3 vitamins in your diet at 40s: वाढत्या वयानुसार अनेक समस्या उद्भवत जातात. वय वाढत असताना पाय दुखणे, सांधेदुखी आणि अशक्तपणा येणे सामान्य होते. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. वयामुळे स्नायूंच्या बिघाडास गती मिळते आणि याला सारकोपेनिया म्हणतात. यामुळे पायांची ताकद आणि सहनशक्ती कमी होते. हाडांमध्ये कॅल्शियम आणि काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे गुडघे आणि सांध्यावर दबाव वाढतो. त्यामुळे हालचाल करताना वेदना होतात. वयाच्या चाळीशीनंतर नसा कमकुवत होणे आणि व्हिटॅमिन बी१२च्या कमतरतेमुळे पायांमध्ये मुंग्या येणे, सुन्नपणा आणि संतुलन बिघडू शकते. वयानुसार रक्ताभिसरण मंदावल्याने पायांमध्ये जडपणा आणि थकवा जाणवतो.

जास्त काळ उभे राहणे, लठ्ठपणा, मधुमेह आणि संधीवात यामुळे वरील सर्व समस्या वाढू शकतात. योग्य पोषण, नियमित व्यायाम आणि आवश्यक जीवनसत्त्वं वेळेवर घेतली नाहीत, तर ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. म्हणूनच चाळीशीनंतर पायांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर वृद्धापकाळात साध्या पायऱ्या चढणं-उतरणंही अवघड होऊ शकतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, पाय दुखणे ही केवळ वयामुळे उद्भवलेली समस्या नाही, तर पौष्टिकतेच्या कमतरतेमुळेदेखील होते. पायऱ्या चढताना गुडघ्यांवर वाढलेला ताण, बसलेल्या स्थितीतून उठण्यास उशीर होणे किंवा पायाच जडपणा आणि सुन्नपणा जाणवणे हे त्रास तुम्हालाही होतात का? हे केवळ वयामुळे नाही तर सार्कोपेनियामुळे होते. ही स्थिती म्हणजे वयानुसार होणारे स्नायूंची झीज.

वयाच्या साठीनंतर शरीर दरवर्षी १ ते ३ टक्क्याने स्नायूंचे वजन कमी करते. यामुळे पाय कमकुवत होतात, चालण्याची गती मंदावते आणि पडण्याची भीती निर्माण होते. जर तुम्हाला वयानुसार पायांची ताकद वाढवायची असेल, तर तुमच्या आहारात तीन आवश्यक जीवनसत्त्वांचा समावेश आवर्जून करा. या जीवनसत्त्वांमुळे हाडे मजबूत होतात आणि पायांना ताकद मिळते.

व्हिटॅमिन डी ३

हार्वर्ड हेल्थच्या अहवालात असे म्हटले आहे की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्नायूंची ताकद कमी होते. विशेषत: वय वाढत असताना ही ताकद आणखी कमी होते. वय वाढत असताना शरीरातील व्हिटॅमिन डी३चे उत्पादन कमी होते. या कमतरतेमुळे पाय जड होणे, थकवा येणे आणि संतुलन बिघडणे होऊ शकते. व्हिटॅमिन डी३ हाडांमध्ये कॅल्शियम पोहोचवते, स्नायूंच्या आकुंचनाचे नियमन करते आणि मेंदूला संदेश प्रसारित करण्यासाठी नसांची कार्यक्षमता सुधारते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी३ चा दिवसाचा डोस ८०० ते २००० आययू आहे.

व्हिटॅमिन बी १२

फाउंडेशन फॉर पेरिफेरल न्यूरोपॅथीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे नसा खराब होऊ शकतात. त्यामुळे पायांमध्ये मुंग्या येणे, बधीर होणे आणि असंतुलन आणि सम्रणशक्ती कमी होते. बी १२ नसांवर एक संरक्षणात्मक थर तयार करते आणि मेंदूतून पायांना जलद संदेश पाठवते. जेवणानंतर दररोज ५०० ते १००० एमसीजी डोस घेतल्याने पाय मजबूत होतात.

व्हिटॅमिन बी १

व्हिटॅमिन बी१ किंवा थायामिन हे एक जीवनसत्त्व आहे, जे स्नायूंना ऊर्जा प्रदान करते. त्याच्या कमतरतेमुळे पायांमध्ये थकवा, कडकपणा आणि सुस्ती वाढते. बी १ कार्बोहायड्रेट्सचे ऊर्जेमध्ये रूपांतर करते आणि मज्जातंतूचे संकेत मजबूत करते. सकाळी व्हिटॅमिन बी१चे सेवन केल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. योग्य प्रमाणात आणि वेळेत हे तीन जीवनसत्त्वं घेतल्याने काही दिवसांतच फरक दिसून येतो. थकवा आणि जडपणा कमी होतो, पायऱ्या चढ-उतार करणे सोपे होते आणि संतुलन सुधारते. काही आठवड्यांतच स्नायू आणि नसा मजबूत होऊ लागतात.