Fungus, Black Spots on Onion: कांदा हा आपल्या स्वयंपाकघरातला सर्वात महत्त्वाचा आणि आवर्जून वापरला जाणारा. काही लोक उन्हाळ्यात कांदे ६ महिने किंवा वर्षभरासाठी साठवून ठेवतात. कारण पावसाळ्यात बऱ्याचदा कांदे ओले होतात किंवा जर बाजारात कांदे चांगले नसतील तर घरी ते वापरेपर्यंत आणखी खराब होऊ शकतात. अशावेळी साठवलेल्या कांद्यांवर तुम्हाला काळे डाग दिसतात ते नेमकं काय असतं? तसंच असे काळे डाग दिसल्यावर ते कांदे खाणं योग्य आहे की नाही याबाबत तज्ज्ञांनी काही माहिती सांगितली आहे.
बंगळुरूच्या फोर्टिस रूग्णालयातील पोषणतज्ज्ञ भारती कुमार यांनी काळे डाग असलेले कांदे खाणं सुरक्षित आहे की नाही यावर चर्चा केली आहे. काळे डाग असलेले कांदे खाण्यायोग्य असतीलच असे नाही, मात्र ते खाऊ नयेच असं उत्तर देणं अवघड असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
डॉ. भारती यांनी सांगितल्याप्रमाणे, कांद्यावर काळे डाग उबदार, दमट परिस्थितीत वाढणाऱ्या सामान्य बुरशीमुळे होतात. ते काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे नसले तरी ते चिंतेचे कारण ठरू शकतात. काळ्या डागांनी झाकलेल्या किंवा गडद, काळ्या रंगाचा लेप असलेल्या कांद्याच्या साली एस्परगिलस नायजर यासारख्या जीवांच्या पृष्ठभागावर बुरशीजन्य वाढीमुळे होतात. ही एक साधी पर्यावरणीय बुरशी असल्याचे म्हटले जाते. ती उबदार, दमट आणि कमी हवेशीर साठवणूक परिस्थितीत वाढते. तसंच ही परिस्थिती म्यूकोर्मायसेट्समुळे होणाऱ्या परिस्थितींपेक्षा कमी गंभीर असते. म्यूकोर्मायसेट्समुळे काळ्या बुरशीचा संसर्ग पसरतो.
कांद्यावर काळे डाग कसे येतात?
पोषणतज्ज्ञांच्या मते, कांद्याचे बाह्य थर गडद, पावडसारख्या घटकाने झाकलेले असतात, त्यामुळे ते काजळी किंवा कोळशासारखे दिसतात. जेव्हा कांद्याच्या त्वचेला दुखापत होते किंवा वाहतूक आणि साठवणुकीदरम्यान ओलावा जास्त होतो, तेव्हा बुरशी कांद्याला संक्रमित करते.
डॉ. भारती यांनी सांगितले की, कांद्यावर काळे डाग निर्माण करणारी बुरशी ऑक्रॅटॉक्सिन ए, मायकोटॉक्सिन तयार करू शकतात, जे दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास किडनी आणि लिव्हर विषारी होते. हे विष मध्यम उष्णतेला देखील प्रतिरोधक असते, म्हणून स्वयंपाक केल्याने ते नष्ट होत नाही. त्यामुळे कोणत्याही स्वयंपाकाच्या वापरापूर्वी कांदा नीट पहा आणि त्याची साठवणूकही योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.
कांदे कधी टाकून द्यावेत?
जर काळे डाग फक्त बाहेरील त्वचेपुरते मर्यादित असतील आणि आतील थर व्यवस्थित असतील तर तुम्ही बुरशी असलेला भाग सोलून उर्वरित भाग वापरू शकता. जर बुरशी जास्त आतमध्ये गेली असेल किंवा कांदा मऊ असेल तर तो टाकून देणंच योग्य आहे.
क्लिनिकल दृष्टिकोनातून जर काळ्या रंगाची बुरशी कांद्याच्या कोरड्या बाहेरील सालीपुरती मर्यादित असेल आणि आतील आवरणं व्यवस्थित पांढरी आणि गडद रेषा असलेली असतील तर एखाद्या निरोगी, फिट व्यक्तीसाठी याचा धोका कमी असतो. जर कांदा पूर्णपणे सोलून धुवून आणि लवकर शिजवला गेला तर तो खाण्यास योग्य आहे. मात्र, तो वापरताना सावधगिरी बाळगण्याची गरजही आहे.
काही महत्त्वाच्या गोष्टी तुमचे स्वयंपाकघर निरोगी ठेवण्यास महत्त्वाचे ठरते.
- कांदा साठवलेल्या खोलीत दमटपणा असेल तर कांद्याला बुरशी येण्याची शक्यता जास्त आहे. कांदा मऊ, ओलसर किंवा कुजला असेल तर मायकोटॉक्सिन तयार होण्याची किंवा सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता आणखी असते.
- ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. अनियंत्रित मधुमेह, दीर्घकालीन फुप्फुस किंवा लिव्हरचे आजार असलेल्यांनी रंगीत, बुरशीयुक्त पदार्थ किंवा खराब फळे आणि भाज्या खाऊ नयेत.
- साठवणूक आणि हाताळणी हे महत्त्वाचे आहे. कांदे थंड, कोरड्या, हवेशीर जागी, थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावेत. ओलसर, हवेशीर नसलेली साठवणूक बुरशीजन्य बीजाणूंना वाढीस कारणीभूत ठरते.
- अन्न व्यवसाय, रेस्टॉरंट्स आणि घरी वापरासाठी खरेदी करताना व्यवस्थित तपासून कांदे घ्या.
