Weight Gain Causes: गेल्या काही वर्षांमध्ये वजन वाढीची समस्या झपाट्याने वाढलेली दिसत आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतात. तुम्हीसद्धा सॅलेड खात असाल, जिमला जात असाल, गोड पदार्थ खाणे टाळत असाल तरीसुद्धा तुमचे वजन कमी होत नसेल आणि उलट वाढत असेल तर तुम्ही एकटे नाहीत, असे अनेक जण आहेत जे या समस्येचा सामना करत आहेत. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतानासुद्धा काही लोकांच्या पदरी निराशा येते. इच्छाशक्ती असूनही त्यांचे ध्येय ते गाठू शकत नाही, याला जबाबदार तुमच्या काही दुर्लक्षित, वाईट दैनंदिन सवयी असू शकतात.
वजन कमी करणे म्हणजे फक्त कॅलरी कमी करणे नव्हे किंवा जिममध्ये जाऊन तासनतास वर्कआउट करणे नव्हे. तुमची झोप, ताण तणाव, दिनचर्या आणि मानसिकतेशी संबंधित हे एक समीकरण आहे, ज्याचा वजनावर थेट परिणाम दिसून येतो.
आहारतज्ज्ञ सल्लागार कनिक्का मल्होत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपण दररोज करत असलेल्या सहा सामान्य चुका सांगितल्या आहेत, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
१. काही सवयी आपल्याला खूप किरकोळ वाटतात, पण त्याचा परिणाम खूप खोलवर होतो आणि या सवयी वजन नियंत्रणात अडथळा निर्माण करू शकतात. तुम्ही सकाळचा नाश्ता करणे टाळता का? असे करू नका, कारण जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता करत नाही तेव्हा शरीरातील चयापचय क्रिया आणि रक्तातील संतुलन बिघडते, ज्यामुळे भुकेचे हार्मोन तयार होतात व त्यानंतर जेव्हा आपण काही खातो, तेव्हा कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते.
२. शरीराच्या तृप्ततेचे संकेत मेंदूपर्यंत पोहचायला जवळपास १५-२० मिनिटांचा कालावधी लागतो. जर १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत जेवण आटोपले तर पोट भरल्यासारखे वाटत नाही आणि आपण जास्त कॅलरीजचे सेवन करतो, ज्यामुळे वजन वाढते.
३. सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि कॉफीच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये २५ ते ४० ग्रॅमपर्यंत साखर असते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढते आणि पोट भरल्यासारखे वाटत नाही आणि जास्त फॅट जमा होते.
४. जेव्हा लोक स्क्रीनसमोर काम करताना किंवा एकाच वेळी अनेक कामे करताना स्नॅक्स खातात, तेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही की आपण किती प्रमाणात खातोय, ज्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त प्रक्रिया केलेले स्नॅक्स आपण खातो.
५. जे लोक दररोज रात्री ६-७ तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्यांची घरेलिन आणि लेप्टिनची (ghrelin and leptin) पातळी बिघडते, ज्यामुळे साखरयुक्त स्नॅक्स आणि पांढरा भात, सॉफ्ट ड्रिंक्स, पेस्ट्री, केक, मैद्याचे पदार्थ इत्यादी रिफाइंड कार्बोहायड्रेट्स खाण्याची इच्छा वाढते.
६. तुम्हाला कामाचा ताण तणाव आहे का? अनियंत्रित तणावामुळे कॉर्टिसोलच्या पातळीत वाढ होते आणि पोटाभोवती फॅट जमा होते, ज्यामळे चयापचयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. जेवणाच्या वेळेचे नियोजन करून, योग्य हायड्रेशनसह गोड नसलेले पेयांचे सेवन करून, दररोज रात्री ७-९ तास झोप घेऊन आणि ताण कमी करण्यासाठी ध्यानासारख्या पद्धतीचा सराव करून तुम्ही वजन नियंत्रणात आणि चयापचय आरोग्यामध्ये सुधारणा आणू शकता.
वजन कमी करण्यासाठी या दैनंदिन सवयींमध्ये चांगला बदल कसा करता येईल?
मल्होत्रा सांगतात, “वजन कमी करणे ही सावकाश होणारी प्रक्रिया असली पाहिजे, कारण यासाठी मानसिक आणि शारीरिक होकारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तुमच्या शरीराच्या वजनाच्या ५ ते १० टक्के वजन कमी करण्यासाठी तुम्ही छोटी ध्येय ठरवा, जे अगदी सोपे आहेत आणि ते दीर्घकाळ टिकेल.”
त्या पुढे सांगतात, “वैयक्तिक गरजांनुसार तुम्ही दिनचर्येत बदल करा. एकाच वेळी एकच सवय बदला. (जसे की सकाळी वेळेत नाश्ता करणे, नियमित चालणे इत्यादी सवयी दिनचर्येत समाविष्ट करा.) त्या सवयी अंगीकारा. स्वत:ला वेळ द्या.”