आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत रात्रभर काम करणे ही आश्चर्यकारक बाब नाही. कॉलेजच्या कामासाठी असो किंवा ऑफिसमधील काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे लक्ष्य असो- सर्वांचीच अशा परिस्थितीत धावपळ होते. रात्रभर जागल्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त थकवा जाणवतो, लक्ष केंद्रित होत नाही आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया म्हणून चिडचिड होत राहते. हे वारंवार घडत राहते. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी हताश झालेले बरेच लोक सिगारेट ओढण्याचा पर्याय स्वीकारतात आणि त्यामुळे त्यांना क्षणभर आराम मिळतो, मज्जातंतू मोकळे होतात, मन पुन्हा जागृत होते आणि पुढील दिवसात शरीराला होणारा त्रास थोडा सहन करण्यायोग्य बनवते. पण, हे असे का घडते?
“निकोटीनचे सेवन केल्यानंतर शरीरात डोपामाइन सोडले जाते, जो एक आनंदाचा हार्मोन आहे. हा हार्मोन ताण कमी करतो आणि अल्पकालीन विश्रांती वाढवतो. पण, डोपामाइनची पातळी कमी होताच ताण आणि थकवा वेगाने परत येतो,” असे पश्चिम विहार येथील वेलनेस होम क्लिनिक अँड स्लीप सेंटरचे पल्मोनोलॉजिस्ट व संचालक डॉ. विकास मित्तल दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट करतात. त्यामुळे अनेकदा रात्रभर जागल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा थकवा घालवण्यासाठी एकामागे एक सिगारेट ओढत राहतात. अशा प्रकारे झोप टाळण्यासाठी निकोटीनची गरज पडते अन् अनेक जण कधी न संपणाऱ्या एका दुष्ट चक्रात अडकतात.
सिगारेटमुळे आपण जागे राहू शकतो ते निकोटीनमुळे अॅड्रेनालाईनसारखे उत्तेजक हार्मोन्स सक्रिय होण्यामुळे होते “तुम्हाला वाटते की, धूम्रपानाची कृती तुम्हाला जागे ठेवतेय; पण ते जागे ठेवणे अॅड्रेनालाईनमुळे आहे, असे डॉ. मित्तल सांगतात. या वाढीमुळे हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो, ज्यामुळे शरीर आणि फुप्फुसांमध्ये दाह वाढतो आणि ती दीर्घकालीन फुप्फुसांच्या आजारांमध्ये योगदान देऊ शकतो.
यातले मुख्य कारण आहे दाह (Inflammation)
“धूम्रपान आणि झोपेची कमतरता हे दोन्ही शरीरात दाह निर्माण करतात,” असे डॉ. मित्तल यावेळी सावध करीत सांगतात. “आणि या दोन्हीचा संगम नक्कीच अधिक धोकादायक ठरतो.” नैसर्गिकरीत्या, थकलेल्या शरीराला पुरेशी झोप मिळालेल्या शरीराप्रमाणे ही परिस्थिती हाताळली जात नाही. मग रोगप्रतिकार शक्ती कमी होते, संसर्गाची बाधा होते आणि थकवा अधिक वाढतो.
“जर तुम्ही अपुरी झोप घेतली असताना धूम्रपान करीत असाल, तर त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमी होते,” असेही ते सांगतात. म्हणूनच जो माणूस चांगली झोप घेतो, त्याच्या तुलनेत रात्रभर जागणाऱ्या आणि सिगारेट ओढणाऱ्यांना सर्दी, फ्लू यांची सहज लागण होऊ शकते. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास हे बदल त्यावेळी संरचनात्मक नुकसान दाखवत नसतील; पण रासायनिक पातळीवर झोपेची कमतरता असलेल्या धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या फुप्फुसांमध्ये दाहजनक घटक भरभरून असतात, असे डॉ. मित्तल स्पष्ट करतात.
डॉ. मित्तल असेही स्पष्ट करतात की, झोपेची कमतरता असलेल्या व्यक्तीला धूम्रपानाची अधिक इच्छा निर्माण होते. कारण- थकलेले मन जागे राहण्यासाठी आणि सतर्क राहण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उत्तेजनाची अपेक्षा करीत असते. “जर एखादा माणूस आधीच धूम्रपान करणारा असेल, तर निश्चितच निकोटीनची सवय अधिक तीव्र होते,” असे डॉ. मित्तल स्पष्ट करतात. थकवा वाढत असताना, सिगारेट ओढण्याची तृष्णा अधिक तीव्र होते आणि त्यामुळे सिगारेट ब्रेक्स ही फक्त निवडक विश्रांती नव्हे, तर थकव्यामुळे होणाऱ्या क्रॅशपासून वाचवणारी एकमेव ओढ बनते.
रात्रभर जागरणानंतर एक सिगारेट घेणे कदाचित आधीपासून असलेल्या सवयीचा भाग वाटू शकतो; पण याचे सवयीमध्ये रूपांतर झाले, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. धूम्रपान आणि झोपेची कमतरता या दोन्ही बाबी एकत्र येणे नेहमी हानिकारक असते. या गोष्टीचे सवयीत रूपांतर होणे ही खरी धोकादायक बाब आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.