पॅरिस : आधुनिक जीवनशैलीमुळे अकाली हृदयविकार, पक्षाघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी तरुण किंवा मध्यमवयीन नागरिकांना हृदयविकार व पक्षाघात या आजारांचा सामना करावा लागतो. आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आरोग्याचे हे दुष्परिणाम दिसून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने आणि आधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून कमी वयातच वाढलेला रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्टेरॉल, हायपरग्लायसेमिया, वाढलेला कंबरेचा घेर याने अनेक जण ग्रस्त आहेत.

हेही वाचा >>> हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी कोणकोणत्या चाचण्या करणे आहे आवश्यक? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

निकृष्ट आहार, अवेळी जेवणे, अपुरी झोप, शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष यांचे मोठे दुष्परिणाम दिसून येत असून अनेकांना कमी वयातच हृदयविकार किंवा पक्षाघात जडलेला आहे. या आजारांमुळे अनेकांचा अकाली मृत्यू होत असल्याचेही दिसून येत आहे. स्वीडनमधील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. लेना लॅनबर्ग यांनी सांगितले की, आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा आजार अनेकांना जडला असून त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. जागतिक स्तरावर ३१ टक्के जणांना मेटाबॉलिक सिंड्रोम आहे.