“डॉक्टर, ४ वर्षं झाली. आमचा सोन्यासारखा मुलगा आता परत कधी आमच्या हाताला लागेल वाटत नाही. खूप प्रयत्न केले. अहो, गेली चार वर्षं नुसते त्याला घेऊन गरगर हिंडतो आहोत, पण काही गुण येत नाही. म्हणून शेवटी तुमच्याकडे आलो.” हताश होऊन समीरचे बाबा सांगत होते. “फार दुरून स्पेशल गाडी करून मुलाला गाडीत घालून, बरोबर धट्टेकट्टे नातेवाईक घेऊन आलो आहे. आता बघा काय करायचं ते.” ते खोलीत समीरला घेऊन आले. विशीतला, कृश झालेला, केसांचे जंजाळ झालेला, अस्वच्छ कपडे घातलेला, स्वतःच्या विश्वात मग्न असलेला समीर समोर आला आणि सगळ्यात शेवटी दिसले ते त्याचे बांधून ठेवलेले हात आणि पाय!”

मी भराभर प्रश्न विचारायला सुरूवात केली. “ बांधून का ठेवलाय? खूप आक्रमक(violent) होतो का? कुणाच्या अंगावर धावून जातो का? मारहाण करणे, घरात तोडफोड करणे असे सगळे करतो का? घरातून पळून जातो का? खूप हिंडलात असे म्हणता आहात, तर सध्या काय उपाय चालू आहेत, कोणती औषधे त्याला देता?”

आणखी वाचा: Health Special: सारकोपेनिया म्हणजे काय?

मिळालेली उत्तरे स्तंभित करणारी होती. ‘चार वर्षं त्याला घेऊन भटकतो आहोत’ म्हणजे, चार वर्षे तांत्रिक, मांत्रिक, साधू इ.इ. उपाय सुरू आहेत! कधी हवापालट म्हणून गावाला, तर कधी शहरात अशी भटकंती चालू आहे! झाडफूक, गंडेदोरे, मंत्रतंत्र, अमावस्येचे विधी असे अनेक उपाय करून थकले होते. समीरही थकला होता. ‘डॉक्टर, उगाच दुसऱ्या कोणाला बाधा नको, म्हणून हल्ली त्याला बांधून ठेवायला सांगितले आहे आम्हाला.’ कपाळाला हात लावला मी. आधी त्याचे हातपाय सोडायला सांगितले, सविस्तर माहिती घेतली, स्किझोफ्रेनियाचे निदान केले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये काही दिवस भरती करण्याचा निर्णय केला. त्यासाठी नातेवाईकांना पुरेसे पटवावे लागले.

आणखी वाचा: Mental Health Special: सोशल मीडिया की गेम्स!

“डॉक्टर, एक वर्षही झाले नाही हो मंगेशच्या लग्नाला, आता बायको सोडून गेली आणि घटस्फोट मागते आहे. आम्हाला वाटले, लग्न करून दिले तर त्याची तब्येत तरी सुधारेल. गेली पाच वर्षे विचित्र वागतो, घरात थांबत नाही, भटकत राहतो, स्वतःशी बडबड करतो, हातवारे करतो, स्कीझोफ्रेनियाची ट्रीटमेंटसुद्धा केली. सहा महिन्यात बरे वाटले. वाटले, चला आपल्या मागे लागलेले शुक्ल काष्ठ संपले. एकदा लग्न करून दिले, की संसाराला लागेल, थोडी जबाबदारी घ्यायला शिकेल, मग आयुष्य सुरळीत होईल. वाटले, आपणही आपल्या जबाबदारीतून मोकळे होऊ. त्याची बायको त्याला सांभाळेल” मंगेशचे वडील सांगत होते. मी विचारले, “गोळ्या सुरू ठेवल्या होत्या ना? लग्न करण्याआधी त्याच्या सासरकड्च्यांना त्याच्या आजाराची माहिती दिली होती का?” “अहो, पूर्ण बरा झाला होता तो. तरुण मुलाला लग्न हाच तर योग्य इलाज असतो सगळ्यावरचा!”

“ईसीटी शिवाय दुसरा कुठला उपाय नसेल ना, तर आम्हाला घरी सोडा, हॉस्पिटलमध्ये अजिबात नको. ईसीटीने बुद्धी नाहीशी होते ना? आमचे शेजारी सांगत होते आम्हाला. आम्हाला आमची मुलगी जड नाही झालेली. सगळेच विसरून गेली तर? अजून तिचे शिक्षणही पूर्ण झालेले नाही? नुसत्या गोळ्या देऊन काही होत असेल तर पाहा.पण डॉक्टर, खरंच विचारते, शिकू शकेल का ती, तिला स्किझोफ्रेनिया असला तरी? कधी एकटी घराबाहेर जाणे, काही काम करणे असे जमेल तिला? का आता तिला जन्म भर असेच सांभाळायचे?” आणखी काही शंका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


स्किझोफ्रेनियाविषयी अनेक गैरसमजुती असतात, अनेक वेळा चुकीची माहिती असते. अनेकांना ट्रीटमेंटविषयीही अनेक प्रश्न मनात असतात. पालक स्वतःलाच विचारतात, ‘माझे काय चुकले म्हणून माझ्या मुलाला हा आजार झाला?’ स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णाच्या मुलाला वाटते, ‘माझ्या आईला हा आजार आहे, म्हणजे मला नक्की होणार; मग मी लग्न करून एका मुलीच्या आयुष्याचे नुकसान का करू?’
‘गेली दोन वर्षे औषधे चालू आहेत. किती दिवस गोळ्या खायच्या? आयुष्यभर काय गोळ्यांवरच जगायचे का? म्हणजे मग गोळ्यांचे व्यसन लागले असेच म्हणावे लागेल ना?’
एक ना अनेक, कितीतरी प्रश्न! अज्ञानातून, माहिती अभावी मनात येणारे. स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर मनोविकाराबद्दल त्याच्या लक्षणांमुळे, रुग्णाच्या विचित्र वागण्यामुळे अनेक अंधश्रद्धा निर्माण होतात आणि त्यातून ‘बाहेरचे’ उपाय (faith healing) केले जातात.
असे सगळे प्रश मनात निर्माण होणे स्वाभाविकही आहे. स्किझोफ्रेनियाचे स्वरूप, त्याचे उपाय, रुग्ण नि त्याचे नातेवाईक यांच्या आयुष्यावर या आजाराचा होणारा परिणाम या सगळ्याच गोष्टींची सविस्तर चर्चा आवश्यक ठरते. ती पुढील काही लेखांमध्ये करू.