Kidney Cancer Warning Signs : आजच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याला प्राधान्य देणे खूप महत्त्वाचे आहे. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर आपण काम, कुटुंब व वैयक्तिक आरोग्य जपत संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोक हृदयाचे आरोग्य चांगले जपण्याचा, तसेच वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण किडनीच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. किडनीच्या कर्करोग प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. या कर्करोगासंबंधित धोका जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
किडनीचा कर्करोग हा प्रामुख्याने किडनीच्या असामान्य पेशींच्या वाढीमुळे उद्भवतो, ज्यामुळे ट्यूमर होतो. वयानुसार हा धोका वाढत जातो आणि त्यामुळे वयाच्या चाळिशीत लक्षणे लवकर ओळखणे आणि धोकादायक घटकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरोग्यावर सकारात्मक फरक जाणवू शकतो.
किडनीच्या कर्करोगाची लक्षणे
नाशिक येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक व सर्जिकल ऑन्कोलॉजीचे प्रमुख डॉ. राज नगरकर हे किडनीच्या कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यातील लक्षणे ओळखणे किती महत्त्वाचे आहे याविषयी सांगतात. किडनीच्या कर्करोगामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षणे दिसून येत नाहीत; पण हा कर्करोग जसजसा वाढत जातो, तसतशी लक्षणे दिसू लागतात.
लघवीमधून रक्त येणे (Hematuria) : यामुळे लघवी लालसर किंवा तपकिरी दिसू शकते. जर असे दिसून आले, तर त्वरित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पाठीच्या खालच्या भागात सातत्याने होणारी वेदना (पाठदुखी) : आराम करूनही सतत पाठदुखी जाणवत असेल, तर किडनीमध्ये समस्या असल्याचे ते एक लक्षण असू शकते.
वजन कमी होणे : आहार किंवा व्यायाम किंवा शारीरिक हालचाली यांमध्ये कोणताही बदल न केल्याशिवायही वजनात लक्षणीय घट दिसून येत असेल, तर ते किडनी किंवा इतर कर्करोगांसाठी धोक्याचे लक्षण असू शकते.
थकवा जाणवणे : दैनंदिन जीवनात सतत थकवा जाणवत असेल, तर त्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.
सूज येणे किंवा अवयव फुगणे : ओटीपोट, पाय किंवा घोटा यांमध्ये द्रवपदार्थ साचल्याने सूज येत असेल किंवा अवयव फुगत असेल, तर ते किडनीचे कार्य बिघडल्याचे लक्षण असू शकते.
वारंवार लघवी येणे : जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल आणि विशेषतः रात्रीच्या वेळी तुम्ही वारंवार लघवीसाठी झोपेतून उठत असाल, तर तुम्ही आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
ताप येणे किंवा रात्री घाम येणे : सतत ताप येत असेल किंवा रात्री खूप घाम येत असेल, तर ते लक्षण किडनीची समस्या असल्याचे दर्शवते.
खालील उपाय तुम्ही करू शकता
आनुवंशिक आजारासारखे धोकादायक घटक नियंत्रित करता येत नसले तरी निरोगी जीवनशैलीचा वापर करून तुम्ही धोका कमी करू शकता, असे डॉ. नगरकर सांगतात.
वजन नियंत्रित ठेवणे : लठ्ठपणा हा एक धोकादायक घटक आहे. तुम्ही संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे वजन कमी करू शकता.
धूम्रपान टाळा : तंबाखूच्या सेवनाने किडनीच्या कर्करोगाची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. धूम्रपान सोडल्याने हा धोका कमी होतो.
मद्यपान मर्यादित करा : अतिप्रमाणात मद्यपान केल्याने किडनीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
हायड्रेटेड राहा: भरपूर पाणी प्यायल्याने किडनीचे कार्य आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवणे : अनियंत्रित उच्च रक्तदाब किडनीवर ताण आणू शकतो, त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
जर तुम्हाला धोकादायक लक्षणे किंवा घटक जाणवत असतील, तर त्वरित आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घ्या. सुरुवातीच्या टप्प्यात किडनीच्या कर्करोगावर उपचार केले, तर ते फायदेशीर ठरू शकते. ही लक्षणे समजून घेण्यासाठी आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.