Avoid wearing tight belts: तुम्हीही खूप घट्ट बेल्ट दररोज वापरता का? जास्त वेळ घट्ट बेल्ट घालणे त्रासदायक ठरू शकते आणि पोटावर येणारा दाब दीर्घकाळात आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतो. दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रातील प्रमुख सल्लागार डॉ. तृप्ती रहेजा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. तृप्ती रहेजा म्हणाल्या की, या दाबामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. “प्रथम यामुळे अंडकोषांचे तापमान वाढू शकते, जे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण शुक्राणूंच्या उत्पादनासाठी अंडकोष शरीराच्या इतर भागांपेक्षा थंड राहणे आवश्यक आहे,” असे डॉ. रहेजा म्हणाल्या, कंबरेच्या भागात वाढलेले तापमान शुक्राणूंची गुणवत्ता आणि गतिशीलता यांवर नकारात्मक परिणाम करू शकते.

“दुसरे म्हणजे घट्ट पट्टा रक्तप्रवाह रोखू शकतो, ज्यामुळे अंडकोष आणि इतर पुनरुत्पादक अवयवांचे कार्य बिघडू शकते. तसेच यामुळे शुक्राणूंचे उत्पादनही कमी होऊ शकते”, अशी माहिती डॉ. रहेजा यांनी दिली.

त्याव्यतिरिक्त खालच्या ओटीपोटात आणि जननेंद्रियाच्या क्षेत्रावर दीर्घकाळ दाब आल्यामुळे जळजळ होऊ शकते किंवा व्हॅरिकोसेल म्हणजे अंडकोषातील शिरा वाढणे किंवा फुगणे. यालाच ‘शिरांचा विकार’ असेही म्हणता येईल. “घट्ट पट्टा घातल्याने कालांतराने पचनाच्या समस्यादेखील उद्भवू शकतात”, असे डॉ. रहेजा म्हणाले.

एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅफ्रोलॉजी अँड युरोलॉजी चेन्नईचे कन्सल्टंट मायक्रोसर्जिकल अँड्रोलॉजिस्ट व युरोलॉजिस्ट डॉ. संजय प्रकाश यांनी पुष्टी केली की, घट्ट बेल्ट घालण्यामुळे पुरुषांना विविध शारीरिक त्रास होऊ शकतात. प्रामुख्याने जेव्हा ते घट्ट बेल्ट जास्त काळ किंवा खूप वारंवार वापरतात. “घट्ट बेल्ट तुमच्या पोटाच्या क्षेत्राभोवती सतत दाब निर्माण करतो, ज्यामुळे रक्तप्रवाह नकारात्मकरीत्या मर्यादित होऊ शकतो. त्याचा अवयवाच्या सामान्य कार्यावर आणखी परिणाम होऊ शकतो. या अति दाबामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्ससारख्या पचन समस्याही उद्भवू शकतात, जो एक अस्वस्थ करणारा अनुभव आहे”, अशी माहिती डॉ. संजय यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे धोके कमी करण्यासाठी, हवेचा प्रवाह वाढविण्यासाठी आणि जास्त उष्णता जमा होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सैलसर वा आरामदायी कपडे वापरण्याचा सल्ला दिला जातो. असे बेल्ट खरेदी करा, जे खूप घट्ट नसतील आणि तुम्हाला आरामात बसू शकतील, असा सल्ला डॉ. संजय यांनी दिला. त्याशिवाय योग्य आहार, नियमित व्यायाम करा. धूम्रपान व जास्त मद्यपान यांसारख्या सवयी टाळून निरोगी जीवनशैली राखावी. ही जीवनशैली पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत आणि एकूण आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.