Amruta Fadnavis Daily Diet : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अलीकडेच त्यांच्या आहाराबद्दल खुलासा केला आहे. “माझा हा आहार पारंपरिक, संपूर्ण संतुलित आहे. मी नेहमी दिवसातून फक्त दोन वेळा जेवते, त्यामुळे माझे दिवसातील पहिले जेवण सुमारे दुपारी २ किंवा ३ वाजता असते, नंतर रात्री ९ वाजता आणि पुढच्या दिवशी दुपारी २-३ वाजता. हा इंटरमिटंट फास्टिंग डाएट आहे.”

“मुलगी दिविजाने दिली प्रेरणा; घरच्या जेवणातून मिळवते संतुलित पोषण”

“माझी मुलगी दिविजा हिने मला आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित केले, कारण तिने स्वत: घरात आरोग्यदायी अन्न खायला सुरुवात केली आणि वजन कमी केले,” असं महाराष्ट्राच्या वाहिनी म्हणून लोकप्रिय असलेल्या ४६ वर्षीय अमृता यांनी सांगितले.

शेवग्याचे सूप

अमृता यांनी पुढे सांगितले की, “आमच्या घरी दररोज आमच्या आहारात शेवग्याचे सूप असते.” “पंतप्रधान मोदींनी स्वतः त्याच्या फायद्यांविषयी सांगितल्यानंतर आम्ही ते नियमितपणे सेवन करण्यास सुरुवात केली. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात,” अमृता यांनी ही माहिती कर्लीटेल्सशी बोलताना दिली. अमृता यांनी शेवग्याच्या सुपाची रेसिपी थोडक्यात सांगितली; शेवगा गरम पाण्यात शिजवून घ्या. ते पाणी गाळून त्यात आणि मीठ घालावे.

घशासाठी घेतात हा काढा

अमृता यांनी सांगितले की, “एक गायिका म्हणून माझ्याकडे एक चांगला काढा आहे, जो मी रेकॉर्डिंग करताना किंवा गाताना घेते.” “पाण्यात दालचिनी, लवंग, वेलची आणि आले घाला. ते उकळल्यानंतर थोड्या वेळ तसेच ठेवा आणि नंतर घ्या. ते घशासाठी खूप चांगले आहे.”

महाराष्ट्राचे पारंपारिक जेवण

निवांत रविवारी माझ्या जेवणात भाकरी असते. ज्वारी किंवा बाजरी, हिरव्या पालेभाज्या, कढी किंवा आमटी. हेच आमचे पारंपरिक जेवण आहे, असे अमृता यांनी सांगितले.

अमृता यांनी असेही सांगितले की, “त्यांच्या जेवणात रागी पिझ्झा, घरी बनवलेले केचपसह, टोफू सँडविच, पनीर रोल, ओट्स-ब्लूबेरी-बदामाच्या दुधापासून तयार केलेला गोड पदार्थ अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो. घरच्या जेवणात तूप किंवा ऑलिव्ह तेल वापरले जाते.”

इंटरमिटंट फास्टिंग आणि पौष्टिक जेवणांचा समतोल”

इंटरमिटेंट फास्टिंग संदर्भात दी इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार डायटिशियन गरिमा गोयल यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी सांगितले की, “अमृता फडणवीस यांचा दिवसातून फक्त दोन वेळा जेवण घेण्याचा दृष्टिकोन हा शिस्तबद्ध आहाराचा एक प्रकार दर्शवतो, ज्यात पचनाला विश्रांती मिळते आणि चयापचयाचा वेग संतुलित राहतो.”

“इंटरमिटंट फास्टिंगमुळे पचनास विश्रांती, चयापचय संतुलन आणि क्रेव्हिंग कंट्रोल

“इंटरमिटेंट फास्टिंगची ही पद्धत काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण यामुळे शरीराला दोन जेवणांच्या दरम्यान जास्त वेळ मिळतो, जे पचन आणि चयापचयाला पुन्हा सज्ज होण्यास मदत करते. अनेक लोकांना असे आढळते की, कमी पण जास्त पौष्टिक जेवण घेणे क्रेव्हिंग (काहीतरी खाण्याची इच्छा) नियंत्रित करायला, मानसिक स्पष्टता वाढवायला आणि नैसर्गिकरित्या भूक नियंत्रित करायला मदत करते,” असं गोयल यांनी सांगितले.

पोषणाच्या दृष्टिकोनातून पाहता, दोन वेळा जेवण्याच्या यशाचे प्रमाण पूर्णपणे त्या जेवणांच्या घटकांवर अवलंबून असते. प्रत्येक प्लेट पौष्टिकदृष्ट्या संपूर्ण असावी, ज्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, उच्च दर्जाचे प्रोटीन, फायबर आणि आरोग्यदायी फॅट्स यांचे योग्य संतुलन असावे.

“उदाहरणार्थ, जर एका जेवणात डाळ, भाज्या आणि बाजरी/ज्वारीची भाकरी असेल आणि दुसऱ्या जेवणात लीन प्रोटीनसह हंगामी भाज्या आणि काही हेल्दी फॅट्स असतील, तर हा आहार संतुलित आणि उपयुक्त ठरू शकतो. तसेच, आवश्यक असल्यास फळे, बदाम/काजू किंवा हलके सूप यांच्याद्वारे पर्याप्त हायड्रेशन आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळवणेदेखील महत्त्वाचे आहे,” असं गोयल यांनी स्पष्ट केले.

“फक्त दोन जेवणांमध्ये संतुलित पोषण – इंटरमिटंट फास्टिंगचा फायदा”

तसेच हे देखील लक्षात घ्यावे की, इंटरमिटेंट फास्टिंग ही पद्धत सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. गरिमा गोयल यांच्या मते, ज्यांना जास्त ऊर्जा आवश्यक आहे, जे नियमित व्यायाम करतात, ज्यांना रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते किंवा ज्यांना हार्मोनल असंतुलन आहे, त्यांच्यासाठी दोन वेळा जेवण पुरेसे नसते आणि त्यांच्या कार्यक्षमता व मूडवर परिणाम होऊ शकतो.

“अशा परिस्थितीत, जेवणांमध्ये जास्त अंतर असल्याने नंतर जास्त खाण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते किंवा रक्तातील साखरेत चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे ही पद्धत अवलंबण्यापूर्वी आपल्या शारीरिक हालचालीची पातळी, झोपेची गुणवत्ता आणि चयापचयाच्या गरजा तपासणे महत्त्वाचे आहे,” असं गोयल यांनी सांगितले.

काळजीपूर्वक दिवसातून दोन वेळा जेवण घेणे मानसिकरित्या खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देऊ शकते. असे आहार स्वीकारताना खरी उद्दिष्टे नेहमी शाश्वत असावी, केवळ बंधने लादण्यासाठी नव्हे.