Benefits Of Cast Iron Cookware: कास्ट आयर्न कूकवेअर म्हणजे लोखंड, बिड्याची भांडी ही अगदी पूर्वीपासून भारतीय स्वयंपाकघराचा महत्त्वाचा भाग आहेत. चविष्ट जेवणासाठीची टिकाऊ भांडी अशी ओळख असणारी ही भांडी ही जितकी फायदेशीर आहेत तितकी त्यांची काळजी सुद्धा घ्यावी लागते. ही भांडी नीट तयार केली नाहीतर त्यात कच लागून पदार्थांची चव बदलू शकते. शिवाय जर का ही भांडी चुकीच्या स्क्रबने घासली तर त्यावर चरे पडू शकतात, घासल्यावर जर ती नीट कोरडी केली नाहीत तर त्याला गंज लागू शकतो. एक ना अनेक कारणांमुळे अनेक जण ही भांडी वापरणे टाळतात पण आज आपण याच भांड्यांचे काही फायदे जाणून घेणार आहोत, ज्यामुळे ही मेहनत का घ्यावी याच उत्तर तुमचं तुम्हाला कळेल.

क्लिनिकल आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह नियंत्रण प्रशिक्षक कनिका मल्होत्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला माहिती देताना बिडाचा तवा किंवा कढई अशा कास्ट आयर्न भांड्यांची वैशिष्ट्य सांगितली आहेत. अशी भांडी वापरल्याने आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात हे सुद्धा मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे. या फायद्यांवर एक नजर टाकूया..

बिडाच्या तव्याचा चवीसाठी काय फायदा होतो?

बिडाची भांडी जाड तळाची असतात. त्यामुळे त्यांना तापायला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो पण त्यानंतर तापमान हे समप्रमाणात राहते. यामुळे पदार्थ शिजताना सर्व बाजूंनी समसमान शिजतो. म्हणूनच घावणे, डोसे, भाकऱ्या, ऑम्लेट सारख्या पदार्थांसाठी बिडाचा तवा उत्तम पर्याय ठरतो.

बिडाचा तवा शक्यतो तिखटाच्या पदार्थांसाठी वापरावा व सतत घासू नये. मसाल्यांचे कण तव्यात राहिल्याने प्रत्येक वेळी पदार्थ बनवताना त्या त्या पदार्थाची चव आणखी खुलून येऊ लागते.

पदार्थांचा चेहरा- मोहरा: उष्णता टिकवून समसमान पसरत असल्याने, काही पदार्थ जसे की चिकन, पनीर टिक्का, मशरूम किंवा मासे यांना बाहेरून एक कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंग देण्यासाठी ही भांडी सर्वोत्तम ठरतात.

मऊपणा राहतो कायम: जरी पदार्थांना बाहेरून कुरकुरीत पणा येत असला तरी त्यांच्यातील नैसर्गिक रस किंवा ओलावा ही भांडी नष्ट करत नाहीत. त्यामुळे मऊ शिजलेला पदार्थ व त्याला बाहेरून क्रिस्प अशा रेसिपी यावर उत्तम बनतात.

या व्यतिरिक्त, मल्होत्रा ​​हे देखील नमूद करतात की बिडाची भांडी पसारा व वेगवेगळी भांडी वापरण्याची गरजच मुळात कमी करतात. एकाच पॅनमध्ये अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवण्याची मुभा तुम्हाला मिळते. या भांड्यांचे हेच अष्टपैलुत्व त्यांना उत्तम पर्याय बनवते.

बिडाच्या भांड्यांचा आरोग्याला काय फायदा होतो?

मल्होत्रा सांगतात की, विशेषतः लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असणाऱ्या लोकांसाठी ही भांडी फायदेशीर ठरू शकते. भाज्या व मांसातील लोहासारखे आवश्यक पोषक घटक राखून ठेवण्यासाठी ही भांडी उत्तम आहेत. तसेच या भांड्यांच्या सच्छिद्र पृष्ठभागामुळे स्वयंपाक करताना भांड्यातील लोह सुद्धा अन्नामध्ये कमी प्रमाणातच पण जोडले जाते.

वनस्पती-आधारित आहाराचे (व्हीगन डाएट) पालन करणाऱ्या लोकांसाठी, तुमच्या दैनंदिन स्वयंपाकासाठी कास्ट आयर्न भांडी महत्त्वाची ठरतात कारण यातून तुम्हाला आवश्यक तितके लोह शरीराला पुरवता येते.

हे ही वाचा<< कच्च्या केळीमधील पोषणाचा साठा किती? जेवणात हिरव्या केळ्यांचा कसा वापर करावा, कुणाला होईल सर्वाधिक फायदा?

मात्र, प्रत्येक गोष्टीप्रमाणे या भांड्यांवर सुद्धा पूर्ण विसंबून राहणे नक्कीच योग्य नाही. अगदी रोजच्या रोज या भांड्यांचा प्रत्येक पदार्थासाठी वापर करणं हे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवू शकते. ही स्थिती सुद्धा शरीरासाठी घातकच आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही भांडी प्रमाणात वापरावीत.