पोळीशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. पोळी हा भारतीय आहाराचा मुख्य भाग आहे कारण- त्याच्यात पौष्टिक फायदे आहेत; शिवाय जवळजवळ कोणत्याही पदार्थासह पोळी खाता येते. तव्यावरून थेट ताटात वाढली जाणारी ताजी, गरम पोळी खाऊन आपण मोठे झालो आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली पोळी सकाळी खाऊ शकता? पोषणतज्ज्ञ व कन्टेंट क्रिएटर दीपशिखा जैन यांच्या मते, “शिळी पोळी ही ताज्या पोळीपेक्षाही चांगली असते. जेव्हा पोळी १२ तास थंड ठिकाणी ठेवली जाते तिच्या रचनेत बदल होतात; जे आरोग्याला अनेक फायदे देऊ शकतात.”

“कूलिंग प्रक्रियेमुळे शिळी पोळी पचविणे सोपे होते आणि चांगल्या जीवाणूंची संख्यादेखील वाढते”, असे मत जैन यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये मांडले आहे.

शिळी पोळी खावी का?

जैन यांच्या मताशी सहमती दर्शवीत बेंगळुरूच्या अथ्रेया हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजिशियन डॉ. चैतन्य एच. आर. सांगतात, “ठरावीक काळासाठी म्हणजे सामान्यत: रात्रभर बाजूला ठेवलेल्या पोळीमधील स्टार्चमध्ये बदल होतो.”

डॉ. चैतन्य एच. आर. स्पष्ट करताना सांगतात, “पोळीमधील काही कर्बोदकांचे (complex carbohydrates) रेझिस्टंट स्टार्चमध्ये (resistant starch) रूपांतर होते. हा रेझिस्टंट स्टार्च नेहमीच्या स्टार्चच्या तुलनेत आपल्या पचनसंस्थेमध्ये वेगळ्या पद्धतीने कार्य करतो. त्यावर लहान आतड्याऐवजी मोठ्या आतड्यामध्ये पचनक्रिया होते; जेथे ते प्रीबायोटिक म्हणून कार्य करते. आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांसाठी चांगला आहार म्हणून कार्य करते.

हेही वाचा – सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या

रेझिस्टंट स्टार्च जास्त असलेले पदार्थ खाण्याचे संभाव्य आरोग्य फायदे

डॉ. चैतन्य यांच्या मते, “शिळ्या पोळीमध्ये रेझिस्टंट स्टार्चचे प्रमाण वाढल्याने आरोग्याला अनेक संभाव्य फायदे मिळतात. त्या अंतर्गत जीवाणूंच्या वाढीस समर्थन देऊन, आतड्याच्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते. हे जीवाणू निरोगी पचनसंस्था निर्माण करण्यात योगदान देतात, संभाव्यत: गॅस, पोट फुगणे व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी करतात.

त्याव्यतिरिक्त जैन यांच्या साखरेच्या नियमनाबाबतच्या विधानाचे समर्थन करताना डॉ. चैतन्य सांगतात की, रेझिस्टंट स्टार्चमुळे रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत होऊ शकते. कर्बोदकांची पचनक्रिया मंदावल्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. सहसा नेहमीचे स्टार्च खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची वाढ होत असल्याचे दिसून येते.

शिळ्या पोळी खाण्याशी संबंधित पौष्टिक घटकांची कमतरता

शिळ्या पोळीचे काही फायदे असले तरी डॉ. चैतन्य याच्याशी सहमत आहेत की, याबाबत संपूर्ण आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा विचार करणेही महत्त्वाचे आहे.

“ताज्या पोळीत भरपूर पोषक तत्त्वं असतात. रात्रभर बाजूला ठेवलेल्या शिळ्या पोळीमध्ये थोडे कमी प्रथिने आणि जीवनसत्त्वे असू शकतात,” असे ते ठामपणे

त्याव्यतिरिक्त शिळ्या पोळीमध्ये बुरशी लागण्याचीही चिंता असते म्हणून खूप शिळ्या पोळ्या न खाण्याचा सल्ला दिला जातो. “शिळी पोळी व्यवस्थित झाकून ठेवली गेली होती ना याची खात्री करा आणि ठरावीक काळामध्येच शिळ्या पोळीचे सेवन करा,” अशी शिफारस डॉ. चैतन्य करतात.

हेही वाचा – भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…

आहारात शिळ्या पोळीचा समावेश करणे

“रात्रीची पोळी सकाळी नाष्ट्यासाठी खाऊ शकता. तुम्ही दह्याबरोबर किंवा भाज्या आणि डाळ असलेल्या रस्सा भाजीसह शिळी पोळी खाऊ शकता”, असे डॉ. चैतन्य स्पष्ट करतात.

लक्षात ठेवा, विविधता महत्त्वाची आहे. शिळी पोळी विशिष्ट फायदे देत असली तरी त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. तुम्हाला आवश्यक तेवढे पोषक घटक मिळालेत की नाही याची खात्री करण्यासाठी तुमच्या आहारात ताज्या पोळीचाही समावेश करा.