६८ वर्षांच्या आजी आमच्या बाह्यरुग्ण विभागात आल्या होत्या, त्यांना चालताना पाय उचलणं कठीण वाटत होतं, अचानक आपला तोल जाईल अशी भीती वाटत होती, खुर्चीवरून उठताना आधार घ्यावा लागत होता, वस्तू उचलताना हातात अशक्तपणा जाणवत होता, थकवा जाणवत होता आणि सामाजिक सहभाग अगदी कमी झाला होता. रक्ताच्या तपासण्या करुन झाल्या, एक्स-रे आणि एमआरआय देखील झाले त्यामधे विशेष असं काही आलेलं नव्हतं , पण आजींचा त्रास काही कमी होत नव्हता. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही आजींना आवश्यक असे आणि सहज जमतील असे व्यायाम शिकवले, महिनाभर त्यांनी आमच्या फिजिओथेरेपी विभागात येऊन आमच्या मार्गदर्शनाखाली हे व्यायाम केले. एक महिन्यानंतर आजींचा आत्मविश्वास तर वाढलाच आणि त्यांच्या हालचालींमधे सुसूत्रता देखील आली. आजींना जी लक्षण जाणवत होती ती ‘सारकोपेनिया’शी संबंधित होती.

वय वाढलं की स्नायूंचा आकार आणि कार्यक्षमता कमी होते. सामान्यपणे ही प्रक्रिया ५०–६० व्या वर्षानंतर सुरू होते आणि वाढत्या वयासोबत वेगाने वाढते. हे साहजिकच नैसर्गिक आहे पण यामुळे हालचालींचा वेग, हालचालींसाठी लागणार जोर म्हणजे फ़ोर्स आणि हालचालींमधील सुसूत्रता कमी होते. त्यामुळे यावर उपाय करण आवश्यक आहे.

सारकोपेनियाची लक्षणं काय?

१.चालताना पाय उचलणं कठीण वाटणं
२. जड वस्तू उचलताना किंवा दैनंदिन काम करताना हात पायातील शक्ती कमी झाली आहे असं वाटणं
३.अचानक तोल जाणं, पाय घसरून पडणं
४. उठताना आधाराची गरज भासणं
५. वजन कमी होणं, थकवा वाटणं
६. आत्मविश्वास आणि सामाजिक सहभाग कमी होणं

वाढतं वय हे सारकोपेनिया होण्याचं प्रमुख कारण असलं तरीही त्यासोबत काही इतर घटकही यासाठी कारणीभूत असतात. जसं व्यायामाचा अभाव, आहारामध्ये प्रथिनांचा अभाव, अपुरी झोप, दीर्घकालीन आजार (जसे मधुमेह, रक्तदाब), वाढत्या वयाबरोबर बदलणारे हार्मोन्स आणि मानसिक तणाव.

फिजिओथेरेपी उपचार

सारकोपिनिया थांबवण्यासाठी आवश्यक असते ती व्यायाम आणि योग्य आहार यांची. सगळ्यात आधी रुग्णांनी सारकोपेनियासाठी फिजिओथेरेपी डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि आता आपल्या हालचाली कमीच होत जाणार किंवा वयानुसार स्नायू कमकुवत होणारच असा विचार करणं योग्य नाही. साधारणपणे फिजिओथेरेपी उपचाराची उद्दिष्ट खालील प्रमाणे असतात
१.सुरक्षित आणि रुग्णास अनुरूप व्यायाम योजना तयार करणे
२. हालचालींमध्ये आत्मविश्वास वाढवणे
३. घरात वावरणं सोपं व्हावं यासाठी योग्य ते बदल किंवा उपाय सांगणे

फिजिओथेरेपी उपचार कसे उपयोगी ठरतात?

१. स्नायू मजबूत करणारे व्यायाम (Strengthening exercises): स्नायूंचा आकार कमी झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता साहजिकच कमी होते. वयस्कर व्यक्तींसाठी हलक्या वजनांचे किंवा शरीराचं वजन वापरून व्यायाम योग्य ठरतो. हे व्यायाम व्यक्तिगणिक वेगळे असतात शिवाय त्यांच प्रमाणही प्रत्येक व्यक्तिगणिक बदलतं.

२. संतुलन सुधारण्यासाठी व्यायाम: सारकोपेनिया मुळे वयस्कर व्यक्तींना पडण्याची भीती वाटते, तोल जाऊन पडण हे त्यांच्या एकंदर आरोग्याच्या दृष्टीने घातक असतं. म्हणून वेगवेगळे बॅलन्स एक्झरसाइजेस करवून घेतले जातात, यामुळे अप्रत्यक्षरित्या रुग्णांचा सामाजिक सहभाग देखील वाढतो.

३. चलनवलन टिकवणारे व्यायाम (Mobility and Stretching), वेगवेगळ्या सांध्याच्या हालचाली सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि सांध्यांचा आखडलेपणा कमी करण्यासाठी मोबिलिटी एक्झरसाइजेस उपयुक्त ठरतात, यामुळे सांध्याना मोकळेपणा मिळतो, रक्तप्रवाह सुधारतो. काही विशिष्ट स्नायूंना स्ट्रेच करण्याची देखील गरज असते, हे सेल्फ स्ट्रेचेस रुग्णाला शिकवले जातात.

४. प्रथिनयुक्त आणि संतुलित आहार आणि जीवनशैलीतील सुधारणा : या रुग्णांना आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाने आहारात बदल सुचवले जातात.

५. पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण: झोपेची कमतरता स्नायूंच्या पुनर्बांधणीला अडथळा आणते, शिवाय सततच्या मानसिक ताणामुळे शरीरातील इन्फ्लमेशन वाढतं.

    वाढत्या वयासोबत होणारा सारकोपेनिया जरी नैसर्गिक असला तरीही फिजिओथेरेपिस्ट डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जर योग्य व्यायाम केला तर वाढत्या वयासोबत होणारी स्नायूंची झीज बऱ्याच अंशी कमी होऊ शकते आणि वयस्क व्यक्ती अर्थपूर्ण आयुष्य जगू शकतात.