महिना झाला माझ्या डिप्रेशनसाठी थेरपी सुरू करून. सुरुवातीला डायरी लिहायचा खूप कंटाळा यायचा. वाटायचं काय लिहायचं डायरीत? काही घडतच तर नाही आपल्या आयुष्यात. पण एक दिवस कशाचे तरी खूप वाईट वाटले. पहिल्यांदाच डायरी लिहिली. नुसते मनातले कागदावर उतरल्यावरसुद्धा इतके बरे वाटले! मन मोकळे झाले! पण तेवढेच पुरेसे नव्हते. घरच्या अभ्यासाची पुढची पायरी चढले. मनात वाईट वाटले, त्यावेळेस काय प्रसंग घडला आणि मनात काय काय विचार आले आणि मग मी काय केले उदा. खूप रडले, झोपून गेले, जेवले नाही इत्यादींची नोंद करायला शिकले. एक सूत्र मलाच समजले. विचार- भावना- वागणे यांच्यातले नाते स्पष्ट झाले. मनातल्या विपर्यस्त विचारांची (cognitive distortions) दिशा कशी बदलायची, हे ही मी पुढे जाऊन शिकले!
आणखी वाचा: Health Special: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार …
“आज एका मुलाकडून मला लग्नासाठी नकार आला. खूप धक्का बसला. वाटले आता मी कोणाची बायको कधी होऊच शकणार नाही!” हे वाक्य वाचले. केवढा मोठा ‘अनर्थ’! जणू आपत्ती कोसळली! (catastrophization) आपल्याच विचाराचे मला हसू आले. पण लगेच पुढची शंका आली, “म्हणजे मी लग्नाच्या बाजारात हरलेच नाही का? पुन्हा एक अपयशी!” स्वतःलाच एक बिरूद लावले. (labelling) अशा विचारांना पर्यायी आणि अधिक वास्तववादी विचार कसा करायचा हे नुकतेच शिकले होते. “मी काही १०० स्थळे पाहिलेली नाहीत, की सगळ्यांनीच मला नकारही दिलेला नाही. मी नाही का दोन जणांना नकार दिला? मग एका ठिकाणाहून नकार आला म्हणून काय झाले? अजून भरपूर संधी आहे कोणाची तरी बायको होण्याची!” “उद्याचे प्रेझेन्टेशन मला नीट केलेच पाहिजे. मागच्या वेळेला सगळ्यांना माझे प्रेझेन्टेशन आवडले हे खरे, पण त्यात काही विशेष नव्हते. (minimization) कोणालाही जमले असते. हुरळून जाण्यासारखे त्यात काही नाही. उलट उद्या मात्र माझ्या कौशल्याचा कस लागणार आहे. ते नाही जमले ना, तर कोणी मला वाचवू शकत नाही. मग प्रमोशन तर सोडाच पुढेही कधी संधी मिळणे कठीण! मी एक कायमचा failure (अयशस्वी) म्हणून सिद्ध होईन.” मनातल्या अशा विचारांना मी आव्हान दिले. येवू शकणाऱ्या अपयशाचा एवढा बाऊ (maximization), पण झालेले कौतुक मात्र नगण्य (minimization) मानायचे!
आणखी वाचा: Health Special: बाईपण भारीच देवा
स्वतःला समजावताना सगळ्यात प्रथम मी स्वतःलाच सांगितले, की मी नेहमी परफेक्ट असू शकत नाही. माझे प्रत्येक काम अस्सेच असले पाहिजे, उत्तमच झाले पाहिजे आणि तसे नाही झाले तर माझ्यात काहीतरी कमतरता आहे, (should and must statements) हे वाटण्याची आवश्यकता नाही. तसेच ज्या अर्थी माझे एक प्रेझेन्टेशन लोकांना आवडले, त्या अर्थी मला जमते. उद्याचे प्रेझेन्टेशन महत्वाचे आहे, त्यामुळे तयारी करावी लागेल, पण ते चांगले होण्याची शक्यता खूप आहे. तरीही दुसऱ्या दिवशी प्रेझेन्टेशन झाल्यावर माझ्या सहकाऱ्याकडे पाहताना वाटले, तो मनात म्हणतोय, ‘काय उगाच काहीही मांडतो! प्रत्यक्ष काम करायची वेळ आली की वाट लागेल याची.’ एकदम दुखावलो गेलो.(mind reading) मग लक्षात आले की प्रत्यक्षात जर त्याने काही म्हटले तर त्याचा विचार करता येईल की, उगाच कल्पना का करा?
‘आज भाजीत मीठ जरा जास्त झाले होते. पण कोशिंबीर फारच छान झाली होती. काहीतरी स्पेशल होती वाटते.’ नवऱ्याने आल्या आल्या सांगितले आणि माझ्या डोळ्यात पाणीच आले. ‘इतके कष्ट करते मी, पण चांगली गृहिणी होणे काही मला जमत नाही. नेहमीचेच आहे हे. मला स्वयंपाक कधीच
चांगला जमत नाही. नेहमीच ऐकून घ्यावे लागते. माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे, म्हणून सगळ्यांना माझ्याविषयी असे वाटते. मन निराश झाले. अनायासे थेरपीचे सेशन होते. माझ्या थेरापिस्टशी चर्चा करताना लक्षात आले, ‘नवरा एका गोष्टीवर टीका करतो आहे, पण दुसरीकडे स्तुतीही करतो आहे. माझ्या कानात मात्र फक्त टीकाच गेली. (mental filter) एकदा मीठ जास्त झाले म्हणजे कधीच स्वयंपाक चांगला जमणार नाही हे मी कसे ठरवले? (overgeneralization) प्रत्येक गोष्टीत माझा काहीतरी दोष असतोच असे नाही! (personalization)
मनात विचारांचे असे अनेक दोष असतात. प्रत्येक माणसात असतात. नेहमीच्या आयुष्यात मनात येणाऱ्या विचारांची दिशा योग्य ठेवता येते, अधूनमधून मन भरकटले तरी त्याला पुन्हा मार्गावर आणता येते. डिप्रेशन किंवा अतिचिन्तेच्या मानसोपचारात विचारांना योग्य दिशा मिळवून देण्याचे, विपर्यस्त विचार काढून टाकून त्या जागी सकारात्मक, तसेच वास्तववादी विचार कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले जाते. उपचार करणारा आणि ते घेणारा दोघाच्या चर्चेतून हे घडते.
हे करताना काही तंत्रांचा आवर्जून उपयोग केला जातो. सत्र संपताना काही गृहपाठ दिला जातो, ज्यायोगे सुरुवातीला विचार, भावना न वागणे यांच्यातला दुवा समजतो. त्या नंतर आपल्या दैनंदिन जीवनात घडलेल्या प्रसंगांमधले आपले विचार, आपल्या भावनिक प्रतिक्रिया या ओळखायला शिकता येतात. त्यानंतर, अयोग्य विचाराला पर्यायी विचार कोणता हे ही ठरवता येते. एका सेशन पासून पुढच्या सेशन पर्यंत अशा प्रकारे आपल्यातला बदल पक्का करता येतो, शिकलेले सारे प्रत्यक्ष जीवनात उपयोगात आणता येते. औषधांबरोबरच मानासोपचारही मनोविकारांच्या उपचारात महत्त्वाचे आहेत. औषधांनी जे बदल मेंदूत दिसून येतात, तेच बदल मानासोपचाराने देखील आढळून येतात, ज्यातून रुग्णामध्ये झालेली सुधारणा समजते. अशा प्रकारे शास्त्रासिध्द अशा या उपचारांचा उपयोग अवश्य केला पाहिजे.