मागील काही दिवसांपासून उष्माघात हा शब्द अनेकवेळा तुमच्या ऐकन्यात आला असेल. त्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघरमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, हा कार्यक्रम भर दुपारी झाल्यामुळे पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित लोकांपैकी १२ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून उष्माघात या शब्दाची चर्चा सुरु आहे.
पण हा उष्माघात नक्की आहे तरी काय? आणि त्याचा त्रास कशामुळे उद्भवतो, उष्माघाताचा त्रास जाणवायला लागल्याची लक्षण काय आणि त्यापासून स्वत:च रक्षण कसं करायचं याबाबतची माहिती अनेकांना नसते. तीच महत्वपुर्ण माहीती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही उष्माघातापासून स्वत:चा बचाव करु शकता. तर उन्हामुळे वाढलेल्या अनेक समस्यांवर डॉ. प्रदीप आवटे यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे. ज्यामध्ये उष्माघाताच्या समस्येचाही समावेश आहे.
हेही वाचा- Summer Tips : उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रस्त आहात? मग घरीच करा ‘हे’ ७ उपाय
- उष्माघात ( हिट स्ट्रोक) लक्षणे –
उष्माघाताची समस्या उद्भवताच शरीराचे तापमान १०६ डिग्री सेल्सियसपर्यंत जाते. तसेच त्वचा गरम आणि कोरडी पडते. नाडीचे ठोके वेगाने आणि जोरात पडतात. घाम न येणे आणि अर्धवट शुध्दीत असणे, ही उष्माघाताची लक्षण आहेत.
- प्रथमोपचार –
जर एखाद्याला उष्माघाताचा त्रास जाणवायला लागला तर त्या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. तसेच त्याला थंड जागी / ए सी मध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. तसेच या रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पॉन्जिग करणं आवश्यक आहे. मात्र यावेळी त्याच्या तोंडाने पाणी देऊ नये.
उष्माघाताने मृत्यू का होतो ?
उष्माघात ही अत्यंत गंभीर बाब आहे. शरीराचे तापमान जेव्हा १०६ डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानास १५ मिनिटाकरता राहते तेव्हा त्याचे अत्यंत विपरित परिणाम शरीरावर होतात. शरीराचे सामान्य तापमान नियंत्रण यंत्रणा काम करत नाही. प्रथिने उष्णतेमुळे खराब होतात. विविध प्रकारचे लायपोप्रोटिन्स आणि फॉस्पोलिपिडस अस्थिर होतात. शरीरातील पातळ पडद्यामध्ये असणारे मेद पदार्थ वितळतात. यामुळे रक्ताभिसरण संस्था अकार्यक्षम होते आणि विविध अवयवांचे कामकाज ठप्प होऊ लागते. या रुग्णाला वेळेवर तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास त्याचा मृत्यू ओढवतो.
उष्माघाताच्या समस्येपासून आपला आणि इतरांचा बचाव करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे उष्णतेपासून बचाव करणे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत, त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करु नये या संदर्भातील माहिती असणे आवश्यक आहे.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करु नये –
- हे करा –
- पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.
- हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्रीचा वापर करा.
- उन्हात जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.
- कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ४ नंतर करा.
- ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
- हे करु नका –
- शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळा.
- कष्टाची कामे उन्हात करु नका.
- पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
- गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका.
- दुपारच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
- चहा, कॉफी सारखी ड्रिंक्स टाळा.
- खूप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या)