Ayurvedic Cooling Foods: ज्या वेळेस शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढते, थकवा जाणवतो आणि तहानही अधिक लागते, अशा वेळी फक्त थंड पेय किंवा आईसक्रीमवर अवलंबून राहून उपयोग नाही. आपल्या रोजच्या आहारात अशा भाज्यांचा समावेश करणे गरजेचे ठरते ज्या शरीराला नैसर्गिक थंडावा आणि भरपूर ओलावा देतात.
पण एक महत्त्वाची गोष्ट आपण बरेचदा विसरतो, ती म्हणजे ज्या भाज्यांमध्ये भरपूर पाणी असते, त्या सर्वच शरीराला थंडावा देतात असे नाही! काही भाज्यांचा स्वभाव ‘उष्ण’ असतो आणि त्या उन्हाळ्यात शरीराची उष्णता आणखी वाढवू शकतात.
म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी खास! या लेखात एक सविस्तर चार्ट दिला आहे. ज्यामध्ये २५ भाज्यांमधील पाण्याचे प्रमाण आणि त्यांचा आयुर्वेदिक स्वभाव (शीत/उष्ण) दिला आहे.

शरीराला अधिकाधिक पाण्याची गरज असते त्या वेळेस भाज्या सुद्धा अशा निवडाव्यात ज्या शरीराला अधिकाधिक नैसर्गिक ओलावा (moisture) पुरवतील. ज्या भाज्या शरीराला मुबलक पाणी पुरवतात,त्यांमधुन मिळणारे पाण्याचे प्रमाण व त्या भाज्या उष्ण आहेत की शीत याची माहिती खालील सारणीमध्ये दिली आहे. उष्ण भाज्या उन्हाळ्यात टाळणे योग्य होईल,त्यातही ज्यांना उष्णतेचा त्रास होतो अशा उष्ण (पित्त) प्रकृती व्यक्तींनी टाळणे योग्य ठरेल.

Chart showing 25 summer vegetables with water content and Ayurvedic nature (cooling or heating)


वरील चार्टचे विश्लेषण करताना स्पष्ट दिसते की, उन्हाळ्याच्या दृष्टीने शरीराला पाणी आणि थंडावा देणाऱ्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करणे अत्यंत आवश्यक आहे. या चार्टमध्ये एकूण २५ भाज्यांची माहिती दिली असून त्यातील बहुतांश भाज्यांमध्ये ९२% पेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण आहे. कोहळा, काकडी, दुधी भोपळा, कलिंगड, खरबूज आणि घोसाळे यांसारख्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण ९५% पेक्षा जास्त असून त्यांचात शीत गुणधर्म असल्याने त्या उन्हाळ्यात विशेष उपयुक्त ठरतात.

दुसरीकडे, काही भाज्यांमध्ये जरी पाण्याचे प्रमाण भरपूर असले तरी त्यांचा स्वभाव उष्ण आहे, उदा. आंबट चुका, मुळा, वांगे, टोमॅटो, कारले वगैरे. अशा भाज्या उष्णता वाढवू शकतात, म्हणून विशेषतः पित्तप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींनी या भाज्या मर्यादित प्रमाणात घ्याव्यात.

एकूणच, या चार्टमधून असे समजते की, फक्त पाण्याचे प्रमाण पाहून एखादी भाजी निवडणे पुरेसे नाही; तिचा आयुर्वेदिक स्वभाव (शीत/उष्ण) समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आहार निवडताना ऋतूनुसार आहारशुद्धी हे तत्त्व पाळल्यास शरीराचे संतुलन राखणे आणि उन्हाळ्याचे दुष्परिणाम टाळणे शक्य होते.