Can Lobia, Chavali or Black Eyed Beans Cure Thyroid: वजन कमी करण्यासाठी काय करावे यासाठी जगभरातील प्रत्येक सल्ला जर एकत्र घेऊन पुस्तक छापलं तर ते वाचेपर्यंतच माणूस थकून जाईल. हे सल्ले कदाचित एखाद्या व्यक्तीसाठी फायद्याचे ठरू शकतात तर एखाद्यासाठी याने नुकसान होऊ शकते. साहजिकच जीवनशैली, वास्तव्याचे ठिकाण, वय, लिंग सर्व गोष्टींचा वजनाशी व परिणामी वजन नियंत्रणात ठेवण्याशी संबंध असतोच. काही वेळा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आपण असेल उपाय करतो ते आपल्या चयापचयावर तसेच हार्मोन्स संतुलनावर विपरीत परिणाम करू शकतात व थायरॉईड, पीसीओडी सारख्या स्थिती उद्भवू शकतात. अलीकडेच या शक्यतेवर आधारित पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टच्या मथळ्यानुसार, चवळीची भाजी वजन व थायरॉईड नियंत्रणात मदत करू शकते असा दावा करण्यात आला आहे.
चवळीच्या व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिलंय?
पोषणतज्ज्ञ सिमरन वोहरा यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, “चवळी ही वजन कमी करण्यास मदत करते. त्याचा उष्मांक कमी असून, त्यात फोलेट, प्रथिने आणि लोह यांचा मुबलक साठा असतो. १०० ग्रॅम चवळीमध्ये सुद्धा सुमारे ४४ टक्के फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करू शकते. हे फायबर शरीरातून विषारी घटक, अनावश्यक फॅट्स, व सेल्युलाइट काढून टाकण्यास मांडतात करतात. या विरघळणाऱ्या फायबरमुळे कोलेस्ट्रॉल आटोक्यात राहते, विशेषतः ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी चवळी अत्यंत फायदेशीर आहे.”
चवळीमुळे थायरॉईड नियंत्रणात राहण्यास खरंच मदत होते का?
डॉ संतोष पांडे, निसर्गोपचार आणि ॲक्युपंक्चर, रेजुआ एनर्जी सेंटर, मुंबई यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, चवळी ही ‘सुपरबीन्स’ म्हणून ओळखली जाते, यात प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स, भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे असतात. “थायरॉईडच्या वाढीस कारणीभूत ठरणारे हार्मोन्स तसे तर, शरीरातील अनेक हालचालींना नियंत्रित करण्यात मदत करतात, पण जेव्हा याच्या प्रमाणात गरजेपेक्षा जास्त वाढ होते तेव्हा लोकांना थकवा, केस गळणे, वजन वाढणे, मूड बदलणे आणि बद्धकोष्ठता यांसारखी लक्षणे जाणवतात. यावर उपचार सुचवायचा तर प्रामुख्याने निरोगी आहार आणि जीवनशैली स्वीकारणे आपल्या हातात आहे. चवळीमधील झिंक हे अशा हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते म्हणून इतर उपायांसह जोडून आपल्या आहारात चवळीचा समावेश करणे हे थायरॉईडमध्ये मदत करू शकते
दुसरीकडे, डॉ शुचिन बजाज, संस्थापक-संचालक, उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की याला कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. चवळी (ब्लॅक-आयड बीन्स) थेट थायरॉईड नियंत्रित करू शकतात हे सिद्ध झालेले नाही. थायरॉईड ग्रंथी प्रामुख्याने शरीरातील हार्मोन्स आणि पोषक तत्वांद्वारे नियंत्रित केली जाते, जसे की आयोडीन, सेलेनियम आणि जस्त. थायरॉईडवर नियंत्रणासाठी आवश्यक पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार महत्त्वाचा असला तरी, केवळ चवळी खाल्ल्याने थायरॉईडवर नियंत्रण ठेवू शकता किंवा मात करू शकता, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
हे ही वाचा<< १०० ग्रॅम चवळीच्या भाजीत दडलंय काय? वजन, कोलेस्ट्रॉल कमी करताना कशी होते मदत, खाल्ल्यावर एवढं करा की..
दरम्यान, डॉ. बजाज यांनी आवर्जून सांगितले की, चवळी किंवा इतर कोणत्याही एका भाजीवर अवलंबून राहू नका. विविध पोषक पदार्थासह संतुलित आहार घेतल्यास थायरॉईड बरा होण्यास नक्की मदत होऊ शकते. याशिवाय तुमची विशिष्ट आरोग्य स्थिती लक्षात घेण्यासाठी तुमच्या वैद्यकीय रेकॉर्ड्सची माहिती असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.