पावसाळ्यात दरवर्षी उलट्या, जुलाब, गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. दूषित अन्न व पाण्याच्या सेवनामुळे या आजारांना सुरुवात होते. यात पूरग्रस्त भाग मोठ्या प्रमाणात जीवाणूंचे (Bacteria) प्रजनन केंद्र बनतात. त्यामुळे अनेकांना विविध साथींच्या आजारांची लागण होते. या परिस्थितीत आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यात पावसाळ्यात जठरासंबंधीच्या सर्व आजारांवर वेळेवर उपचार न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते.

इ-कोइल, साल्मोनेला एन्टरिका, रोटाव्हायरस यांसारखे विषाणूजन्य आजार दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यात मासे, कोंबडी आणि आपण खात असलेल्या प्राण्यांमार्फत ते आपल्यापर्यंत पोहचतात. त्यामुळे पावसाळ्यात रुग्णालयांमध्ये अतिसार, उलट्या, ताप किंवा अन्नातून विषबाधा यांसारख्या संसर्गबाधेमुळे पोट बिघडलेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढत आहे. कारण- पावसाने आलेल्या पुरामुळे पाणी दूषित होते आणि तेच पाणी आपण वापरत असल्याने त्यातील अनेक विषारी द्रव्ये आपल्यापर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. त्यात घरी तयार केलेल्या अन्नपदार्थांपेक्षा बाहेरचे अन्नपदार्थ फार अस्वच्छ असतात, अशी माहिती गुरुग्राममधील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील लीड कन्सल्टंट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी डॉ. अनुकल्प प्रकाश यांनी दिली आहे.

पावसाळ्यात होणारे पोटाचे विकार

१. डायरिया आणि डिसेंट्री : दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या या आजारांत जुलाब, पोटदुखी, अंगदुखी, मळमळ होऊ शकते. यावेळी योग्य औषधे आणि इलेक्ट्रोलाइट्ससह पुरेसे पाणी प्यायल्यास आराम मिळू शकतो. तसेच तुमच्या शरीराची ऊर्जा पातळी राखण्यात मदत होईल. घरी शिजवलेले, पचायला हलके अन्न तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत करील.

२. गॅस्ट्रोएन्टेरिटिस : निरोगी लोकांमध्ये सहसा या आजाराची गंभीर लक्षणे दिसत नाहीत. त्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सुरेश जैन सांगतात की, जास्त ताप, मलातून रक्त येणे, डिहायड्रेशन, घसा कोरडा पडणे, लघवी कमी होणे, अशक्तपणा व डोके दुखणे यांसारखी लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. टायफॉइड : हा एक गंभीर जीवाणूजन्य संसर्गाने होणारा आजार आहे; ज्यावर उपचार न केल्यास जीवावर बेतू शकते. जास्त ताप, पोटदुखी, मळमळ व उलट्या ही टायफॉइडची सामान्य लक्षणे आहेत. या संसर्गावर योग्य त्या औषधोपचारासाठी तुमच्या डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.

४. हेपॅटायटिस ए आणि कावीळ : हेपॅटायटिस ए हा आजार विषाणूमुळे होतो; ज्यामुळे यकृताला सूज येते. अस्वच्छता, दूषित पाणी व अन्न यांमुळे यकृताचे कार्य बिघडते. तसेच डोळ्यांचा रंग पिवळा होणे, लघवी पिवळी होणे, पांढरा मल व पोटदुखी हे त्रास होऊ शकतात. ही सर्व काविळीची लक्षणे आहेत. काविळीवर योग्य ते उपचार घेण्यासाठी ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

खाताना ‘या’ चांगल्या सवयी फॉलो करा

१) जेवण्यापूर्वी किंवा तोंड वा चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात व्यवस्थित धुवा.

२) बाहेरचे अन्न वा खाणे टाळा. बाहेरचे पदार्थ खाल तेव्हा शक्यतो कोशिंबीर, चटण्या व दही यांसारखे कच्चे पदार्थ खाणे टाळा.. उदाहरणार्थ- जर एखादा डोसा खात असाल, तर त्यासोबत दिली जाणारी चटणी टाळण्याचा प्रयत्न करा. शक्यतो गरम पदार्थ खाण्याचा प्रयत्न करात. बाहेरचे फूड खाण्यापेक्षा घरचे ताजे जेवण जेवा. स्ट्रीट फूड, फास्ट फूड, थंड/साठवलेले/ओले/कच्चे कमी शिजवलेले अन्न खाणे टाळा, असा सल्ला पुण्यातील केईएम रुग्णालयाचे निओनॅटोलॉजी प्रमुख डॉ. उमेश वैद्य यांनी दिला.

