Herbal Tea for Migraines: आजच्या वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीत आणि धावपळीच्या जीवनात डोकेदुखी ही एक गंभीर समस्या ठरत आहे. ताणतणाव, झोपेचा अभाव, डिहायड्रेशन किंवा हार्मोनल बदल ही काही प्रमुख कारणे आहेत. अशा परिस्थितीत डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र, वारंवार औषधं घेतल्याने त्याचे शरीरावर काही परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या औषधांऐवजी तुम्ही काही पर्यायांचा अवलंब करू शकता, ते म्हणजे हर्बल टी. हर्बल टी केवळ वेदनांपासून आराम देत नाही, तर शरीर आणि मनाला शांतीदेखील देते.
खरं तर हर्बल टीमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे ताण कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. तेव्हा डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम देण्यासाठी अशाच काही हर्बल टीबाबत तुम्हीसुद्धा जाणून घ्या…
आल्याचा चहा
डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता. एका अभ्यासानुसार, आल्यामधील संयुगे म्हणजेच जिंजरॉल आणि शोगाओल हे वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. ते मायग्रेनशी संबंधित मळमळदेखील कमी करते.
लवंगाचा चहा
डोकेदुखी आण मायग्रेन कमी करण्यासाठी लवंगाचा चहादेखील चांगला पर्याय आहे. लवंगामध्ये युजेनॉल असते, जे वेदना कमी करणारे आणि दाहक विरोधी संयुगं असते. ते डोके आणि मानेच्या स्नायूंमधील ताण कमी करते. त्याचा सुगंध मानसिक शांती आणि विश्रांती देतो. मात्र जास्त प्रमाणात लवंगाचा चहा पिणे टाळावे.
लॅव्हेंडर चहा
लॅव्हेंडरच्या फुलांपासून बनवलेला चहा ताण आणि चिंता कमी करतो. त्याचा सुगंध डोकेदुखी आणि मायग्रेन दोन्ही शांत करतो. त्यामुळे चांगली झोप देखील मिळते. दिवसाभरात थकल्यानंतर लॅव्हेंडर चहा पिणे खूपच आरामदायी ठरते. तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा वेळ मिळेल तेव्हा पिऊ शकता.
पेपरमिंट चहा
डोकेदुखी कमी करण्यासाठी पेपरमिंट चहादेखील उत्तम आहे. पेपरमिंट चहामध्ये मेन्थॉल आढळते, जे डोकेदुखी आणि सायनस ब्लॉकेजपासून आराम देते. याचे सेवन केल्याने स्नायूंनाही आराम मिळतो. त्याचा थंड आणि ताजा सुगंध मनाला शांत करतो.
