आज परिस्थिती अशी आहे की लोकांना सॅलड म्हणजे काय ते माहिती आहे मात्र कोशिंबीर माहिती नाही, विशेषतः २१व्या शतकात जन्मलेल्यांना. अशी अनेक घरं असतील ज्यांना कोशिंबीर माहीत नाही आणि अनेक अशी आहेत ज्यांना माहिती असलं तरी त्यांच्याकडे कोशिंबीर कधीच करत नाहीत. कोशिंबीर हा स्वास्थ्यासाठी अतिशय हितकर असा पदार्थ आहे, जो रोजच्या जेवणामध्ये रंगत आणतो. अगदी साधं जेवणसुद्धा कोशिंबिरीमुळे रुचकर लागतं. दुर्भाग्य हे की कोशिंबिरीसारखे परंपरागत आरोग्यदायी पदार्थ सोडून आपण सॅलड नावाचा अर्धवट पदार्थ खाऊ लागलो आहोत.
पाश्चात्त्यांच्या आहारामध्ये मैद्याचा पाव आणि त्यामध्ये वेगवेगळे प्राणिज पदार्थ खाण्याचीच सवय असल्याने त्यांच्या आहारामध्ये वनस्पतीज पदार्थांची कमी असल्याने त्यांना मलावरोधापासून कर्करोगापर्यंत वेगवेगळ्या रोगांना तोंड द्यावे लागत असल्याचे तिथल्या तज्ज्ञांच्या लक्षात आल्यानंतर पावाच्या दोन तुकड्यांमध्ये त्यांनी एक-दोन पाने टाकण्यास सुरुवात झाली. पुढे तो प्रयत्न सुद्धा अपुरा आहे हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या वनस्पतींचे सॅलड खाण्याची टूम निघाली.

सॅलड तयार करताना बीट, गाजर, टोमॅटो, कांदा वगैरे जे जे उपलब्ध होतील त्या त्या पदार्थांचे कापलेले तुकडे कापून एकत्र केले गेले आणि झाले तयार सॅलड. पुढे ते स्वादिष्ट लागावे म्हणून त्यांमध्ये मिल्क क्रीम (दुधाची मलई) मिसळली गेली. इथे एक तर शाकवर्गाबरोबर (भाज्यांबरोबर) दुधाची मलई मिसळणे योग्य नाही, आपल्या आहार-परंपरेमध्ये तरी नाहीच. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे बीट,गाजर,मुळा,कांदा यांचे कापलेले तुकडे इतके कडक असतात की ते त्यांचे व्यवस्थित दीर्घकाळ चर्वण (चावणे) झाले नाही (जे सहसा होत नाहीच आणि म्हणूनच) तर ते सहजी पचणार नाहीत आणि म्हणूनच त्यांचे अशाप्रकारे अखंड तुकडे खाणं अपेक्षित नाही.याशिवाय आहारीय पदार्थ हा कापणे, चिरणे, किसणे, वाटणे, कुटणे, भाजणे, गरम करणे, फोडणी देणे, तळणे वगैरे स्वयंपाकीय संस्कार आवश्यकतेनुसार केल्यानंतरच शरीराला सात्म्य (अनुकूल) होतो,तसं न करता तसेच कापलेले ते अखंड पदार्थ खाल्ले तर काय होईल?

शरीराला तंतू (फायबर) मिळण्याची शक्यता कमीच, कारण मुळात ते अखंड पदार्थ व्यवस्थित पचणार नाहीत. आपली आतडी गाय-म्हशीप्रमाणे लांबलचक नाहीत आणि असे वनस्पतीज पदार्थ कच्चे पचवण्याची आपल्या आतड्यांची क्षमता नाही. अनेकांना सॅलडमधील लहान तुकडे मलाबरोबर तसेच पडताना दिसतात ते न पचल्यामुळेच. अशा न पचलेल्या सॅलडचा मग शरीराला फायदा तो किती आणि कसा होईल? आहारा संबंधितची एखादी कल्पना मनात आली की ती प्रत्यक्षात उतरवताना पाश्चात्य इतक्या धेडगुजरी पद्धतीने ती प्रत्यक्षात आणतात की हेच का ते विज्ञानवादी असा प्रश्न मनात उभा राहतो? केवळ सॅलड नव्हे तर आहारासंबंधितच्या इतर अनेक विषयांबाबत पाश्चात्त्यांचे असेच हास्यास्पद प्रयोग मागील काही दशकांमध्ये आपल्या समोर आले आहेत. दुर्दैव हे की आयुर्वेदासारख्या सखोल व व्यापक शास्त्राच्या पायावर उभ्या राहिलेल्या आपल्या काही हजार वर्षांच्या आहार परंपरेने सांगितलेल्या आहारीय पदार्थांना विसरून लोक पाश्चात्त्यांच्या अर्धवट पदार्थांना कवटाळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथे वाचकांच्या मनात प्रश्न उभा राहील की मग शरीराला तंतू पुरवणार्‍या या पदार्थांचे सेवन करुच नये काय? सेवन तर करायलाच हवे, मात्र त्या पदार्थांवर योग्य ते संस्कार करुन. बीट, गाजर, मुळा, कांदा अशा कडक पदार्थांचे चर्वण नीट होणार नाही आणि त्यांचे पचनसुद्धा व्यवस्थित होणार नाही हे लक्षात घेऊनच आपल्या पूर्वजांनी त्यावर तीन संस्कार केले. पहिला किसण्याचा विधी, दुसरा त्यामध्ये दही किंवा शेंगदाणे मिसळण्याचा संयोग विधी आणि तिसरा फोडणी देण्याचा प्रक्रिया विधी. बीट,गाजर वगैरे पदार्थ अखंड न खाता ते किसल्यावर त्याचे जे लांब तंतूंसारखे आकार तयार होतील ते पचणं शरीराला सोपं जाईल. त्यामध्ये दूध किंवा दुधाची मलई न मिसळता दही मिसळले जाते ,जे (दह्यामधील उपकारक जंतु) या पदार्थांना पचवायला साहाय्य करतात. याबरोबर स्निग्ध पदार्थ असावा म्हणून यांमध्ये किंचित शेंगदाण्यांचा कूट टाकला जातो. दही आणि शेंगदाण्यांमुळे कोशिंबीर छान चवदार होते आणि शेवटी दिली जाते फोडणी, जी त्याबरोबरच्या मसाल्यांमधील पदार्थांमधील उडनशील तेलाला बाहेर काढते, ज्यांमुळे कोशिंबीर पचनास सहाय्यक अशा पदार्थांनीयुक्त होते आणि अधिकच रुचकर होते.