Soya Milk or Cow Milk: दुधाची निवड करताना साधारणपणे तुम्ही काय पाहता? ते किती घट्ट आहे, त्यात पाणी तर मिसळलेले नाही ना किंवा ए२ तसंच म्हशीचं की गाईचं… असे अनेक प्रश्न असतात. सध्या वेगन फूडची क्रेझ वाढत चालली आहे. वेगन फूडमध्ये सोया दूध किंवा बदाम दूध वापरले जाते. अशावेळी तज्ज्ञ बऱ्याचदा सल्ला देतात की दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मग जास्त फायदा हा कोणत्या दुधात आहे, सोया दूध की गाईच्या दुधात?

सोया दूध आणि गाईचे दूध यापैकी निवड करताना अनेकदा मतं वेगवेगळी असतात. दोघांचेही स्वत:चे असे पौष्टिक फायदे आहेत. यातला चांगला पर्याय तुमच्या आरोग्यासंबंधित उद्दिष्टांवर, आहाराच्या गरजांवर आणि वैयक्तिक आवडीनिवडींवर अवलंबून असतो.

गाईचे दूध

गाईचे दूध हे प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि रिबोफ्लेविनचा नैसर्गिक स्त्रोत आहे. त्यात हाडे आणि स्नायूंच्या आरोग्याला आधार देणारे निरोगी फॅटही आहे. तसंच त्यात संतृप्त चरबी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते, जे हृदयरोग किंवा लॅक्टोज इनटॉलरन्स असलेल्या लोकांसाठी योग्य नसू शकते.

सोया दूध

सोयाबीनपासून बनवलेले सोया दूध हे वनस्पती आधारित पर्याय आहे, जे नैसर्गिकरित्या लॅक्टोजमुक्त असते आणि त्यात संतृप्त चरबी कमी असते. त्यात जवळजवळ गाईच्या दुधाइतकेच प्रथिनांचे प्रमाण असते आणि बहुतेकदा कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि बी १२ने समृद्ध असतात, जे दुग्धजन्य पदार्थ टाळणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

आरोग्यासाठी फायदे

लॅक्टोज इनटॉलरन्स- सोया दूध फायदेशीर आहे, कारण ते लॅक्टोज फ्री आणि पचण्यास सोपे आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी- सोया दुधात वनस्पती आधारित प्रथिने आणि निरोगी चरबी असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

स्नायू आणि हाडांच्या बळकटीसाठी गाईचे दूध उत्तमच मानले जाते कारण त्यात नैसर्गिकरित्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते.

चव आणि वेगळेपण

गाईच्या दुधाला घट्टपणा आणि किंचित गोड चव असते, त्यामुळे ते कॉफी, चहा आणि गोड पदार्थांसाठी योग्य आहे. सोया दुधात सौम्य, थोडी नटी टेस्ट असते जी स्मूदी आणि काही चवदार पदार्थांसाठी योग्य असते. दोन्हीपैकी एका दुधाची निवड तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार आहे.

कोणते दूध योग्य?

जर तुम्हाला कॅल्शियम आणि प्रथिनांचा नैसर्गिक स्त्रोत हवा असेल आणि लॅक्टोज पचवण्यात समस्या नसेल तर गाईचे दूध उत्तम आहे.

जर तुम्ही शाकाहारी असाल, लॅक्टोज इनटॉलरन्स असेल किंवा हृदयाला अनुकूल, कमी फॅटसाठी पर्याय हवा असेल तर सोया मिल्कची निवड करा.

सोया दूध आणि गाईचे दूध दोन्हीही त्यांच्या पद्धतीने आरोग्यदायी आहे. सोया दूध हे कमी कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉलसह एक उत्तम वनस्पती आधारित वेगन पर्याय आहे. तर दुसरीकडे गाईचे दूध हाडांच्या बळकटीसाठी एक पौष्टिक पारंपरिक पर्याय आहे. चांगला पर्याय तुमच्या आरोग्याच्या गरजा पूर्णपणे भागवू शकतो, शिवाय तुमच्या जीवनशैलीवरही ते अवलंबून आहे.