Kidney transplant vs dialysis: बॉलिवूड अभिनेते सतीश शहा यांच्या अचानक निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली. २५ ऑक्टोबर रोजी त्यांचे ७४व्या वर्षी निधन झाले. सतीश शहा यांचे किडनी ट्रान्सप्लांट झाले होते अशी माहिती त्यांचे जवळचे मित्र सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत दिली. २०२५च्या सुरूवातीलाच सतीश शहा यांचे किडनी ट्रान्सप्लांट झाले होते. शिवाय डायलिसिस हादेखील या आजारातील महत्त्वाचा भाग आहे. किडनी ट्रान्सप्लांट आणि डायलिसिस याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हैदराबादमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी अँड युरोलॉजी इथले वरिष्ठ सल्लागार डॉ. सुजित रेड्डी यांनी किडनी ट्रान्सप्लांट आणि डायलिसिसबाबत सांगितले आहे.
डायलिसिस विरूद्ध किडनी ट्रान्सप्लांट
डायलिसिस ही एक उपचारपद्धती आहे, जी किडनी योग्यरित्या कार्य करत नसताना रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकते. याचे दोन प्रकार आहेत.
हेमोडायलिसिस – यामध्ये शरीराबाहेरील मशीनद्वारे रक्त फिल्टर केले जाते.
पेरिटोनियल डायलिसिस – यामध्ये पोटाचे अस्तर फिल्टर म्हणून काम करते आणि द्रवपदार्थ मॅन्युअली किंवा मशीनद्वारे बदलला जातो.
किडनी ट्रान्सप्लांटमध्ये निकामी झालेली किडनी काढून निरोगी किडनी प्रत्यारोपित केली जाते.
किडनी ट्रान्सप्लांटचे फायदे
किडनी ट्रान्सप्लांटमुळे जीवनमान सुधारते आणि वारंवार डायलिसिसची आवश्यकता लागत नाही.
ट्रान्सप्लांट केलेले रूग्ण साधारणपणे डायलिसिस रूग्णांपेक्षा जास्त काळ जगतात.
डायलिसिस रूग्णांच्या तुलनेत ट्रान्सप्लांट केलेल्या रूग्णांना अन्नावर कमी निर्बंध आहेत.
ऊर्जा राहते आणि किडनी निकामी होण्यासंबंधित इतर समस्या कमी होतात.
किडनी ट्रान्सप्लांटचे तोटे
किडनी ट्रान्सप्लांट करताना चांगले आरोग्य आणि किडनी दात्याशी सुसंगतता असणे देखील महत्त्वाचे आहे.
आयुष्यभर इम्युनोसप्रेसिव्ह औषधांमुळे संसर्ग आणि इतर दुष्परिणामांचा धोका वाढू शकतो.
अनेक रूग्ण किडनी दात्याच्या प्रतीक्षेत असतात.
शस्त्रक्रियेदरम्यान संसर्ग, रक्तस्त्राव आणि नवीन किडनी शरीर नाकारण्याचा धोका असू शकतो.
डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट
डायलिसिस हे फार कमी काळासाठी सुरक्षित मानले जाते. कारण त्यासाठी मोठ्या शस्त्रक्रियेची गरज नसते. असं असताना शरीर निरोगी राहण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी किडनी ट्रान्सप्लांट हा एक चांगला पर्याय आहे. डॉ. रेड्डी यांनी सांगितल्याप्रमाणे, पात्र रूग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, जे ट्रान्सप्लांटसाठी योग्य नाहीत, त्यांच्यासाठी डायलिसिस हा एक आवश्यक आणि प्रभावी पर्याय आहे. अशा परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
किडनी निकामी होण्यापासून कसे टाळू शकता?
शरीरातील इतर अवयवांप्रमाणे किडनीची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा किडनी रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त द्रवपदार्थ फिल्टर करण्याची क्षमता गमावतात, त्यावेळी किडनी निकामी होते. अशावेळी उपचार केले नाही तर ही समस्या गंभीर होऊ शकते आणि हळूहळू तीव्रता वाढू शकते.
किडनी निकामी होण्याची लक्षणे
अधिक थकवा, अशक्तपणा किंवा ऊर्जेचा अभाव, घोटे, पाय किंवा डोळ्यांभोवती सूज येणे, लघवीमध्ये बदल, फेसयुक्त लघवी, लघवीत रक्त येणे, भूक न लागणे, मळमळ किंवा उलट्या होणे, सतत खाज सुटणे किंवा कोरडी खवलेयुक्त त्वचा, झोपताना श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसून येतात.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?
भरपूर पाणी प्या
संतुलित आणि निरोगी आहार घ्या
रक्तदाब आणि साखर नियंत्रित करा
जास्त औषधे टाळा
नियमित व्यायाम करा आणि फिट रहा
मद्यपान आणि धूम्रपान टाळा
