सावा : सावा हे भारतातील सर्वात जुन्या पिकांपैकी एक आहे आणि कोरडय़ा जमिनीत पिकवले जाणारे महत्त्वपूर्ण तृणधान्य आहे. हा वरईचाच एक प्रकार आहे. त्यास वरी, कुटकी या नावांनीही ओळखले जाते. दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे सावा हे प्रमुख अन्न आहे.

सावामध्ये मोठय़ा प्रमाणात पौष्टिक घटक आहेत. ते ग्लुटेनमुक्त आहे. यात तंतूमय पदार्थ चांगले असतात. संशोधनानुसार भगर, कोदो आणि सावा या काही भरडधान्यांच्या जातींमध्ये ३७ ३८ टक्के फायबर असल्याचे नोंदवले गेले आहे, जे धान्यांमध्ये सर्वात जास्त आहे. फायबरमुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते आणि भूक लवकर तृप्त होते. सावामध्ये ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स’ (पीयूएफए- पूफा) असतात.

हेही वाचा >>> अवांतर : डोळय़ांची काळजी..

सावामधील फ्लेव्होनॉईड्स हे ‘अँटिऑक्सिडंट’ म्हणून कार्य करतात आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर ठरतात.

भरडधान्ये फायटोकेमिकल्स आणि फायबरचे समृद्ध स्रोत आहेत. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास निर्माण होतो त्यांच्यासाठी हे अन्न चांगले समजले जाते.

हृदयाच्या समस्या, लठ्ठपणा आणि सांधेदुखीने ग्रस्त व्यक्तींसाठीही हे पौष्टिक अन्न मानले जाते. प्रति १०० ग्रॅम सावामध्ये ८.७ ग्रॅम प्रथिने, ७५.७ ग्रॅम कबरेदके, ५.३ ग्रॅम चरबी आणि १.७ ग्रॅम खनिजे असतात. कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स आणि फिनोप्लिक संयुगे यांचे प्रमाण त्यात चांगले असते.

सावाची खिचडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहित्य – सावा पाऊण कप, मसूर डाळ पाव कप, चिरलेल्या मिक्स भाज्या (गाजर, शेवगा, फरसबी, कांदा) २ कप, लाल मिरच्या ४, चिंचेचा कोळ ३ चमचे, कढीपत्ता २-३ पाने, कोथिंबीर, मोहरी पाव चमचा, हळद पाव चमचा, हिंग चिमूटभर, मीठ, सांबार मसाला २ छोटे चमचे, पाणी, तेल कृती – एका कुकरमध्ये सावा, मसूर डाळ, हळद, मीठ आणि चार कप पाणी टाकून त्याच्या पाच ते सहा शिट्टय़ा काढून घ्या. नंतर एका पॅनमध्ये थोडे तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, लाल मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता टाकून परता. नंतर त्यामध्ये सांबार मसाला, चिंचेचा कोळ आणि चिरलेल्या मिक्स भाज्या घालून शिजवून घ्या. त्यातच शिजवलेला साव्याचा भात टाकून एकत्र करून घ्या. तयार भात ताटलीत काढून त्यावर कोथिंबीर पेरा. साव्याची खिचडी तयार आहे.