उन्हाळा म्हणजे अंगाची काहिली होणे, रखरखीतपणा, उष्माघात, घामाच्या धारा – असं काय काय मनात येते. अशावेळी जीव नकोसा होतो. मे महिन्यामध्ये सर्वत्र तापमान वाढू लागले व घामाघूम व्हायला झाले की सर्वांना उन्हाळ्याची झळ लागते. मुंबईमध्ये भरपूर घाम येतो तर देशावर उन्हाळी लागते तर उन्हाळ्यात शरीराची कशी काळजी घ्यायची ते बघूया. उन्हाळ्यामध्ये मुख्यत्वे त्वचा, केस, पाय यांचे विकार आणि तीव्र उन्हामुळे येणारी तिरमिरी, उष्माघात या आरोग्यविषयक समस्या येतात.

उष्माघात – ही जास्त तापमानामुळे झालेली एक तीव्र समस्या असते. यामध्ये शरीरात जास्त उष्णता शोषून घेतली जाते. यामुळे रक्तदाब कमी होतो व मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. हा गंभीर आजार असून त्यास त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज असते.

उन्हाळ्याचा आपल्या त्वचेवर कसा प्रभाव पाडतो?

उन्हाळ्यात खूपजणांना त्रास होतो तो म्हणजे घामोळ्यांचा व फोडांचा. अनेकजण याचा संबंध आंबे खाण्याशी जोडतात जे साफ चुकीचे आहे. त्वचेचा शुष्कपणा, वाढलेले घामाचे प्रमाण व धूळ यामुळे हे फोड येऊ लागतात. घामोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी थंड पाण्यानेच आंघोळ करायला लागावे. (थंड शॉवर, बाथ किंवा स्पंज बाथ). पातळ व सैलसर कपडे घालावेत ज्याअन्वये हवा खेळत राहील. आंघोळीनंतर शरीराला टाल्कम  पावडर लावावी. कुठे पुरळ (स्किन रॅश) असल्यास caladryl किंवा तत्सम लोशन लावावे.

हेही वाचा – Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

उन्हाळ्यात आपल्या पायांना, मुख्यत्वे अंगठा व बोटे यांना त्वचेच्या रुक्षतेमुळे व धुळीमुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो. बाहेरून आल्यानंतर पाय चांगले चोळून धुवावेत व आवश्यक असल्यास त्वचा मुलायम ठेवणारे मलम moisturiser लावावे. तसेच उष्णता व घाम यामुळे डोक्यामध्ये कोंडा होण्याचे प्रमाणही उन्हाळ्यात वाढते.

आर्द्रता आणि उष्मासह एकत्रित परिणामामुळे तेलकट त्वचा अधिक तेलकट दिसते आणि कोरडी त्वचा खडबडीत दिसते. सूर्यकिरणांची तीव्रता अधिक मेलेनिन रंगद्रव्ये तयार करून काळवंडण्यास  कारणीभूत ठरू शकते. उन्हाळ्यात आपली त्वचा जपणे फार महत्वाचे ठरते. म्हणून उन्हात बाहेर जाताना शरीरावर सनस्क्रीन लोशन लावावे. यामुळे व UVa आणि UVb या किरणांमुळे रक्षण केले जाते. उन्हाळ्यात खूप मेकअप करणे टाळावे. कारण वातावरणातील रुक्षता व आर्द्रता याने त्वचेची रंध्रे आधीच योग्यरीत्या काम करू शकत नाही. अति मेकअपमुळे ती बंद होतात व त्यामुळे त्वचेला अजिबात श्वास घेता येत नाही. आहारात संत्री, मोसंबी यासारखी फळे, हिरव्या पालेभाज्या, गाजर, शेंगदाणे व तृणधान्ये यांचा समावेश असावा म्हणजे त्वचा तुकतुकीत राहते. याबरोबर अँटी ऑक्सिडंट्सही घ्यावीत ज्यामुळे त्वचेतील आर्द्रता राखली जाते व त्वचेला इजा संभवत नाही.

हेही वाचा – Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

घामाच्या जास्त प्रमाणामुळे उन्हात जास्त फिरल्यास, श्रम अधिक केल्यास किंवा खेळल्यास हातापायात पेटके (Cramps ) येतात. पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. अशावेळी थंड सावलीच्या ठिकाणी आराम करावा, मीठ साखर घातलेले पाणी किंवा फळांचा रस भरपूर प्रमाणात घ्यावे व लागलीच कडक उन्हात जाऊ नये. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेमुळे व निथळणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी सतत बाहेर जात असते. त्यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर, मळमळ, पायात पेटके येणे सहज शक्य आहे. अशावेळी भरपूर पाणी, सरबत किंवा नारळपाणी प्यावे.

उन्हाळ्यातील आहार विहार

उन्हाळ्यात घसा कोरडा पडतो म्हणून अति थंडगार पाणी पिऊ नये. शरीराच्या तापमानात साजेल असेच पाणी प्यावे. शरीराचे वाढणारे तापमान बाह्य तसंच अंतर्गत अवयवांना नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे माध्यान्हीचे प्रखर ऊन टाळलेलेच बरे.  तसेच आत्यंतिक श्रम व व्यायाम टाळावा. उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी व शरीराला उन्हाळ्याचा कमी त्रास होण्यासाठी आपण आहारात थोडा बदल करणे उचित ठरते. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात अन्न पचायला जड असते म्हणून उन्हाळ्यात भुकेपेक्षा एक घास कमीच घ्यावा. आहारात भात, रताळी, गाजर, बीट, सुरण तसेच भेंडी, फ्लॉवर, पडवळ दोडकी या सारखे मधुर रस असलेले अन्नपदार्थ असावेत. दही, ताक व लस्सी या उन्हाळ्यात लाभकारक ठरतात. आंबट पदार्थ जसे की कैरी, पन्हे, कोकम सरबत, हे उष्णता कमी करतात व शरीर शीतल ठेवतात. जेवणामध्ये मसाल्याचे पदार्थ कमी असावेत. व ते भरपूर प्रमाणात घ्यावे. धणे, जिऱ्याचे पाणी हे अन्नपचनास पूरक असते व शरीराला थंडपणा आणतात.

हेही वाचा – तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

या व्यतिरिक्त कच्चा किंवा शिजलेला कांदा हा जेवणात भरपूर असावा. जेवणामध्ये डाळींचे प्रमाण कमी ठेवावे. मुगडाळ ही पचायला चांगली असल्याने ती जास्त खावी. मांसाहार कमीत कमी घ्यावा. उन्हाळ्याची काहिली कमी करण्यास कलिंगड, टरबूज अशी पाणीदार फळे भरपूर खावीत. त्यामुळे तहान कमी लागते. पचायला हलकी असलेली फळे जसे की बोर, करवंदे, जांभूळ उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात खावीत.