Morning Energy: तुम्हालाही झोपेतून उठताना थकवा आणि आळस जाणवतो? आता तुमच्या कॉफीच्या सेवनाचे परीक्षण करण्याची आणि त्याशिवाय सकाळची सुरुवात करण्याचे मार्ग अवलंबण्याची वेळ आली आहे.
“आपल्यापैकी बरेच जण कॉफीवर अवलंबून असतात, परंतु कॅफिनच्या अवलंबित्वामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते, झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि पचनाच्या समस्यादेखील उद्भवू शकतात,” असे क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल म्हणाल्या. त्यांनी सकाळी एक कप कॉफी न पिताही ऊर्जावान वाटण्याचे अनेक नैसर्गिक मार्ग आहेत यावर भर दिला.
१) तुमचा दिवस हायड्रेशनने सुरू करा
- सकाळच्या थकव्याचे सर्वात दुर्लक्षित कारण म्हणजे डिहायड्रेशन. सहा-आठ तासांच्या झोपेनंतर तुमचे शरीर नैसर्गिकरित्या डिहायड्रेट होते, ज्यामुळे तुम्हाला आळस जाणवतो.
- पचन आणि चयापचय गतिमान करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या.
- इलेक्ट्रोलाइट संतुलन सुधारण्यासाठी पाण्यात चिमूटभर गुलाबी मीठ घाला.
- सकाळी उठल्यावर सर्वात आधी चहा किंवा कॉफीऐवजी पाणी प्या.
- “योग्यरित्या हायड्रेट केल्याने तुमचे चयापचय सुरू होते, विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे तुम्हाला अधिक जागृत आणि सतर्क वाटते,” असे गोयल म्हणाल्या.
२) हालचाल : चालणे किंवा व्यायाम करणे
- शारीरिक हालचाल तुमच्या शरीराला जागे होण्याचा संकेत देते आणि मेंदूमध्ये रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढवून तुम्हाला ऊर्जा देते.
- झोपेतून उठल्यावर लगेच ५-१० व्यायाम करा. डाउनवर्ड डॉग किंवा कॅट काउ यांसारख्या काही योगासनांमुळे रक्तप्रवाह सुधारतो.
- एंडोर्फिन वाढवण्यासाठी १०-१५ मिनिटे सकाळी जलद चालणे किंवा हलका कार्डिओ करा.
- जर तुम्हाला कमी तीव्रतेचे व्यायाम आवडत असतील तर सौम्य व्यायाम किंवा खोल श्वास घेण्याचे व्यायामदेखील मदत करू शकतात.
- अगदी थोडीशी हालचालदेखील तुम्हाला किती जागृत आणि ताजेतवाने वाटते यावर लक्षणीय परिणाम करू शकते.
३) सूर्यप्रकाश घ्या
- तुमच्या शरीराचे अंतर्गत घड्याळ किंवा सर्केडियन लय, प्रकाशाच्या प्रदर्शनामुळे खूप प्रभावित होते. सूर्यप्रकाश मेंदूला मेलाटोनिन कमी करण्यास आणि कोर्टिसोल वाढवण्यास सूचित करतो.
- सकाळी किमान १०-१५ मिनिटे बाहेर पडा.
- जर तुमच्या घरात सूर्यप्रकाश कमी येत असेल तर लाईट थेरपी लॅम्प वापरण्याचा विचार करा.
- सकाळचा सूर्यप्रकाश झोपेच्या आणि जागे होण्याच्या चक्रांचे नियमन करण्यास मदत करतो आणि व्हिटॅमिन-डीचे उत्पादन वाढवतो, जे उर्जेच्या पातळीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
४) ऊर्जा वाढवणारा नाश्ता करा
- नाश्ता वगळल्याने किंवा जास्त साखरेचे जेवण खाल्ल्याने दिवसाच्या शेवटी उर्जेचा अभाव होऊ शकतो. त्याऐवजी, प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबर असलेल्या संतुलित नाश्त्यावर लक्ष केंद्रित करा.
- जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यासाठी अंडी, दही किंवा पनीरसारखे प्रथिन स्रोत समाविष्ट करा.
- दीर्घकालीन उर्जेसाठी काजू, बिया किंवा एवोकॅडो खा.
- तसेच ओट्स, संपूर्ण धान्य किंवा फळे यासारखे कार्बोहायड्रेट्स निवडा.
- संतुलित नाश्ता रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतो, ज्यामुळे मध्यरात्री उर्जेची कमतरता टाळता येते.
५) थंड पाण्याने अंघोळ करा
- थंडीमुळे हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण तात्काळ वाढते, ज्यामुळे व्यक्तीला तात्काळ जागृत आणि सतर्क वाटते.
- सकाळी थंड पाण्याने अंघोळ करा. तुम्ही सवयीनुसार कोमट पाण्याचा पर्याय निवडू शकता.
- थंडीमुळे मज्जासंस्था सक्रिय होते, सूज कमी होते आणि मूडदेखील सुधारू शकतो.
६) खोल श्वास घेण्याचा किंवा ध्यान करण्याचा सराव करा
- श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि माइंडफुलनेस तुम्हाला ताण कमी करून आणि मेंदूला ऑक्सिजनचा प्रवाह सुधारून अधिक लक्ष केंद्रित आणि ऊर्जावान वाटण्यास मदत करू शकतात.
- खोल श्वास घेण्याचा सराव करा (४ सेकंद श्वास घ्या, ४ सेकंद धरून ठेवा, ६ सेकंद श्वास सोडा).
- मानसिक स्पष्टतेसाठी पर्यायी नाकपुडी श्वासोच्छ्वास (नाडी शोधन) वापरून पाहा.
- दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी पाच-दहा मिनिटे ध्यान करा.