रेडी टू कुक पॅकेज्ड असे झटपट तयार होणारे पदार्थ सहज उपलब्ध असतात. दिसायला आकर्षक आणि चवीला चटपटीत असे हे पदार्थ आरोग्याला मात्र अपायकारक असतात. आपल्या संस्कृतीत झटपट तयार होणारे, चवीला उत्तम आणि पौष्टिक पदार्थ तयार केले जात होते. मात्र कालौघात हे पदार्थ मागे पडले. गरज आहे या पदार्थांकडे लक्ष देण्याची. एका जाहीर कार्यक्रमात मला यासंदर्भात विचारण्यात आलं. ‘आम्ही नोकरदार मंडळी आहोत, आम्हाला सकाळी स्वयंपाकासाठी पुरेसा वेळ नसतो. आम्ही काय करावं’, ? त्यावर मी सांगितलं होतं, ‘हे पदार्थ झटपट होतात हे खरं आहे पण ते झटपट विकारही आणतात. आपल्याकडेही झटपट तयार होणारे पदार्थ आहेत. विस्मृतीत गेले आहेत. त्यांना बाहेर आणायला हवं. कारण ते झटपट होतात आणि पौष्टिक आहेत. शरीराला कोणताही अपाय करत नाहीत’. आज अशाच काही पदार्थांचा आढावा घेऊया.

तांदूळ पेज

अनेक विकारात विशेषत: दीर्घ मुदतीचा ताप, कावीळ, जलोदर, मलेरिया, रक्ती मूळव्याध, मोठे शस्त्रकर्म यानंतर काय खावे असा प्रश्न पडतो. अशा वेळेस क्रमाक्रमाने अग्नी संधुक्षण व्हावयास हवे असते. त्यामुळे हळूहळू शरीराचे गाडे ठिकाणावर येते. त्याकरिता कितीही अशक्तपणा आला असला तरी प्रथम सात दिवस तांदुळाची पातळ पेज खावी. चवीला जिरे, धने, आले, लसूण, ओवा, मीठ, कणभर गूळ असे पदार्थ वापरावे. पेज भरपूर खाता येते, गॅसेस होत नाहीत. रक्त वाढते, मांस सावकाश बनते. लघवी साफ होते. रात्री उत्तम झोप लागते. जेवण नकोसे वाटत नाही. आयुर्वेदाच्या रसशास्त्र या औषधी निर्माणात विविध धातूंची भस्मप्रक्रिया करण्याअगोदर, त्या त्या धातूंची सामान्य शुद्धीकरिता पेजेसारखी तांदुळाची कांजी वापरतात. त्यात फक्त तांदूळ हे एकमेव घटकद्रव्य असते.

तांदळाची धिरडी

लहान बालकांना घरचे अन्न रोजच वेगवेगळे काय द्यावे हा प्रश्न पडतो. याकरता तांदळाची ताजी धिरडी हा उत्तम तोडगा आहे. घरी तांदूळ धुवावे. पंचावर वाळवावे. नंतर जात्यावर किंवा मिक्सरमध्ये दळून घ्यावे. निर्लेप तव्यावर साधी धिरडी, गूळ व काकडी, कोथिंबीर, आले, मिरची अशी विविध प्रकारची धिरडी करावी. आपल्या बालबच्च्यांना ताजी द्यावी. पोट भरते, समाधान वाटते. पाव-बिस्किटांपेक्षा अधिक गुणवत्ता धिरड्यात आहे.

तांदळाची भाकरी

जुलाब, हगवण या विकारांत भल्याभल्यांची मती गुंग होते. त्याकरिता प्रथम एक दिवस पूर्ण लंघन करावे किंवा फक्त ताकावर राहावे. चांगला क्षुद्बोध झाला की तांदूळ भाजून पातळ भात किंवा तांदुळाच्या पिठाची भाकरी खावी. तांदुळाच्या पिठाची भाकरी आमांश, मूळव्याध, स्थौल्य, रक्तदाबवृद्धी, भगंदर, कावीळ, जलोदर, आम्लपित्त, अल्सर, पोटदुखी या विकारांत अमृतासमान आहे. तांदुळाची भाकरी नेहमी ताजीच पाहिजे. या भाकरीसोबत चवीकरिता धने, जिरे व आले असे तुकडे मिसळावे. भाकरी ज्या मानाने खाऊ त्या मानाने शरीरात पक्काशयात निर्दोष मळ तयार होतो. या भाकरीबरोबर ताजे ताक, ताकाची आले, लसूण घातलेली कढी पाहिजे. ग्रहणीसारख्या विकारावर यासारखे अन्न नाही.

ज्वारीची उकड

मधुमेह, लठ्ठपणा, मूळव्याध, भगंदर, सूज, रक्तदाबवृद्धी अशा विकारांत वैद्य मंडळी ज्वारीचा आग्रह धरतात. गहू, भात, बटाटा, रताळे, साबुदाणा, वाटाणा, हरभरा, मांसाहार, मिठाई, बेकार पदार्थ, पोहे, चुरमुरे इत्यादी पदार्थ वज्र्य-कुपथ्य म्हणून सांगतात. पण रुग्णांनी खावे काय असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ज्वारीच्या उकडीत आहे. पाणी उकळू द्यावे. त्यात थोडे थोडे ज्वारीचे पीठ टाकावे. ते पीठ चांगले शिजू द्याावे. मग त्यात थोडे ताजे ताक, आले व कढीलिंब पाने टाकावी. ही उकड थोडी शिजू द्यावी. नाष्टा, बे्रकफास्ट याकरिता हा उत्तम पदार्थ आहे. रोज खाऊन कंटाळा येत नाही. रक्तशर्करा किंवा वजन वाढत नाही. पोटाला बोजा पडत नाही.