Cancer News in Marathi : २०२३ मध्ये जगभरात कर्करोगामुळे मृत्यूंची संख्या १०.४ दशलक्षांवर पोहोचली तर नवीन प्रकरणांची संख्या १८.५ दशलक्ष झाली, असे लॅन्सेटमध्ये प्रकाशित नव्या विश्लेषणानुसार दिसून आले आहे. १९९० पासून ही वाढ अनुक्रमे ७४ टक्के आणि १०५ टक्क्यांनी झाली आहे. ही वाढ भयानक वाटत असली तरी अंदाजे प्रत्येकी १० पैकी ४ कर्करोग मृत्यू धूम्रपान, चुकीचा आहार आणि रक्तातील साखरेची उच्च पातळी यांसारख्या निश्चित जोखमीच्या घटकांशी संबंधित होते. हे घटक टाळता येण्याजोगे असल्याने कर्करोग प्रतिबंधक उपाययोजनांद्वारे मृत्यू टाळता येऊ शकतो.
भारतामध्ये २०२३ मध्ये कर्करोगाच्या प्रकरणांची संख्या अंदाजे ५.४३ दशलक्षांपर्यंत वाढली आहे. १९९० मध्ये भारतीय लोकसंख्येमध्ये नवीन कर्करोग प्रकरणांचे वयानुसार प्रमाण ८४.८ प्रति लाख होते. २०२३ मध्ये हे प्रमाण २६.४ टक्क्यांनी वाढून १०७.२ प्रति लाख झाले. भारतातील वयानुसार मृत्यूदर १९९० मध्ये ७१.७ प्रति लाख होता, जो २०२३ मध्ये २१.२ टक्क्यांनी वाढून ८६.९ प्रति लाख झाला.
ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज कॅन्सर कोलॅबोरेटर्सच्या विश्लेषणानुसार, २०५० पर्यंत जगभरात किमान ३०.५ दशलक्ष लोकांना नवीन कर्करोगाचे निदान होईल, तर वार्षिक मृत्यूदर ७५ टक्क्यांनी वाढून १८.६ दशलक्ष होण्याचा अंदाज आहे.
भारतातील मृत्युदरासाठी जबाबदार असलेले प्रमुख कर्करोग कोणते आहेत?(What are the top cancers responsible for mortality in India?)
भारतामध्ये मृत्यू आणि आजारपणासाठी जबाबदार असलेले प्रमुख कर्करोग म्हणजे स्तन, फुफ्फुस, अन्ननलिका, तोंड, गर्भाशयमुख, पोट आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग, असे पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI)च्या प्राध्यापक राखी दंडोना सांगतात. त्या या विश्लेषणाच्या सहकारी आहेत. पण त्या सांगतात की, “या निष्कर्षांचा अर्थ समजून घेण्यासाठी देशातील कर्करोग नोंदणी केंद्रांमध्ये चालू असलेली माहिती विचारात घेणे आवश्यक आहे.”
टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईचे संचालक आणि नॅशनल कॅन्सर ग्रिडचे संयोजक डॉ. सी. एस. प्रमेश यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “भारतात ३८ लोकसंख्याभिमुख कर्करोग नोंदणी केंद्रे आहेत, जी सुमारे १२ टक्के लोकसंख्येला व्यापतात. २०२२ मध्ये एकूण अंदाजे १.४ दशलक्ष नवीन प्रकरणे आणि ९.१० लाख मृत्यू नोंदले गेले. त्यांचा असा अंदाज आहे की, “भारतीय महिलांमध्ये सर्वसाधारणपणे स्तन, गर्भाशयमुख आणि अंडाशयाचा कर्करोग जास्त आढळतो; तर पुरुषांमध्ये तोंड, फुफ्फुस आणि अन्ननलिकेचा कर्करोग सामान्य आहे.”
