Shahnaz Gill  weight loss : वजन कमी करणं हे केवळ सुंदर दिसण्यासाठी नव्हे, तर आरोग्य टिकविण्यासाठीही अत्यावश्यक आहे. वाढतं वजन हे हृदयविकार, मधुमेह, थायरॉइड, उच्च रक्तदाब व सांध्यांच्या त्रासाचं प्रमुख कारण ठरू शकतं. शरीरावरचा ताण वाढल्यानं थकवा, सुस्ती आणि आत्मविश्वास कमी होतो. योग्य आहार, नियमित व्यायाम व मानसिक संतुलन ठेवून, वजन नियंत्रणात ठेवणं म्हणजे दीर्घकाळ निरोगी राहण्याचं रहस्य आहे. जेव्हा वजन नियंत्रणात असतं, तेव्हा शरीर हलकं, मन प्रसन्न आणि कार्यक्षमता अधिक वाढते.

लोकप्रिय अभिनेत्री व गायिका शहनाज गिल शहनाज गिलनं वजन कमी करून केवळ स्वतःचं आयुष्यच बदललं नाही, तर हजारो तरुणांसाठी ती प्रेरणास्रोत ठरली आहे. शहनाजनं सात्त्विक जीवनशैली स्वीकारली आणि आत्मसंयमातून आपलं वजन कमी केलं. तिचा हा प्रवास सोपा नव्हता; पण शिस्त, आत्मविश्वास व सातत्य यांच्या जोरावर तिनं ते करून दाखवलं.

सात्त्विक अन्नानं बदललं आयुष्य (Sattvik Food Changed Her Life)

शहनाज गिल हिनं नुकतंच तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “मी डाएट केलं नाही. मला तर Ozempic म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. मी आधी ६७ किलो होते आणि आता ५५ आहे. काही वेळा ५२ किलोपर्यंत जाते. मी एक वर्ष पूर्ण सात्त्विक अन्न खाल्लं – लसूण आणि कांदासुद्धा नाही. मी स्वतःला इतकं नियंत्रित ठेवलं की, त्याचं वजन कमी होण्यात मोठं योगदान मिळालं.”

शहनाजच्या या वक्तव्यानं तिचे चाहते थक्क झाले. कारण- गेल्या काही वर्षांत तिच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल स्पष्ट दिसतोय — ती अधिक निरोगी, फिट आणि आत्मविश्वासपूर्ण वाटते.

थायरॉइडमुळे आले अडथळे (Thyroid Challenges in Weight Loss)

शहनाजनं कबूल केलं की, तिला थायरॉइडचा त्रास झाला होता, ज्यामुळे तिचं वजन वाढलं. ती म्हणाली, “मला थायरॉइड झाला होता; पण आता तो नियंत्रणात आहे. आधी आम्ही पिझ्झा, बर्गर खात असू, पण आता मी बाजरी, रागीची पोळी खाते. तरीही मी डाएट करीत नाही. जर कुणी मला वडापाव दिला, तर मी खाते; पण मग मी रात्रीचं जेवण सोडते. म्हणजे मला माझं नियंत्रण कसं ठेवायचं ते समजलंय.

शहनाजनं सांगितलं, “तिला पूर्वी ‘बॉडी शेमिंग’चा सामना करावा लागला; पण आता ती तिच्या फिटनेसकडे एक सकारात्मक दृष्टिकोनाने पाहते.”

डाएटपेक्षा शिस्त आणि जागरूकता महत्त्वाची (Discipline Over Dieting)

दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना डाएटिशियन व डायबेटीस एज्युकेटर कनिका मल्होत्रा यांनी शहनाजच्या जीवनशैली आणि वजन कमी करण्याच्या पद्धतीबद्दल सांगितले, “सात्त्विक आहार घेणं, प्रोसेस्ड फूडऐवजी बाजरी-रागीचा वापर करणं आणि कधी कधी जेवण न करणं – या गोष्टींनी अल्पकालीन वजन कमी होण्यास मदत होते, विशेषतः तिच्या थायरॉइडच्या पार्श्वभूमीवर. पण हा प्रवास केवळ शारीरिक नाही, तर मानसिक नियंत्रण व आत्मविश्वासाचाही आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “अन्नावर नियंत्रण ठेवण्यामुळे मानसिक समाधान आणि आत्मविश्वास मिळतो; पण सततचं नियंत्रण दीर्घकाळ टिकवणं कठीण असतं. अन्नाशी नातं सकारात्मक असणं हे जास्त महत्त्वाचं आहे.”

कडक नियंत्रणाऐवजी संतुलित सवयी आवश्यक (Balance Over Restriction)

मल्होत्रा यांनी पुढे स्पष्ट केले की, सतत जेवण न करणं किंवा अतिनियंत्रण ठेवलं, तर शरीराचं नैसर्गिक मेटाबॉलिझम बिघडू शकतं. “आपल्या संस्कृतीत अन्न फक्त पोषण नव्हे, तर भावना आणि आनंदाचं प्रतीक आहे. त्यामुळे ‘माइंडफुल इटिंग’ म्हणजेच सुज्ञपणे खाणे हे अधिक उपयुक्त ठरतं.”

त्या म्हणाल्या, “खाणं म्हणजे काही जिंकायचं युद्ध नाही. हा एक अनुभव आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक आरोग्य यांचं मिश्रणच निरोगी आरोग्य देऊ शकतं.”

शहनाज म्हणते : आत्मसंयमातच आत्मविश्वास (Self-Control as Empowerment)

शहनाज गिलचा अनुभव अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. शहनाज सांगते, “मी स्वत:ला बदललं. कारण- मला स्वतःबद्दल चांगलं वाटावं, असं वाटत होतं. लोक काहीही बोलू शकतात; पण तुमचं आरोग्य आणि आनंद फक्त तुमच्या हातात असतो.”

तज्ज्ञांचा इशारा (Expert Caution)

तज्ज्ञांच्या मते, “वजन कमी करण्यासाठी एकदम कडक नियंत्रण न ठेवता संतुलित आहार, नियमित व्यायाम व मनःशांती यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. कारण- दीर्घकाळ टिकणारं आरोग्य हे शरीर आणि मनाच्या संतुलनातूनच येतं.”