Water Fasting: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतं वजन ही एक समस्या बनली आहे. कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, खाण्याच्या अयोग्य वेळा या गोष्टींमुळे लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय. त्यासाठी झटपट वजन कमी कसं होईल याकडे भर देण्यात येतोय. सोशल मीडियावर अनेकदा काही ना काही ट्रेंड होत असते. अलीकडे सोशल मीडियावर वॉटर फास्टिंग म्हणजेच पाण्याचा उपवास हा एक चर्चेचा विषय बनला आहे. हे एक उपवासाचे तंत्र आहे, ज्यामध्ये माणूस काहीही न खाता, इतर पेय न पिता, फक्त पाण्याने पोट भरतो.
प्रसिद्ध लेखक आणि ऑनलाइन आरोग्य प्रशिक्षक बेन आझादी यांनी त्यांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे, त्यांनी ३६ किलो चरबी कमी केली आहे. एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये त्यांनी चरबी कमी करण्यासाठी एक धाडसी रणनीती सांगितली आहे. यावेळी त्यांनी आठवड्यातून एकदा २४ तास पाण्याचा उपवास करत असल्याचं सांगितलं. आझादीच्या मते, ही उपवास पद्धत केवळ हट्टी चरबी जाळत नाही तर आतड्यांचे आरोग्यदेखील पुनर्संचयित करते. फरीदाबाद येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्समधील इंटरनल मेडिसिन आणि रूमेटोलॉजीचे संचालक डॉ. जयंत ठाकुरिया यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
आरोग्य प्रशिक्षक आझादी यावर भर देतात की, पूर्ण दिवस उपवास केल्याने वजन कमी करण्याव्यतिरिक्त अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. जसे की, “तुमचे आतडे पुन्हा तयार करण्यासाठी, चरबी जाळण्यासाठी आणि रोग टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा हे करा. याला २४ तासांचा पाण्याचा उपवास म्हणतात. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, आतड्यांतील स्टेम पेशी वाढतात; तर याचा अर्थ काय? जर तुम्हाला गॅस, पोटफुगी, बद्धकोष्ठता, अतिसार किंवा गळतीचा त्रास होत असेल, तर तुम्ही २४ तासांचा पाण्याचा उपवास करून तुमच्या आतड्यांना स्वच्छ करू शकता.
पाण्याच्या उपवासामागील विज्ञान
अधूनमधून उपवास लोकप्रिय होत असताना, २४ तास पाण्यावरील उपवास खरोखरच चरबी कमी करण्यासाठी एक शाश्वत आणि सुरक्षित पद्धत आहे का?
डॉ. जयंत ठाकुरिया उपवास करणे फायदेशीर ठरू शकते हे मान्य करतात आणि म्हणतात, “आठवड्यातून एकदा २४ तास पाण्याचा उपवास केल्याने कॅलरीजची कमतरता निर्माण होऊन आणि चयापचय लवचिकता वाढून चरबी कमी होण्यास हातभार लागू शकतो. काही अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की, अधूनमधून उपवास केल्याने चरबीचे ऑक्सिडेशन वाढू शकते, इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते आणि ऑटोफॅजी (पेशी दुरुस्ती) ला चालना मिळू शकते.” दरम्यान, डॉ. ठाकुरिया संभाव्य तोटेदेखील अधोरेखित करतात. ते इशारा देतात की, जास्त काळ उपवास केल्याने थकवा, चक्कर येणे, चिडचिड होणे किंवा स्नायूंचे नुकसान होऊ शकते, जर ते योग्यरित्या केले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते प्रत्येकासाठी योग्य नाही. पचनाचे विकार, कमी रक्तदाब किंवा उपवासानंतर जास्त प्रमाणात खाण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींनी सावधगिरीने याकडे लक्ष द्यावे.
२४ तासांचा उपवास तुमच्यासाठी योग्य आहे का?
उपवास करून “हट्टी चरबी वितळवण्याची” कल्पना आकर्षक आहे, परंतु शाश्वत वजन कमी करणे हे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सावधगिरी बाळगण्यावर अवलंबून असते, असे डॉ. ठाकुरिया म्हणतात. दीर्घकाळ उपवास करण्यापूर्वी तज्ज्ञांनी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घेण्याची शिफारस केली आहे, जेणेकरून वैयक्तिक आरोग्य परिस्थितीची खात्री करता येईल. उपवासामागील विज्ञान समजून घेणे आणि ते तुमच्या शरीराच्या गरजांनुसार फॉलो करणे गरजेचे आहे.