जोखीम घटक (Risk Factors)
जगभरातील अंदाजे १०.४ दशलक्ष कर्करोग मृत्यूंपैकी किमान ४२ टक्के (४.३ दशलक्ष) मृत्यू ४४ संभाव्य टाळता येण्याजोग्या जोखीम घटकांमुळे झाले आहेत. यात तंबाखूचे सेवन, अस्वास्थ्यकर आहार आणि रक्तातील साखरेची पातळी यांचा समावेश आहे. भारताच्या संदर्भात, प्रमुख जोखीम घटक म्हणजे आहार, मद्यपान, वायू प्रदूषण आणि स्थूलता असे प्राध्यापक राखी दंडोना सांगतात.
याचा अर्थ असा होतो की, “समाजाच्या पातळीवर जीवनशैलीत गंभीर बदल करून कर्करोग प्रतिबंधक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. डॉ. सी. एस. प्रमेश यांच्या मते, “आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय बळकट करणे गरजेचे आहे. यामध्ये तंबाखूचे सेवन कमी करणे, आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार करणे, जनजागृती करणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लवकर निदानावर भर देणे आवश्यक आहे. तसेच रुग्णांच्या जवळ उच्च दर्जाची, पुराव्यावर आधारित आणि परवडणारी उपचार व्यवस्था सुनिश्चित करणे गरजेचे आहे.”
२०२३ मध्ये पुरुषांमध्ये जागतिक कर्करोग मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू टाळता येण्याजोग्या जोखीम घटकांशी संबंधित होते. यात मुख्यतः तंबाखू, अस्वास्थ्यकर आहार, जास्त मद्यपान, व्यावसायिक जोखीम आणि वायू प्रदूषण यांचा समावेश आहे. महिलांमध्ये हा दर ३६ टक्के होता, ज्यामध्ये प्रमुख जोखीम घटक म्हणजे तंबाखू, असुरक्षित लैंगिक संबंध, अस्वास्थ्यकर आहार, स्थूलता आणि रक्तातील साखरेची पातळी.
वृद्धत्वामुळे वाढणारे धोका? What about the risks of ageing?
अभ्यासातून असे निष्कर्ष काढण्यात आले आहे की, “कर्करोगाची नवीन नोंद आणि मृत्यूंची वाढ मुख्यत: लोकसंख्या वाढ आणि वृद्ध होत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे होते. प्रभावित बहुसंख्य लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात.
वॉशिंग्टन विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, अमेरिका येथील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME)च्या प्रमुख लेखक डॉ. लिसा फोर्स यांच्या मते, “प्रकरणे आणि मृत्यूंमध्ये झालेली वाढ मुख्यत्वे लोकसंख्या वाढ आणि वृद्धत्वामुळे होत आहे. पण, २०३० पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे (non-communicable disease) होणार्या अकाली मृत्यूला एक तृतीयांशाने कमी करण्याचे महत्त्वाकांक्षी संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्ट अजून दूर आहे.”
कर्करोग उपचारात सुधारणा आणि जोखीम घटकांवर उपाययोजना असूनही, या विश्लेषणानुसार तातडीच्या कृती व लक्षित निधी दिला नाही तर २०५० पर्यंत जगभरातील कर्करोग प्रकरणे ६१ टक्क्यांनी वाढू शकतात.
सर्वाधिक निदान होणारा कर्करोग (Most Diagnosed Cancer)
२०२३ मध्ये दोन्ही लिंगांसाठी म्हणजेच स्त्री आणि पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग जगभरात सर्वाधिक निदान होणारा कर्करोग होता. मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून श्वासनलिका, श्वासवाहिनी आणि फुफ्फुसाचा कर्करोग (Tracheal, Bronchus, and Lung cancer ) आढळला. अभ्यासकांच्या मते, “कमी संसाधन असलेल्या भागांमध्ये कर्करोग आणि जन्म-मृत्यू नोंदणी केंद्रांमधून अधिक माहिती गोळा करणे आवश्यक आहे.
अभ्यासकांचे म्हणणे आहे की, “कर्करोगाचे निरीक्षण करणाऱ्या यंत्रणांना समर्थ बनवणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे स्थानिक तसेच जागतिक स्तरावर कर्करोगाच्या ओझ्याचा पूर्ण, सखोल आणि सर्वांगीण अभ्यास करता येतो.”