पाणी हे जीवन आहे हे सत्य असले तरी पाणीसुद्धा आरोग्याला बाधक होते, असा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस कधी व कशाप्रकारे पडतो,यावरुन त्या पावसाच्या पाण्याचे गुणदोष जाणता येतात आणि त्या गुणदोषांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेता येतो,या विचाराने आयुर्वेदाने पावसाच्या पाण्याचाही अभ्यास केला.पावसाच्या पाण्याविषयी शास्त्राने केले मार्गदर्शन वाचकांना पाण्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देईल.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

दिवसाच्या पावसाचे व रात्रीच्या पावसाचे गुणदोष
दिवसा पडणारा पाऊस व रात्री पडणारा पाऊस या वेगवेगळ्या वेळी पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे गुणधर्म वेगळे असू शकतील का? हा विचारही कदाचित तुमच्या-आमच्या मनात येणार नाही. मात्र आपल्या पूर्वजांनी याचा विचार केला आहे. दिवसा आकाशामध्ये जरी सूर्य आपल्याला दिसत नसला तरी तो ढगांच्या वर असतोच, त्यामुळे त्या पावसाच्या पाण्यावर सूर्यकिरणांचा प्रभाव हा पडतोच. दुसरीकडे रात्री जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा आकाशात सूर्य नसतो. त्यामुळे रात्री पडणार्‍या त्या पावसाच्या पाण्यावर सूर्यकिरणांचा नव्हे तर चंद्रकिरणांचा प्रभाव असतो. असे पावसाशी संबंधित गोष्टींचे केलेले निरीक्षण व त्यावर आधारित आयुर्वेदाने काढलेले निष्कर्ष समजून घेण्यासारखे आहेत.

आणखी वाचा: Health Special: तांबे, पितळ, स्टील-कशातून खावंप्यावं?

दिनवृष्टी (दिवसा पडणारा पाऊस) (हारितसंहिता १.७.१५)
दिवसा सूर्याच्या किरणांनी तप्त झालेल्या ढगांमधून जो पाऊस पडतो, त्या पावसाचे पाणी हे पचायला हलके, कफशामक, तहान भागवणारे मात्र वातप्रकोपक असते. त्यामुळे हे पाणी सर्वांना सहज पचणारे, कफ कमी करणारे मात्र शरीरामध्ये वात वाढवणारे असते. त्याचमुळे वातविकाराने ग्रस्त मंडळींनी दिवसा पडणार्‍या पावसाचे पाणी टाळणे योग्य आणि प्यायचे झाल्यास त्या पाण्यामध्ये सुंठ, जिरे, बडीशेप, वावडींग, धने, (सम प्रमाणात) टाकून उकळवून प्यावे.

आणखी वाचा: Health Special: पावसाळा, अशुद्ध पाणी आणि आजारांची मालिका

निशावृष्टी (रात्री पडणारा पाउस) ( हारीत संहिता१.७.१४)
रात्री पडणार्‍या पावसावर सूर्यकिरणांचा प्रभाव नसून चंद्रकिरणांचा व रात्रीच्या थंड वातावरणाचा प्रभाव असतो. रात्री पडणार्‍या पावसाचे पाणी हे शीत गुणांचे, शरीरामध्ये थंडावा वाढवणारे असते. पचायला जड असणारे हे पाणी शरीरामध्ये वात व कफ वाढवते. त्यामुळे ज्यांना थंडी बाधते अशा मंडळींना व जे सर्दी-कफ-थंडीताप-खोकला-दमा अशा आजारांनी त्रस्त असतात किंवा ज्यांना हे आजार वारंवार होतात त्यांना रात्रीच्या पावसाचे पाणी वर्ज्य आहे. एकंदरच कफविकाराने ग्रस्त मंडळींनी रात्रीच्या पावसाचे पाणी टाळावे. त्याचबरोबर थंड असल्याने हे पाणी वातविकाराने त्रस्त व वातविकृतीच्या मंडळींनी सुद्धा टाळावे. हारीतसंहिता या ग्रंथामध्ये रात्रीच्या पाण्याचा एक वेगळाच दोष सांगितलेला आहे. तो म्हणजे रात्रीच्या पावसाचे पाणी हे समुद्राच्या पाण्यासारखे असते. (हारीत संहिता१.७.१४)

वास्तवात समुद्राचे पाणी हे खारट असते. मग रात्री पडणार्‍या पावसाचे पाणी खारट असते काय? रात्री पडणार्‍या पावसाच्या पाण्यामध्ये सोडियमचे आयन हे हायड्रोजेन आयन्सच्या तुलनेने अधिक प्रमाणात असतात? की समुद्राचे पाणी हे जसे मानवी आरोग्याला हितकारक नाही,त्याचप्रमाणे रात्रीच्या पावसाचे पाणीसुद्धा हितकारक नाही,असे शास्त्राला सुचवायचे आहे.