३) टायफॉइड आणि रोटाव्हायरसपासून दूर राहण्यासाठी वयानुसार लसीकरण पूर्ण करा आणि स्वच्छ किंवा गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा, बालरोग व संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. प्रमोद कुलकर्णी यांचा सल्ला आहे की, १० मिनिटे उकळलेले पाणी आणि अन्न शिजवण्यासाठी वापरा. त्यासाठी UV/RO प्युरिफायरचा वापर करा. साचलेल्या / चिखल असलेल्या /घाणेरड्या खुल्या पाण्यात जाणे टाळा. आपण पिण्याच्या पाण्याबाबत खूप सावध असले पाहिजे. कारण- बहुतेक पोटाचे विकार आणि हेपॅटायटिस हे दूषित पाण्यामुळे होतात. गाळलेले किंवा उकळलेले पाणी प्या. पावसाळ्यात ९९ टक्के संसर्गजन्य आजार हे दूषित पाणी आणि अन्नामुळे होतात, अशी माहिती पुण्यातील कोलोरेक्टल आणि जीआय सर्जन डॉ. प्रदीप शर्मा यांनी दिली.

४) यासोबत तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. तुम्ही आजारी पडल्यास भरपूर द्रवपदार्थ, इलेक्ट्रोलाइट्स, प्रोबायोटिक्सचे सेवन करीत विश्रांती घ्या.

पावसाळ्यात रेस्टॉरंट्स किंवा बाहेर खाताना काय काळजी घ्याल?

१) मेट्रो हॉस्पिटल्समधील इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटोलॉजी, जीआय सर्जरी व लिव्हर ट्रान्सप्लांट (पॅन मेट्रो) डॉ. हर्ष कपूर यांच्या मते, पावसाळ्यात अन्न, पाणी दूषित होण्याचा धोका वाढतो. पूरग्रस्त भागात दूषित पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात निर्माण होतात; ज्यांचा पिण्याचे पाणी आणि अन्न यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यात रेस्टॉरंट्समधील जेवण नकळतपणे दूषित पाण्याच्या संपर्कात आलेल्या घटकांपासून तयार केले असू शकते; ज्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो.

२) पावसाळ्यात नाशवंत वस्तू विशेषत: पालेभाज्या अधिक खराब होण्याचा धोका जास्त असतो. कारण- उच्च आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे जीवाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. दुग्धजन्य पदार्थ, मांस व भाजीपाला यांसारख्या नाशवंत वस्तू रेस्टॉरंट्सद्वारे व्यवस्थित हाताळल्या गेल्या नाहीत आणि साठवल्या गेल्या नाहीत, तर त्या खराब होण्याची अधिक शक्यता असते. खराब झालेले अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. पावसामुळे माश्या, डास यांसारखे कीटक व उंदरांच्या संख्येमध्येही वाढ होते. रेस्टॉरंटमध्ये योग्य कीटकनियंत्रणाचे उपाय नसल्यास हे कीटक न शिजवलेल्या आणि शिजवलेल्या पदार्थांना दूषित करू शकतात; ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. रेस्टॉरंट्समध्ये योग्य स्वच्छता नसल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता असते; ज्यामुळे अन्नसुरक्षेवर आणखी परिणाम होऊ शकतो.

३) पूरग्रस्त भागात वीज खंडित झाल्यामुळे साठवलेल्या अन्नाची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते; ज्यामुळे त्यात जीवाणूंची वाढ होते आणि हेच पदार्थ आपण खाल्ल्याने आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नेहमी ताजे आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणाऱ्या हॉटेल्समध्ये जा. विशेषत: पावसाळ्यात हे अन्नपदार्थ कुठून आणि कसे आणले याच्या सोर्सिंगबद्दल चौकशी करा. रेस्टॉरंट जेवण तयार करताना वापरत असलेल्या उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबत चौकशी करा. चांगले शिजवलेले पदार्थ मागवा, उच्च तापमानात शिजवलेल्या अन्नात रोगजंतूंचा नाश होतो. तर कमी शिजलेले किंवा कच्चे अन्नपदार्थ, विशेषतः मांस आणि सीफूड खाणे टाळा. तसेच स्ट्रीट फूड खाणेदेखील टाळले पाहिजे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात होणारे आजार टाळता येणे कठीण नाही; पण त्यासाठी प्रत्येकाने योग्य काळजी घेतली पाहिजे. निरोगी आरोग्यासंदर्भात जे प्रोटोकॉल आहेत, ते पाळले पाहिजेत. त्यातून गर्भवती महिला, लहान मुले, अर्भक व वृद्ध यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.