तांदूळ खाऊन मधुमेह होतो हा एक सार्वत्रिक समज आहे.तो खरा आहे की खोटा, हे समजून घेऊ. मागील पिढ्यानपिढ्या शतकानुशतके तांदूळ हेच आपले मूळ धान्य आहे.त्यामुळे जे धान्य आपल्या जनुकांना हजारो वर्षांपासुन सात्म्य आहे, त्याचा आरोग्याला धोका होण्याची शक्यता कमीच. प्रश्न निर्माण झाला ,तो आपण आपल्या मातीत पिकलेला हातसडीचा तांदूळ सोडून भलतीकडेच पिकणारा रिफ़ाईन्ड तांदूळ खाऊ लागलो तेव्हा आणि त्या तांदळाच्या सेवनाला दिली जाणारी परिश्रमाची जोड थांबवली तेव्हा. तांदळाचा साखरेच्या चयापचयावर विपरित परिणाम होण्याची शक्यता का नाही, याचे वैज्ञानिक उत्तर समजून घेऊ.
तांदळाच्या कोंड्यामध्ये एक खनिज असते, त्याचे नाव क्रोमियम(chromium).या क्रोमियमची साखरेच्या चयापचयामध्ये गरज असते.1 इन्सुलिनच्या शरीरकोषांवरील कार्यामध्ये क्रोमियम साहाय्य करते व रक्तामधील साखर सम पातळीत ठेवण्यास मदत करते. त्याहुनही महत्त्वाचे म्हणजे तांदळामध्ये अत्याधिक प्रमाणात असलेले नायसिन(nycin) अर्थात विटामिन बी३. कोंड्यासहित तांदळामध्ये २९.८एमजी इतक्या प्रचंड प्रमाणात नायसिन असते, 2 जे इन्सुलिनचे कार्य सुरळीत होण्यासाठी, शरीरकोषांना साखर मिळण्यासाठी व रक्तामधील साखर सम पातळीत राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. साहजिकच तुम्ही कोंड्यासकट भात खाल्लात तर त्यामधील नायसिन तांदळामधील साखर शरीरकोषांना उर्जा म्हणून मिळण्यास मदत करेल व रक्तात साखर नियंत्रणात राहील. याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोंड्यासहित तांदूळ खाणार असाल तर त्या तांदळामधील साखरेचा योग्य चयापचय होण्याची सोय निसर्गाने तांदळातच केलेली आहे. साहजिकच कोंड्यासकट तांदूळ खाणार्याच्या रक्तामध्ये साखर वाढण्याची शक्यता कमीच. तांदूळ बदनाम झाला, कारण आपण त्याला जास्तच साफसूफ करुन खाऊ लागलो आणि ते आपल्याला शिकवले पाश्चात्त्यांनी.
तांदळाच्या ग्लायसेमिक इंडेक्सचे काय?
तांदळाबाबत कोणी असा आक्षेप घेईल की तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स अधिक (सरासरी ७३) आहे, म्हणजे तो इतर धान्यांच्या तुलनेमध्ये रक्तामधील साखर वेगाने वाढवतो,त्यामुळे मधुमेहामध्ये वा स्थूलत्वाच्या दृष्टीने सुद्धा तांदूळ योग्य नाही, तर त्याचाही विचार करु. तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असला तरी आपण काही तांदूळ नुसताच खात नाही. तांदळावर (भातावर) वरण-आमटी व सोबत भाजी अशी आपली जेवणाची पद्धत आहे. ज्या डाळींपासुन वरण-आमटी बनवतात, त्यांचा सरासरी ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, म्हणजे २९ ते ३३ च्या आसपास.ज्या वेगवेगळ्या भाज्या आपण भातासोबत खातो,त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमीच म्हणजे सरासरी ३५ ते ५४च्या आसपास असतो.
याचा अर्थ वरण-भात-भाज्या या तिघांचा मिळून सरासरी ग्लायसेमिक इंडेक्स हा साधारण ४८ च्या आसपास असतो, जो आहारशास्त्रानुसार आदर्श आहे. ५५ हून कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ हे आरोग्यासाठी योग्य समजले जातात. त्यात पुन्हा तुम्ही एक ओली व एक सुकी अशा दोन भाज्या भातासोबत खात असाल, त्याला कोशिंबीरीची, चटणीची जोड देत असाल तर तुमच्या जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स आणखीनच कमी होईल व ते जेवण आरोग्याला अतिशय पोषक होईल. आता तुम्ही घरी भाज्या बनवत नसाल, बनवल्या तरी लोणच्यासारख्या केवळ तोंडी लावत असाल, कोशिंबीर म्हणजे काय हेसुद्धा विसरुन गेला असाल आणि नुसता ताकभातच ओरपत असाल तर…तर दुर्दैव तुमच्या आरोग्याचे.