How Does a Pigeon Causes Health Issues: दादरचा कबुतरखाना, मागील काही आठवडे प्रचंड चर्चेत असलेला विषय. BMC तर्फे दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून हा कबुतरखाना बंद करण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतील विशेषतः दादरमधील जैन धर्मियांनी कबुतरांसाठी आंदोलन पुकारलं. दादर परिसरातील आंदोलन सध्या पेटलेलं असताना मुळात ज्या कारणाने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय झाला, तो म्हणजे “कबुतरामुळे आरोग्याला निर्माण होणारा धोका” यात किती तथ्य आहे हे आज आपण प्रसिद्ध व ज्येष्ठ छाती विकारतज्ज्ञ डॉ. जलील परकार यांच्याकडून जाणून घेणार आहोत…
कबुतरांमुळे खरोखरच आरोग्याला धोका निर्माण होतो का?
प्रसिद्ध व ज्येष्ठ छाती विकारतज्ज्ञ डॉ. जलील परकार सांगतात की, हो, कबुतरांमुळे खरोखरच आरोग्याला धोका निर्माण होतो. जेवढे लोक कबुतरखान्याजवळ राहतात किंवा कबुतरखान्याजवळ कबुतरांना अन्न देण्यासाठी जातात, अशा सर्व लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. आताच नाहीतर मागच्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे आणि यामुळे शरीराचं नुकसान होत आहे.
कबुतरांच्या विष्ठेचा व पिसांचा त्रास नेमका का होतो?

जेव्हा आपण कबुतरांच्या जवळ असतो तेव्हा कबुतरं इकडे तिकडे जाताना त्यांची पिसे खाली पडतात, हवेत उडतात. यावेळी ही पिसं नकळत आपल्या श्वसन मार्गाद्वारे शरीरात जातात, तर दुसरीकडे कबुतरांच्या विष्ठेचाही त्रास होतो. डॉक्टर सांगतात, वर्षातून दोन किंवा तीन वेळा कबुतरांची जुनी पिसं पडतात आणि नवीन पिसे येतात, यावेळी जी पिस पडतात ती वातावरणात हवेत पसरतात आणि नकळत लहान पिसं आपल्या नाकातून, तोंडातून शरीरात प्रवेश करतात. जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा हे आतमध्ये जातात आणि ते पुन्हा बाहेर येत नाही. यावेळी जरी तुम्ही उपचार घेतले औषध घेतली तरी ते बाहेर येत नाहीत. कबुतरांची विष्ठा किती विषारी असते हे सांगताना डॉक्टर उदाहरण देतात की, एखाद्या गाडीवर कबुतराची विष्ठा पडली आणि दोन दिवस गाडी धुतली नाही तर अक्षरश: गाडीचा रंग बदलतो, इतकं विष त्यात असते.

कबुतरांमुळे होणारे आजार कोणते? त्याची लक्षणे काय? सुरुवात कशी होते?

कबुतरांनी केलेली घरटी आणि साचलेली विष्ठा यामुळे ‘हायपरसिटीव्हिटी न्यूमोनायटिस’, ‘क्रिप्टोकॉक्कोसिस’ ‘बर्ड फॅन्सियर्स लंग’ अशा अनेक दुर्मीळ पण जीवघेण्या फुफ्फुसाच्या आजारांमध्ये वाढ होते. फुफ्फुसाचा नरमपणा कमी होऊन ती कडक होतात. यावेळी सुरुवातीच्या लक्षणांमध्ये खोकल्याचा समावेश आहे. यावेळी सुरुवातीला साधा वाटणारा खोकला नंतर जात नाही, यावेळी आपण खोकल्याची औषधं घेतो, डॉक्टरांकडे जातो मात्र ते कमी होत नाही. हळू हळू दम लागायला सुरुवात होते. ऑक्सिजनची पातळी १०० टक्के असली पाहिजे, ती हळू हळू कमी होते आणि फुफ्फुस काम करणं बंद करते. एरवी आपण एका मिनिटांत १८ वेळा श्वास घेतो, मात्र जसा श्वसनाचा त्रास सुरू होतो तेव्हा याचं प्रमाण ३० वर जातं आणि तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. हे लगेच होत नाही, मात्र पाच-सहा वर्षांनी याचा त्रास वाढतो.

कुठल्या वयोगटाला सर्वात जास्त धोका आहे?

लहान मुलांना आणि वृद्धांना याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. याशिवाय ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे किंवा जे आधीच आजारी आहेत, श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, डायबिटीज आहे, हृदयाचं ऑपरेशन झालं आहे अशा सगळ्यांना हा धोका जास्त आहे.

कबुतरामुळे होणाऱ्या आजारांचा ‘डेथ रेट’ शून्य आहे असं म्हणत काही आंदोलक पुढे आलेत, हे खरंय का?

डॉक्टर सांगतात की, कबुतरामुळे होणाऱ्या आजारांचा डेथ रेट शून्य नाहीये. टॉवरमध्ये राहणारे लोकही श्वसनविकारांनी त्रस्त असल्याचं डॉक्टर सांगतात. यावेळी डॉक्टरांनी सुचवलेला सल्ला म्हणजे नागरिकांनी आपल्या घरात आणि गॅलऱ्यांमध्ये कबुतरांना अन्न देणं टाळावं, घरांच्या खिडक्यांना आणि टेरेसना जाळ्या बसवाव्यात आणि कबुतरांची घरटी आढळल्यास त्वरित ती हटवावीत.

यावर उपाय काय?

यावर उपाय सांगताना शेवटी डॉक्टर सांगतात की, तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा खिडकीत, बाल्कनीत कबुतरांना धान्य किंवा खाण्यासाठी काहीही घालू नका. त्यांना जेवढं तुम्ही लांब ठेवाल तेवढे तुम्ही या आजारांपासून दूर राहाल.