Diabetes and strawberries: फळं खरं तर आपण विचार करतो त्यापेक्षा अनेक पटीने शरीरासाठी फायदेशीर असतात. एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सर्वात आवडते उन्हाळी फळ शरीरासाठी किती प्रभावी ठरू शकते. संशोधकांना असे आढळले आहे की, दररोज स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने प्रीडायबिटीज असलेल्या प्रौढांमध्ये रक्तातील साखर कमी होण्यास, जळजळ कमी होण्यास आणि अँटी-ऑक्सिडंट्सची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. यामुळे मधुमेह प्रतिबंधासाठी एका साध्या फळाचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.
मधुमेह प्रतिबंधासाठी स्ट्रॉबेरी कशी फायद्याची ठरते?
साधारण चयापचय आणि टाइप-२ डायबिटीज यांच्यातील प्रीडायबिटीज हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये रक्तातील साखरेमध्ये सौम्य वाढ आणि इन्सुलिन प्रतिरोधकता दिसून येते. न्यूज मेडिकल डॉट नेटच्या अहवालानुसार, या असंतुलनामुळे अनेकदा ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ होते. हे दोन प्रमुख घटक स्वादुपिंडाच्या पेशींना नुकसान करतात आणि इन्सुलिन प्रतिसाद बिघडवतात.
नवीन संशोधनातून असे दिसून आले की, स्ट्रॉबेरी प्रीडायबिटीजशी लढण्यास मदत करू शकतात. १२ आठवड्यांच्या एका अभ्यासात असे आढळून आले की, दररोज फ्रीजमध्ये साठवलेल्या स्ट्रॉबोरीमुळे अँटी-ऑक्सिडंटची पातळी वाढते. जळजळ कमी होते आणि उपवासावेळी रक्तातील साखर नियंत्रित राहते. हे चयापचय आरोग्यासाठी फायदेशीर मार्ग आहे. स्ट्रॉबेरी टाइप २ मधुमेहाची प्रगती रोखण्यास मदत करू शकतात.
जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते, तेव्हा शरीर अधिक रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज तयार करते, जे इन्सुलिनच्या कार्यात व्यत्यय आणू शकते. कालांतराने यामुळे दीर्घकालीन दाह होतो. त्यामुळे ग्लुकोज नियंत्रणात आणखी व्यत्यय येतो आणि ह्रदयरोगाचा धोका वाढतो. फळे आणि भाज्यांमधील अँटी-ऑक्सिडंट्स या परिणामांना तोंड देऊ शकतात हे संशोधकांना आधीपासूनच माहीत आहे. मात्र, या अहवालानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील शोषण फरकांमुळे वास्तविक जगातील फायद्यांमध्ये विसंगती आहे. स्ट्रॉबेरी अँथोसायनिन्स, एलेजिक अॅसिड आणि पॉलिफेनॉल सारख्या शक्तिशाली वनस्पती संयुंगांनी भरलेल्या असतात. संशोधकांच्या अभ्यासात आढळल्याप्रमाणे, स्ट्रॉबेरीचे ठराविक मर्यादेत सेवन केल्याने फायदे होऊ शकतात.
स्ट्रॉबेरी मधुमेह आणि ह्रदयरोगाशी संबंधित रक्तवाहिन्यांच्या नुकसानाच्या सुरूवातीच्या टप्प्यांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात असे संशोधकांनी म्हटले आहे.
वैद्यकीय किंवा जीवनशैली व्यवस्थापनाची जागा स्ट्रॉबेरी घेऊ शकत नसली तरी प्रतिबंधात्मक आहारात स्ट्रॉबेरीची भूमिका अधोरेखित होते. अँटी-ऑक्सिडंट क्षमता वाढवून, जळजळ कमी करून आणि उपवासातील ग्लुकोज सुधारून स्ट्रॉबेरी प्रीडायबिटीज असलेल्या लोकांना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
निकालांनुसार, केवळ पूरक आहारावर अवलंबून राहण्याऐवजी स्ट्रॉबेरीसारख्या अँटीऑक्सिडंट समृद्ध फळांचा समावेश करणे दीर्घकालीन आरोग्यसुधारण्याचा एक सोपा आणि फायदेशीर मार्ग असू शकतो.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स– स्ट्रॉबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे ती रक्तातील साखर पटकन वाढवत नाही.
फायबरने भरपूर– स्ट्रॉबेरीमध्ये फायबचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात साखर शषण्याची गती कमी होते. त्यामुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.
अँटी-ऑक्सिडंट्स– स्ट्रॉबेरीमध्ये अँथोसायनिनसारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ते इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यास आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
कमी कॅलरी आणि साखर– स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरी आण साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्या मधुमेहाच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी एक चांगला पर्याय आहेत.
