एंग्झायटी अटॅक आणि पॅनिक अटॅक – दोन्ही शब्द मानसिक आजाराशी संबंधित आहेत. या संज्ञा एका विशिष्ट परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जातात, पण त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हेल्थलाइनच्या मते, “एंग्झायटी अटॅक काही विशिष्ट तणावाच्या प्रतिसादात निर्माण होतो आणि हळूहळू वाढू शकतो, तर पॅनिक अटॅक अनपेक्षितपणे आणि अचानक येऊ शकतो. दोन्ही मूलभूत आरोग्य स्थिती दर्शवू शकतात.’

सर्वसाधारणपणे, पॅनिक अटॅक हे एंग्झायटी अटॅकपेक्षा जास्त गंभीर असतात. पण जास्त प्रमाणातील अवस्थता आणि चिंतेमुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो. परंतु डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डरच्या पाचव्या आवृत्तीमध्ये एंग्झायटी अटॅकबाबत उल्लेख नाही याबाबत सविस्तर स्पष्टीकरण देताना जिंदाल इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल सायन्सेसच्या साहाय्यक प्राध्यापक, डॉ. नमिता रुपारेल सांगतात की, पॅनिक अटॅकची सुरुवात अचानक होते, तो कोणतीही चेतावणी न देता येतो आणि केवळ ‘संभाव्य धोक्याचा’ विचार करून होऊ शकतो.

हेही वाचा : धुतल्यानंतरही तुमचे केस तेलकट दिसतात का? जाणून घ्या कारण आणि उपाय

पॅनिक अटॅक म्हणजे काय?

पॅनिक अटॅकचे वैशिष्ट्य म्हणजे तीव्र भीतीचा अचानक येणारा झटका जो वास्तविक धोका किंवा कारण स्पष्ट नसताना गंभीर शारीरिक प्रतिक्रियांना चालना देतो. दीर्घकाळापर्यंत चिंतेने ग्रासल्याने पॅनिक अटॅकदेखील होऊ शकतात.

“पॅनिक ही भीतीची तीव्र भावना आहे जी अनियंत्रित असते आणि एखाद्याला त्यांची परिस्थिती स्पष्टपणे समजून घेण्यापासून रोखते. ही स्थिती शारीरिक आणि मानसिक लक्षणांवरून स्पष्ट दिसते. अशा परिस्थितीत, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक वाढणारी भीती एखाद्या व्यक्तीला ग्रासते. पॅनिक अटॅकची सुरुवात अचानक होते, कोणत्याही चेतावणीशिवाय तो उद्भवतो, ते थांबवण्याचा कोणताही मार्ग नसतो आणि घाबरण्याचे कारण वास्तविकतेशी संबंधित नसते; हे सहसा संभ्याव्य धोक्यांचा विचार केल्यामुळे उद्भवते.”

पॅनिक अटॅकने त्रस्त असताना, तुम्हाला येऊ घातलेल्या धोक्याची भावना वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे, थरथर कापणे, थंडी वाजणे, मळमळ, ओटीपोटात दुखणे असा अनुभव येऊ शकतो.

हेही वाचा : उपवास सोडताना पपई खाणे आरोग्यासाठी का आहे सर्वोत्तम पर्याय?

एंग्झायटी अटॅक म्हणजे काय?

एंग्झायटी अटॅकमध्ये सामान्यतः काही विशिष्ट घटना किंवा समस्या उद्भवण्याची भीती असते. एंग्झायटी ही स्थिती पॅनिक अटॅकपेक्षा वेगळी असली तरी ती चिंता किंवा पॅनिक डिस्ऑर्डरचा भाग म्हणून येऊ शकते. “काळजी, तणाव, अस्वस्थता आणि भविष्याबद्दल अनाहूत विचारांसह नको त्या विचारांची साखळी आणि काहीतरी वाईट घडण्याची अपेक्षा याला चिंता म्हणतात, यामुळे शरीरात बदल होऊ शकतात. जसे की हृदयाची गती वाढणे, रक्तदाब वाढणे, इन्सुलिनची पातळी वाढणे.” असे डॉ. रुपारेल यांनी सांगितले

एंग्झायटीमुळे अस्वस्थता, थकवा, स्नायूंवर ताण येणे आणि चिडचिडपणा जाणवणे, तर पॅनिक अटॅकमुळे थरथरणे, छातीत दुखणे, गरम होणे किंवा थंडी जाणवणे आणि स्वतःपासून, जगापासून अलिप्तपणाची भावना निर्माण होणे आणि स्वत:वरील नियंत्रण गमावणे ही लक्षणे जाणवतात. एंग्झायटी अटॅकची मानसिक स्थिती ही भविष्याच्या अनिश्चिततेमुळे निर्माण होते, जी संभाव्य धोका दूर करण्याच्या उद्देशाने दीर्घकाळापर्यंत टिकून राहते.

दोघांमधील मुख्य फरक

पॅनिक अटॅक आणि एंग्झायटी अटॅकमध्ये अनुभवलेली शारीरिक लक्षणे सारखीच असली तरी, दोघांमध्ये एक फरक आहे. “पॅनिक अटॅक अचानक येतात तर एंग्झायटी अटॅक हळूहळू येतात,” डॉ. रुपारेल यांनी इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना सांगितले.

त्यांनी स्पष्ट केले की, ”पॅनिक अटॅक काही मिनिटांसाठी येतो तर एंग्झायटी अटॅक अनेक महिन्यांसाठी येतो. एंग्झायटी अटॅकमुळे अस्वस्थता, थकवा, स्नायूंवर ताण आणि चिडचिडेपणा, तर पॅनिक अटॅकमुळे थरथर थरथरणे, छातीत दुखणे, ताप किंवा थंडी जाणवणे आणि स्वतःपासून, जगापासून अलिप्तपणाची भावना आणि नियंत्रण गमावणे ही लक्षणे दिसतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. रुपारेल यांनी सांगितले की, “कोणत्याही प्रकरणामध्ये, या अटॅकच्या घटनांबद्दल जागरूकता ठेवून औपचारिक निदान करण्याची शिफारस केली जाते. ध्यान, विश्रांती, श्वासोच्छवासाची तंत्रे पॅनिक अटॅक किंवा एंग्झायटी अटॅकचा सामना करण्यास मदत करू शकतात.”