Kidney health: जास्त मीठ तुमच्या किडनी, ह्रदय आणि एकूण आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? भविष्यातील आरोग्याच्या स्वास्थ्यासाठीच अनेकदा डॉक्ट संतुलित मीठाच्या सेवनाचा सल्ला देतात. मात्र, आपल्यापैकी अनेकांना आपल्या जेवणात थोडा जास्त मीठाचा वापर केलेला आवडतो. मीठ नसलेले जेवण म्हणजे अळणी, बेचव असा समज असतो. दररोज जास्त मीठ खाणे ही एक सवय आहे ज्याबाबत बरेच जण फार विचार करताना दिसत नाही. मात्र, तुम्ही सहज जेवढा विचार करता की मीठ अति प्रमाणात खाणे योग्य नाही, त्यापेक्षाही हे जास्त गंभीर आणि चिंताजनक असू शकते.

चेन्नईतील एका हॉस्पिटलमधील वरिष्ठ मूत्ररोगतज्ज्ञ आणि कार्यकारी संचालक डॉ. वेंकट सुब्रमण्यम यांनी याबाबत सांगितले आहे. जास्त मीठाचे सेवन तुमच्या मूत्रपिंडांना कसे नुकसान पोहोचवू शकते आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे स्पष्ट केले आहे.

किडनीसाठी मीठाचे प्रमाण किती असावे?

डॉ. वेंकट सुब्रमण्यम स्पष्ट करतात की, बरेच लोक दररोज किती मीठ खातात याकडे लक्ष देत नाहीत. कालांतराने, यामुळे किडनीमधील खडे, उच्च रक्तदाब आणि अगदी किडनीचे कार्य बिघडणे यासारख्या गंभीर मूत्रपिंड समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना आधीच मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका आहे त्यांना त्यांच्या मीठाच्या सेवनाच्या प्रमाणाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

तुमच्या दैनंदिन स्वयंपाकात लहान बदल केल्यासही मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला जास्त मीठाची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही लिंबू, मिरपूड आणि लसूण सारख्या घटकांचा वापर करून तुमच्या पदार्थांची चव नैसर्गिकरित्या वाढवू शकता. हे पदार्थ चव आणि सुगंध वाढवतात आणि सोबतच जास्त मीठावरील तुमचे अवलंबित्व कमी करतात. ही एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे, मात्र ती फार लोकांना ठाऊक नाही.

चवीशी तडजोड न करता मीठाचे सेवन कसे कमी करू शकता?

डॉ. सुब्रमण्यम पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये लपलेल्या मीठाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. स्वयंपाक करताना जरी तुम्ही खूप कमी मीठ घातले तरी प्रक्रिया केलेले पदार्थ तुमच्या शरीरातील एकूण सोडियमचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढवू शकतात. म्हणूनच लेबलकडे लक्ष द्या आणि शक्य असेल तेव्हा पॅकेज्ड पदार्थांऐवजी ताजे पदार्थ खाण्यावर लक्ष द्या.

स्वत:च्या आरोग्याबाबत थोडीशी जाणीव आणि स्वयंपाकाच्या सवयींमध्ये बदल केल्यास तुमचे मूत्रपिंड पुढील अनेक वर्षांसाठी निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.