दिवसा व रात्री पडणार्‍या पावसाचे गुणदोष जाणून घेतल्यानंतर समजून घेऊ क्षणवृष्टी व दुर्दिन वृष्टीविषयी.

क्षणवृष्टी आणि दुर्दिनवृष्टी (हारितसंहिता १.७.१७)
क्षणवृष्टी म्हणजे थांबून-थांबून काही क्षण पडणारा पाऊस, हा मानवी आरोग्याला बाधक असतो. अधून-मधून पडणार्‍या या पावसाचे पाणी हे वात-पित्त-कफ या तीनही दोषांना प्रकुपित करणारे, रोग निर्माण करणारे व त्यामुळे संपूर्ण आरोग्याला बाधक असते. विशेषतः त्वचेवर खाज येण्यास (पर्यायाने विविध त्वचाविकारास) कारणीभूत होते व रोगांना आमंत्रण देते. एकंदरच हे पाणी प्रशस्त नसते, असे आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेले आहे.
दुसरा प्रकार आहे दुर्दिनवृष्टीचा. दुर्दिन म्हणजे वाईट दिवस, म्हणजे ज्या दिवशी ढग दाटून येतात,वातावरण कुंद-काळोखे झालेले असते, सोसाट्याचे वारे सुटलेले असतात व वादळी पावसाची चिन्हे दिसत असतात असा दिवस. असा दिवस हा दुर्दिन (वाईट दिवस) समजण्यात आलेला आहे. अशा दुर्दिनी पडणार्‍या पावसावर वार्‍यांचा प्रभाव असतो. साहजिकच असे पाणी हे मुख्यत्वे वातुळ असते. शरीरामध्ये वात व कफ या दोन दोषांना प्रकुपित करणारे, मात्र शरीराला तृप्ती देणारे व शरीराचा शोष कमी करणारे असते. दुर्दिनी होणार्‍या पावसाच्या पाण्याचा आणखी एक दोष सांगितलेला आहे,तो म्हणजे ते पाणी खाज-खरुज निर्माण करणारे असते. (हारितसंहिता १.७.१६)

दुर्दिन हा पंचकर्म उपचार करण्यासाठी अयोग्य दिवस सांगण्यात आलेला आहे, त्या दिवशी केलेला उपचार यशस्वी तर होत नाहीच , किंबहुना विपरित परिणाम दाखवू शकतो. शस्त्रकर्म करण्यासाठीसुद्धा दुर्दिन योग्य समजला जात नाही. याच कारणासाठी दुर्दिन असताना शुभ कार्येसुद्धा करु नये,असे म्हटले जाते.(पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये तशीही फ़ारशी शुभकार्ये होत नाहीत.) २१व्या शतकामध्ये वर सांगितलेले हवामान असलेले दिवस आठवड्यातून एखाददोन वेळा असतातच. अशावेळी काय करावे हा प्रश्न पडेल? त्याचे उत्तर असे की आपली रोजची नित्य कर्मे व नित्य व्यवहार तर करण्यास बाधा नाही. मात्र विशेष कार्य, शुभ कार्य टाळण्याचे वा एखाद्या कार्याचा आरंभ दुर्दिनी न करण्याचे तारतम्य ठेवावे.

आजच्या २१व्या शतकात दिवसाचे पाणी व रात्रीचे पाणी हा भेद किंवा क्षणवृष्टी वा दुर्दिन वृष्टी यांचे फारसे महत्त्व आपल्याला वाटणार नाही. आज हे विषय आपल्याला महत्त्वाचे नसले तरी प्राचीन समजल्या जाणार्या आयुर्वेदशास्त्राचा मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीकडे पाहाण्याचा व्यापक दृष्टीकोन इथे वाचकांच्या लक्षात येईल. या अशा विषयांवर संशोधन व्हायला हवे.