणे यासारखी टीबीची लक्षणे नाहीत किंवा ते ओळखत नाहीत किंवा तक्रार करत नाहीत. ही माहिती सर्वेक्षणाच्या कागदपत्रात दिली आहे.
या अभ्यासात नातेवाईकांमध्ये लक्षणे नसलेल्या टीबीमध्ये कमी बॅक्टेरियाचा भार होता आणि कमी सीरम सी रिअॅक्टिव्ह प्रोटीन एकाग्रतेशी देखील संबंधित होता. तो निरोगी व्यक्तींपेक्षा वेगळा नव्हता.
लक्षणे नसलेल्या क्षयरोगासाठी छातीच्या रेडिओग्राफ स्क्रीनिंगची संवेदनशीलता फक्त ५६.१ टक्के होती. सर्व प्रकारच्या टीबीची एकत्रित लक्षणे आणि छातीच्या रेडिओग्राफ स्क्रीनिंगची संवेदनशीलता ६४.० टक्के इतकी थोडी जास्त होती. “घरगुती संपर्कांमधून मिळालेल्या निकालावरून असे दिसून येते की, लक्षणे आणि छातीच्या रेडिओग्राफवर आधारित पद्धती सार्वजनिक टीबी तपासणीसाठी पुरेशी नाही”, असे मेंडेलसोन यांनी सांगितले.
